घरराजकारणराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार 'सॉफ्ट टार्गेट' ठरतायत का?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरतायत का?

Subscribe

मुंबई : गेल्या अडीच-तीन वर्षांपासून राज्यातील राजकारण सतत अनपेक्षित वळणे घेत आहेत. पण या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे अनेकांच्या निशाण्यावर राहिले आहेत. त्यामुळे राज्यातील हे सर्वात ज्येष्ठ राजकारणी ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरतायत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर अतिशय नाट्यपूर्ण घटना घडत आहेत. युती तयार करून निवडणुकांना सामोरे गेलेली शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपा (BJP) यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून बेबनाव झाला आणि ते वेगळे झाले. नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत शिवसेनेने महाविकास आघाडी तयार केली आणि सत्ता स्थापन केली. पण त्याआधी, २०१४च्या निवडणूक प्रचारात ज्या नेत्याच्या भ्रष्ट्राचारावरून भाजपाने राळ उठवली होती, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मदतीने भाजपानेच सत्ता स्थापन केली होती. पण हे सरकार अवघ्या ८० तासांत पायउतार झाले.

- Advertisement -

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव शरद पवार यांनी जाहीर केले. शिवसेनेत शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी २२ जून २०२२ला सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना शरद पवार यांच्या आग्रहामुळे आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे, मार्च २०१९मध्ये कोल्हापूरला युतीच्या प्रचाराचा नारळ फुटला; त्यावेळी झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनीच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हात जोडून विनंती केली होती की, ‘काही झाले तरी शरद पवार यांना भाजपामध्ये घेऊ नका’! पण महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर शरद पवारांच्या मदतीशिवाय पानही हलत नव्हते, असे चित्र दिसले.

शिवसेनेतील बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले होते. पण नंतर त्यांनी थेट शरद पवारांवर शिवसेनाफुटीचा ठपका ठेवला. शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला. त्यापाठोपाठ परवा शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या रामदास कदम यांनीही तीच री ओढली. शरद पवार यांनी डाव साधला आणि शिवसेना फोडली, असा थेट आरोप केला.

- Advertisement -

मनसेकडूनही टीका
शिवसेनेतील बंड होण्यापूर्वी आपल्या भूमिकेत बदल करत ‘हिंदुत्वा’चा अजेंडा हाती घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील शरद पवार यांच्यावर जातीवादाची टीका केली होती. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील गुढी पाडव्याच्या सभेत, ‘१९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने जाती-जातींमध्ये द्वेष पसरवला, असा आरोप करत शरद पवारांवर जोरदार टीका केली. हा मुद्दा त्यांनी पुढील सभांमध्येही कायम ठेवला.

मोदींकडून निशाणा
पण शरद पवार यांना लक्ष्य करण्याची सुरुवात आधीपासूनच झाली होती. शरद पवारांचे बोट धरूनच राजकारण शिकलो, असे नोव्हेंबर २०१६मध्ये पुण्यात सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९च्या निवडणूक प्रचारात शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. एप्रिल २०१९च्या वर्धा येथील सभेत मोदी यांनी थेट पवारांच्या कुटुंबात कलह असल्याची टीका केली होती. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली असली तरी, त्यांचा पुतण्या पक्षावरची आपली पकड हळूहळू घट्ट करत आहे. त्यामुळे तिकीटवाटपात शरद पवार यांना अडचणी येतात, असे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी इतर सभांमध्येही पंतप्रधान मोदी यांच्या निशाण्यावर शरद पवारच होते.

साधारणपणे अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेला शरद पवारांवरील टीकेचा हा सिलसिला आता आणखी तीव्र होत चालला आहे. त्यामुळे ठाकरेविना शिवसेना हा हेतू साध्य करत असतानाच शरद पवारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहात आहे. एकूणच ‘पाहुण्याच्या लाठीने साप मारण्याचा’ हा प्रकार आहे, असे दिसते.

…म्हणूनच पवारांवर टीका, राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन बनत नाही म्हणूनच काही लोक पवार यांच्यावर टीका करतात, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्याच महिन्यात नागपूर येथे म्हटले होते. तर, राजकारणात करियर घडविण्यासाठी किंवा आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठीच शरद पवार यांना लक्ष्य केले जाते आणि हे अलीकडचे नाही तर, १९९०पासून सुरू आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -