ऑनलाईन शिक्षणातील बेबंधशाही

सोशल मीडियाचे विविध अ‍ॅप तसेच शाळा-महाविद्यालयातील शिक्षक-प्राध्यापक ऑनलाइन शिक्षण देण्यात आपली भूमिका बजावत आहेत. पण यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मोबाईलची छोटी स्क्रीन, आवाज तसेच व्हिडिओच्या तांत्रिक अडचणी यामुळे शिक्षकांनी शिकवलेला एखादा विषय विद्यार्थ्यांना कितपत समजला याची पडताळणी होत नाही. मध्यंतरी एका ऑनलाइन व्याख्यानमालेत राजकीय-सामाजिक अभ्यासक प्रा. मिलिंद मुरुगकर यांनी अशा काही गोष्टींवर अनेकांचे लक्ष वेधले होते. ते म्हणाले की, आपत्कालीन ऑनलाइन शिक्षणाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक निवडण्याचे स्वातंत्र्य नाही, वर्ग शिक्षकांचा तास ऐकण्याचे त्यांना बंधन आहे, अनेक खेड्यापाड्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही, लॅपटॉप कमी जणांकडे आहे व पालकांचा मोबाईल विद्यार्थ्यांना किती वेळ मिळेल..? हा प्रश्नच.. वर्गात शिक्षण ही दुहेरी प्रक्रिया असते, ऑनलाइन शिक्षण त्यास पर्याय ठरू शकत नाही.

भारतात आजपासून 25 वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसेल की, मोबाईल वापराच्या बाबतीत आपण एवढे पुढारलेले होऊ…! संगणक इंटरनेट आणि त्यानंतर आपल्या हातात 31 जुलै 1995 ला आलेला मोबाईल हाच आता आपला जिवलग मित्र झालेला आहे. मोबाईल वापराची ही क्रांति प्रत्येक वेळी वेगवेगळा टप्पा पार करून आलेली आहे. फक्त फोन करण्यापुरता मोबाईल आता आपली सगळी काम घरबसल्या करत आहे. अर्थात स्मार्टफोनने सर्वांना स्मार्ट बनवले आहे. (?). विकसित तंत्रज्ञानाबरोबर मानवाने केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. मानवाची जिज्ञासा आणि विकसित दृष्टी यामुळे अशक्य असलेली गोष्ट शक्य होण्यास मदत झाली. मोबाईलच्या क्रांतीला भारतात आज 25 वर्षाचा काळ लोटला आहे. अडीच दशकाच्या कालखंडात स्मार्टफोन आता प्रत्येकाची आवश्यक गरज बनला आहे.आणि हे करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लागू झालेल्या टाळेबंदीने दाखवून दिले. पाठीमागच्या काही लेखात आपण मोबाइल व सोशल मिडियाचा विकास यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. सद्य:स्थितीत सोशल मीडियावरील काही महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत. ज्याची आवश्यकता सुद्धा आहे आणि काळाची गरज सुद्धा….

पहिली गोष्ट अशी आहे की, आपण दरवर्षी पाहत असतो 15 जूनला नियमितपणे शाळा महाविद्यालये सुरू होत असतात. पण यावर्षी अद्यापही शाळा व महाविद्यालय सुरू झालेले नाहीत. कोविड-19 मुळे आणखी काही दिवस शाळा सुरू होतील याची शाश्वती नाही. म्हणून राज्य सरकारने ऑनलाईन वर्गाला मंजुरी देऊन विद्यार्थ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळले आहे.(असा समज आहे.) मुळात ऑनलाईन तासिका सुरू झाल्यापासून पालक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आजही अनेक गावात विजेचा प्रश्न आहे, तिथे नेटवर्क कुठून येणार..? पालकांकडे साधा मोबाईल, तिथे आपल्या मुलांना स्मार्टफोन कुठून देणार..? या आणि अशा अनेक प्रश्नांमुळे पालकांची हतबलता वाढतेय. मानसिक तणाव वाढू नये, मुलांचं आरोग्य सुदृढ राहावं या कारणामुळे मुलांच्या हातात मोबाईल न देणारे पालक आता त्यांना नवीन स्मार्टफोन घेऊन देत आहेत हासुद्धा मोठा बदल आज पाहायला मिळतोय.

सोशल मीडियाचे विविध अ‍ॅप तसेच शाळा-महाविद्यालयातील शिक्षक-प्राध्यापक ऑनलाइन शिक्षण देण्यात आपली भूमिका बजावत आहेत. पण यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मोबाईलची छोटी स्क्रीन, आवाज तसेच व्हिडिओच्या तांत्रिक अडचणी यामुळे शिक्षकांनी शिकवलेला एखादा विषय विद्यार्थ्यांना कितपत समजला याची पडताळणी होत नाही. मध्यंतरी एका ऑनलाइन व्याख्यानमालेत राजकीय-सामाजिक अभ्यासक प्रा. मिलिंद मुरुगकर यांनी अशा काही गोष्टींवर अनेकांचे लक्ष वेधले होते. ते म्हणाले की, आपत्कालीन ऑनलाइन शिक्षणाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक निवडण्याचे स्वातंत्र्य नाही, वर्ग शिक्षकांचा तास ऐकण्याचे त्यांना बंधन आहे, अनेक खेड्यापाड्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही, लॅपटॉप कमी जणांकडे आहे व पालकांचा मोबाईल विद्यार्थ्यांना किती वेळ मिळेल..? हा प्रश्नच.. वर्गात शिक्षण ही दुहेरी प्रक्रिया असते, ऑनलाइन शिक्षण त्यास पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे फक्त सोशल मीडिया विकसित होईल विद्यार्थी नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले. एकूणच काय तर शाळा आणि विद्यापीठ स्तरांवर आपण सरसकट ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडू शकत नाही. असे जर झाले तर उद्याची पिढी मोबाईल वेडी होऊ शकते. असे भाकीत तज्ञ व्यक्त करत आहेत.

