घरराजकारणस्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली, खासदार राहुल गांधींची पुन्हा टीका

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली, खासदार राहुल गांधींची पुन्हा टीका

Subscribe

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्यात तुलना करून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करतानाच भगवान बिरसा मुंडांच्या विचारधारेवर भाजप हल्ला करत असल्याचा दावाही केला आहे.

भारत जोडो यात्रेनिमित्त खासदार राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वाशिम येथे बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या लढ्याचे कौतुक केले. आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले व वयाच्या 24व्या वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. ते आपल्या तत्वांवर ठाम होते, असे सांगून राहुल गांधी म्हणाले, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदर्श सावकर आहेत. ते दोन-तीन वर्ष अंदमानच्या कारागृहात होते. तिथे त्यांनी दया अर्ज लिहिण्यास सुरुवात केली. सावरकरांनी स्वत:वर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते, ते त्यात सांगितले. त्यांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली. त्यांनी ब्रिटिशांसाठी आणि काँग्रेसच्या विरोधात काम केले, असे ते म्हणाले.

- Advertisement -

मागील काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हक्कासाठी विविध निर्णय घेतले. भाजपा संविधानच मानत नाही, त्यामुळे आदिवासी, दलित, वंचित, अल्पसंख्याक समाजाला त्यांचे हक्क मिळू नयेत अशी भाजपाची भूमिका आहे, अशी टीका त्यांनी केली.

भारत जोडो यात्रा थांबवण्याची शिंदे गटाची मागणी
भारत जोडो यात्रेच्या दरम्यान कर्नाटकच्या तुमकूरमध्ये राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्यापाठोपाठ त्यांनी काल वाशिम येथे पुन्हा सावरकरांवर टीका केली. या पार्श्वभूमीवर, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हे राज्य कायद्याचे आणि सावरकरांचे आहे असे दाखवून देऊया. तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन करावे, असे आवाहन राहुल शेवाळे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -