घरराजकारणदेशातील वातावरण खरोखरच 'मोकळे' राहिले आहे काय? शिवसेनेचे भाजपावर शरसंधान

देशातील वातावरण खरोखरच ‘मोकळे’ राहिले आहे काय? शिवसेनेचे भाजपावर शरसंधान

Subscribe

मुंबई : यावर्षी गणेशोत्सवाचा उत्साह अंमळ अधिकच आहे. कारण मागील दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना महामारी आणि त्यामुळे आलेल्या निर्बंधांचे सावट राहिले होते. राज्यातील आणि देशातील सत्ताधाऱ्यांकडून हिंदू सण ‘मोकळे’ केल्याचे ढोल बडवले जात असले तरी प्रत्यक्षात देशातील वातावरण खरोखरच ‘मोकळे’ राहिले आहे काय? असा सवाल करत शिवसेनेने भाजपावर शरसंधान केले आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यात जेथे जेथे मराठी माणूस आहे, त्या प्रत्येक घरात काल श्री गणरायांचे उत्साहात आणि धुमधडाक्यात आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये विराजमान झालेले गणराय 9 सप्टेंबरपर्यंत भाविकांचा भक्तिभाव, श्रद्धा, कोडकौतुक, उत्साह यांचा स्वीकार करतील. दहा दिवसांचा गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी अपार श्रद्धेचा आणि चैतन्याचा उत्सवच असतो. यावर्षी हा उत्साह अंमळ अधिकच आहे. कारण मागील दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना महामारी आणि त्यामुळे आलेल्या निर्बंधांचे सावट होते. आता कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नसले तरी लसीकरणामुळे त्याचे मळभ कमी झाले आहे. त्यामुळे साहजिकच गणेशोत्सवाचा उत्साह वाढला व गणरायाच्या आगमनाच्या जल्लोषी मिरवणुकांतही त्याचे प्रतिबिंब उमटले, असे शिवसेनेने ‘सामना’मध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

गणरायाच्या आगमनासोबतच गौरीच्या स्वागताचीही जय्यत तयारी सर्वत्र झाली आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. हे सर्व राज्य सरकारने गणेशोत्सव ‘बंधनमुक्त’ केल्याने घडत आहे, अशी टिमकी काही मंडळी वाजवत असली तरी त्यात भक्तिभावापेक्षा राजकीय भावच जास्त आहे, हे राज्यातील गणेशभक्तही ओळखून आहेत, अशी खोचक टीका शिवसेनेने केली आहे.

राज्यातील आणि देशातील सत्ताधाऱ्यांकडून हिंदू सण ‘मोकळे’ केल्याचे ढोल बडवले जात असले तरी प्रत्यक्षात देशातील वातावरण खरोखरच ‘मोकळे’ राहिले आहे काय? विरोधी पक्ष, नेते, सरकारचे टीकाकार यांची सत्ताधिकार आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून मुस्कटदाबी केली जात आहे. राज्या-राज्यांतील बिगर भाजप सरकारे शक्य होईल त्या मार्गाने बरखास्त केली जात आहेत. प्रादेशिक पक्षांचे तर नामोनिशाण संपवून टाकण्याची भाषा केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष करीत आहेत, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.

- Advertisement -

विघ्नहर्त्याला साकडे
देशातील लोकशाही, उच्च संसदीय परंपरा, स्वातंत्र्य, घटनात्मक अधिकार, संविधानाची चौकट, धार्मिक एकोपा, राजकीय विरोधक अशा सगळ्यांचेच ‘श्वास’ सरकारी दडपशाहीमुळे कोंडले गेले आहेत. तिकडे देशातील सामान्य माणूस तरी ‘मोकळा’ कुठे आहे? बेरोजगारी आणि सतत वाढणारी महागाई या कोंडीत त्याचाही श्वास गुदमरलेलाच आहे. नवीन रोजगार राहिला बाजूला, आहे तो रोजगारदेखील हातून जात असल्याने ‘कमाई आणि महागाई’ यांचा ताळमेळ लावता लावता त्याची घालमेल होत आहे. रुपयाचे अवमूल्यन दिवसागणिक नया नीचांक गाठत आहे. एकीकडे महागाईचा फास आणि दुसरीकडे सरकारी दडपशाहीचा गळफास या कोंडीत देशाचा श्वास कोंडला आहे. कोरोनाचे संकट बऱ्यापैकी निवळले असले तरी दडपशाहीचे संकट कायमच आहे. गणराया, तू सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहेस. लोकशाही आणि घटनेने बहाल केलेले ‘मुक्त आणि निर्भय वातावरण’ निरंकुश सत्तालालसेच्या तावडीत सापडल्याने गुदमरले आहे. गणराया, देश ‘निर्भय’ कर, एवढीच प्रार्थना आज देशातील जनता तुला करीत आहे. तिचा स्वीकार कर, असे साकडे शिवसेनेने घातले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -