घरनवरात्रौत्सव 2022शिक्षणाचे धडे देणारी सावित्रीची लेक - डॉ. नीता सोनावणे

शिक्षणाचे धडे देणारी सावित्रीची लेक – डॉ. नीता सोनावणे

Subscribe

भारतीय समाजामध्ये स्त्रियांच्या सामाजिक दर्जासंदर्भात कमालीचा विरोधाभास आढळतो. एका बाजूला धर्म स्त्रियांचे गौरविकरण करतात, तर दुसर्‍या बाजूला मात्र तिला सामाजिक व्यवस्थेत शेवटचे किंवा दुय्यम स्थान दिले जाते. असा हा विरोधाभास. मात्र असे असले तरी देखील आजकालच्या स्त्रिया यावर मात करुन जिद्दीने समाजकार्य करतात.

एकोणिसाव्या शतकात सावित्रीमाई फुले यांनी पुण्याच्या भिडेवाड्यातून महिलांना शिक्षण देण्याची मुर्हूतमेढ रोवली. सावित्री फुले यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली, ती तेवत ठेवण्याचे काम आजवर अनेक महिलांनी केले. आज एका अशा स्त्रीची ओळख करुन घेणार आहोत. जी आदीवासी पाड्यातील मुलांना शिक्षण देण्यासाठी सातपुड्याच्या दर्‍याखोर्‍यात जाऊन मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहे. ज्ञानदानाच्या या कार्यात सावित्री फुले यांच्याप्रमाणेच अनेक अडथळयांची शर्यत पार करत रस्ते नसलेल्या गावपाड्यात जाऊन त्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नीता सोनवणे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून डॉ. नीता सोनवणे कार्यरत आहेत. समाजासाठी काहीतरी करावे, अशी त्यांची नेहमीच धडपड सुरू असते. समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्या सतत झटत असतात. सध्या त्या ज्या पदावर काम करतायत ते काम एका विशिष्ट चौकटीतही केले जाऊ शकते. मात्र डॉ. नीता याला अपवाद आहेत. एखाद्या समस्येचे मूळ काय? हे जाणल्या नंतर त्यासाठी जीव ओतून काम करायला त्यांना नेहमीच आवडतं. कामाचा आनंद घेऊन त्या काम करतात. आदिवासी मुलांकरिता आर्थिक आणि शैक्षणीक सुविधांची मदत मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

- Advertisement -

डॉ. नीता यांचे शिक्षणप्रसाराचे प्रयत्न

मध्यप्रदेशाच्या सीमेवर आदिवासीबहुल आणि सातपुड्याच्या पर्वतरांगेतला दुर्गम असा हा परिसर. या परिसरात नीता स्वत: जाऊन तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयीचा आढावा घेतात. जिल्हा परिषद, खाजगी प्रशासन, आश्रमशाळा अशा एकूण ६४ शाळा आहेत इथे. त्यातील किमान ६ शाळांकडे जायला रस्ता नाही. असे असताना देखील नीता तिथे जाऊन आदिवासी तरुणांना शिक्षणाचे धडे घेण्यासाठी प्रवृत्त करतात. तसेच त्यांनी तालुक्यातल्या गौरव फाउंडेशन, जायन्ट्स समूह, तालुका ग्राहक मंच यांना स्वतःहून जोडून घेतलं आहे. जेणेकरून ज्या ठिकणी या संस्था काम करतात त्याठिकाणी तेथील आदिवासी मुलांकरता आर्थिक आणि इतर शैक्षणीक सुविधांची मदत मिळवण्याचा प्रयत्न करू शकतील असा त्यांचा उद्देश असतो. या त्यांच्या कार्यक्षेत्रात शिक्षक आणि केंद्रप्रमुख त्यांना मदत करतात.