दुसर्‍या आणि महत्त्वाच्या गोष्टीविषयी आपण चर्चा करुयात ते म्हणजे लाइव्ह येण्याबद्दल… आजकाल कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रातील लोकांचा लाईव्ह येण्यावर जास्तीत जास्त भर आहे. टाळेबंदीने तशी सवय लावली असे बोलले तर वावगे ठरणार नाही. गेल्या पाच महिन्यात ज्यांनी मोबाईलमधील काही महत्त्वाचे अ‍ॅप सोडून वापर केला नाही. त्यांनीसुद्धा झूम, गुगल प्लस, फेसबूक लाईव्ह इत्यादी सोशल मीडिया अ‍ॅपचा वापर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. समाज माध्यमांचा वापर करताना सामाजिक नाळ तुटू दिली नाही हेही तितकेच खरे.. विविध चर्चासत्रे, व्याख्याने, वेबिनार, खाजगी-शासकीय स्तरावरील बैठका या संपूर्णपणे लाईव्ह होत आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे. समोरची दिशा ठरवली जातेय. यावरून आपल्या लक्षात येते की, आपण समाज माध्यमांद्वारे व्यक्त होता-होता स्मार्टफोनसह त्याला आपली आवश्यक गरज बनवली आहे.

आता आपण चर्चा करू इतर लाईव्ह प्रयोगांबद्दल… वेबिनारसह आपण सर्वांनी कोणत्या ना कोणत्या लाईव्ह कार्यक्रमात सहभाग घेतला असेलच..,जरी आपण प्रत्यक्ष त्यात नसलो तरी श्रोता म्हणून आपण दिलेली उपस्थिती तितकीच गृहीत असते. टाळेबंदीच्या काळात फेसबूवर त्या-त्या क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने पेज तयार करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा ते म्हणजे कविता, साहित्यविषयक, महापुरुषांच्या विचारांचा ग्रुप तसेच काही विषय घेऊन व्याख्यान इत्यादी पेजचा आलेख सर्वाधिक आहे. नवकविपासून ते ज्येष्ठ कवींनी आपल्या लाईव्ह सादरीकरणातून रसिकांना मेजवानी दिली. यामध्ये नवीन लिहिणार्‍या युवा कवींची उपस्थिती जास्त होती. काही ज्येष्ठ कवी लेखकांनी कवींच्या आणि वक्त्यांच्या लाईव्ह येण्यावर टीका-टिप्पणी केली…. युवा कवींचा दर्जा खालावला आहे, कवितेच्या लाईव्ह कार्यक्रमांमुळे साहित्यिक कवितेचे मूल्य हरवतेय. असे अनेकांनी बोलून दाखवले. हेच व्याख्यानांच्या बाबतीतही…पण यात एक गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे संवैधानिक मार्गाने व्यक्त होणारे कवी, व्याख्याते हे देशासाठी कधीच घातक नसतात. त्यांना एखाद्या महत्त्वाच्या व्यासपीठावर बोलू दिले जात नाही त्यावेळी त्यांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून ते या फेसबूक लाईव्हचा वापर करतात.अशावेळी त्यांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रसंगी चुकत असेल तर समज दिली पाहिजे.

आपल्या अवतीभवती अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तात्काळ इतरांना दाखवता येतात, लोकांपर्यंत पोहोचवता येतात. सोशल मीडियाद्वारे त्या पोहोचत आहेत पण ज्यावेळी अशा गोष्टींचा भडीमार होतो त्यावेळी त्याकडे गांभीर्याने बघितलं जात नाही. कुठेतरी थांबणे महत्त्वाचे असते. स्वतः काही बंधने स्वीकारली आणि चांगले ते देण्याचा प्रयत्न केला तर सोशल मीडिया समाजाचा आरसा होईल. मित्रांनो मोबाईल आता आपल्या हातातून सुटणार नाही. अडीच दशकांची वाटचाल किती उपयोगी आणि अपायकारक होती याची नोंद घेतली जाईलच… पण समोरची वाटचाल कशी असावी हे आपल्या हातात आहे. कारण हातातला स्मार्टफोन आता स्मार्ट होणार्‍या पिढीचं प्रतिनिधित्व करतोय. आपण ऑनलाइन आहोत पण आयुष्य ऑफलाईन होणार नाही याची दक्षता घेणे हे आपल्यासमोरचे मोठे आवाहन आहे. लाईव्ह येऊन तात्काळ बातमी देऊन, आपण व्हायरल होतोय, प्रसिद्धी मिळवतोय… पण व्हायरल तर एखादा जीवघेणा व्हायरस पण होतो. सोशल मीडियाच्या अतिरेकी वापराचा व्हायरस आपल्यापासून दूर राहावा या निमित्ताने एवढेच….

-धम्मपाल जाधव