मागील काही वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावर चिंतेचा विषय झालेल्या ‘स्थलांतर’ या गंभीर विषयावर त्या काम करत आहेत. बरेच पालक गरिबीमुळे कर्ज घेतात आणि ते फेडण्याकरता ठेकेदारांसोबत कामाला जातात. तर बरेचदा ते मुलांना देखील कामाला घेऊन जातात. त्यामुळे अनेक मुले शिक्षणप्रवाहापासून दूर होतात. हे थांबावं याकरिता नीता आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करत असतात. मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटावे याकरिता गावामध्ये होणार्‍या जत्रांच्या वेळी शैक्षणिक स्टॉल लावले जातात. तर गावागावात पालक आणि ग्रामसभा देखील घेण्यात येतात. त्यासोबतच किशोरी मेळावे, मुलांकरता शिबीरं भरवली जातात. असे आनंदी आणि सकारात्मक सकस वातावरण निर्मितीचे प्रयत्न करुन मुलांना शाळांकडे आकर्षून घेण्याचा प्रयत्न डॉ. नीता करत आहेत. शासन काही मुलभूत सुविधा पुरवत आहे. मात्र अजूनही खूप गरजा अपुर्‍या असून नीता आणि त्यांचे सहकारी शिक्षणासाठी सढळ मदत करणारे मान्यवर शोधत आहेत.

- Advertisement -

नीता यांचा कौटुंबिक प्रवास

धनगर समाजातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या डॉ. नीता सोनवणे यांचे आई-वडिल नोकरदार असले तरी देखील त्यांच्यावर सामाजिक दडपण होते. त्यांनी नीता यांना जेमतेम अकरावी पर्यंत शिक्षण दिले आणि त्याच दरम्यान त्यांना लग्नासाठी स्थळ यायला लागली. अकरावीत असतानाच नीता विवाह बंधनात अडकल्या. मात्र नीता यांच्या आईला वाटायचे की, मुलीने स्वत:च्या पायावर उभं राहावं. याच गोष्टीचा विचार करुन त्यांनी आपल्या मुलीला अशा एका कुटुंबात दिले, ज्या कुटुंबात त्यांना पुढे शिकण्याची परवानगी मिळेल. नीता यांचे सासरमधील कुटुंब गरीब आणि अशिक्षित होतं. मात्र त्यांचे पती खूप समजूतदार आहेत. त्यांच्या पतीने पुढील शिक्षण घेण्यासाठी नीता यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे नीता यांनी लग्नानंतर डी.एड् केलं.

त्यानंतर त्या खाजगी शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. शिक्षिका म्हणून काम करता करता त्यांनी बी.ए-बी.एड्, एम.ए- एम.एड्, पी एच डी आणि एलएलबी पूर्ण केले. इतर पदवी मिळवत असताना त्यांनी स्पर्धा परिक्षांचीही तयारी केली होती. स्पर्धा परिक्षेत यश मिळवून त्या विस्तार अधिकारी बनल्या. हे सर्व करत असताना त्यांनी संसाराचा गाडा कधीच रुळावरून घसरून दिला नाही. मुलं आणि कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळत त्यांनी आपलं यश संपादन केलं.

एका अशिक्षित कुटुंबात जन्म घेऊन स्वतःच्या हिमतीवर डॉ. नीता सोनावणे सरकारी अधिकारी झाल्या. मात्र आपले जुने दिवस त्या विसरलेल्या नाहीत. आपल्याला जो संघर्ष करावा लागला, तसा संघर्ष इतरही करत आहेत. त्या संघर्षाला जर योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली तर ते स्वतःच स्वतःची प्रगती करु शकतील, हा गाढ विश्वास त्यांच्या मनात आहे. महात्मा ज्योतीराव फुले यांनी, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली… हा विचार मांडला होता. मनुष्याच्या अवनतीचे मूळ हे अज्ञानात असते. त्यामुळे अज्ञानाच अंधार दूर करायचा असेल तर शिक्षणाचा प्रकाश पसरवला पाहीजे. यासाठीच डॉ. नीता नोकरीच्या कक्षेबाहेर जाऊन काम करत आहेत. डॉ. नीता यांचे शिक्षण प्रसाराचे कार्य आणखी जोमात पुढे जावो, यासाठी आपलं महानगरकडून त्यांना शुभेच्छा.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -