घरफिचर्सहिंदूंच्या सहिष्णुतेचे राम मंदिर

हिंदूंच्या सहिष्णुतेचे राम मंदिर

Subscribe
अयोध्येत श्रीरामाच्या जन्मस्थळी राम मंदिराची उभारणी कधी होणार याची प्रतीक्षा गेली अनेक शतके हिंदू जनमानसाला होती, ती पूर्ण झाली आहे. बाबराच्या आदेशावरून या जागेवर रामाचे प्राचीन मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद बांधण्यात आली होती. कारण उत्खननातून मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडले होते. भारत हा हिंदूबहुल देश आहे. तसे म्हटले तर सर्व हिंदूंनी एकमुखाने इथे राम मंदिर उभारायचे ठरवले असते, तर त्यांना कुणी अडवू शकले असते का; पण इतरांचा मान राखून त्यातून मार्ग काढण्याची भूमिका घेतल्यामुळे हे प्रकरण अनेक वर्षे न्यायालयात चालले. जगभरात प्रत्येक धर्मियांची श्रद्धास्थाने आहेत. त्यांची आराध्य दैवते आहेत. पण हिंदूबहुल असलेल्या भारतामध्ये श्रीराम या आराध्य दैवताचे मंदिर उद्ध्वस्त करून तिथे मशीद बांधण्यात आल्याच्या अन्यायाविरोधात हिंदूंना अनेक शतके लढावे लागले, इतकेच नव्हे तर अनेक वर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागला. सगळे सनदशीर मार्ग पत्करण्यात आले. बाबराचा मार्ग पत्करला असता तर मंदिर कधीच झाले असते; पण तसे करण्यात आले नाही, म्हणूनच हे हिंदूंच्या सहिष्णुतेचे राम मंदिर आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर उभारणे हा खरं तर भारतासारख्या हिंदूबहुल देशांमध्ये फार लांबणारा मुद्दा व्हायला नको होता. कारण ज्या देशात हिंदू बहुसंख्येने राहतात आणि राम हे त्यांचे आराध्य दैवत आहे, त्या ठिकाणी रामाचे मंदिर उभारण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी इतका कालावधी का लागावा, असा प्रश्न जगभरातील विचारवंतांना आणि अभ्यासकांना पडला आहे. अयोध्येत ज्या ठिकाणी रामाचे मंदिर होते त्या ठिकाणी १५२८ साली  बाबराच्या आदेशावरून त्याचा सेनापती मीर बाकी याने मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबराच्या नावाने मशीद उभारली. त्याला आता इतकी वर्षे उलटून गेली तरी त्या ठिकाणी राम मंदिर उभे राहू शकले नाही. कुणी बाबरी मशिदीच्या जागी पुन्हा रामाचे मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला नाही. कारण इतक्या वर्षांच्या कालावधीत भारतात इतके पराक्रमी हिंदू राजे होऊन गेले; पण त्यापैकी कुणालाही रामाच्या मंदिराच्या जागेवर उभ्या असलेल्या बाबरी मशिदीला बाजूला करून त्या ठिकाणी हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या रामाचे मंदिर पुन्हा उभारावे असे का वाटले नाही. यामागे राम मंदिर उभारण्यासाठी विविध हिंदू राज्यांमध्ये एकवाक्यता नव्हती की, मुस्लीम शासकांच्या दहशतीचा अनुभव आल्यामुळे त्यांनी राम मंदिराच्या विषयाकडे दुर्लक्ष केले होते? ज्या देशात हिंदू बहुसंख्येने राहतात, तिथे सर्व हिंदूंनी मिळून राम मंदिर उभारायचे ठरवले असते तर त्यांना कुणीही अडविले नसते. मग या देशातील हिंदूंनी तसे का केले नाही. त्यासाठी त्यांना अडवणारी अशी कुठली गोष्ट होती? असे अनेक प्रश्न राम मंदिराची पायाभरणी झाल्यानंतर मनात आल्याशिवाय राहत नाहीत.

या देशात हिंदू बहुसंख्येेने होते. भारतावर आक्रमण करणारे मुस्लीम हे अल्पसंख्य होते; पण त्यांच्या आक्रमक आणि दहशतीपुढे हिंदू बहुसंख्येने असले तरी ते दबून गेलेले होते. त्यामुळेच त्यांना राम मंदिराचा विषय कितीही मनात आला तरी तो बाजूला ठेवावा लागला असावा. गेली अनेक शतके हा प्रश्न असाच चालत आलेला आहे. मुस्लिमांच्या दहशतीमुळे रामाचे मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आली. तशाच मुस्लीम दहशतीमुळे भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली, इतकेच नव्हे तर आता राम मंदिराची जी पायभरणी झाली, त्यालाही एका वेगळ्या प्रकारे मुस्लीम दहशतच कारणीभूत आहे. त्यामुळे या देशात मुस्लीम जरी अल्पसंख्य असले तरी बहुसंख्य हिंदू हे कसे त्यांच्या दहशतीखाली वावरतात, हेच यातून दिसून आलेले आहे. शहाबानो या नवर्‍याने तलाक दिलेल्या मुस्लीम महिलेला सर्वोच्च न्यायालयाने पोटगी देण्याचा आदेश दिला होता; पण मुस्लीम मुल्ला-मौलवी आणि मुस्लीम समाज यांचा रोष ओढवून घेणे योग्य नाही, अशी भीती तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना वाटली. अर्थात, यामागे एकगठ्ठा मतांचे राजकारण होते हा भाग वेगळा. मुस्लीम समाज आणि विशेषत: मुस्लीम महिला यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा असणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राजीव गांधी यांनी संसदेतील बहुमताच्या आधारे रद्द केला. अलीकडे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तिहेरी तलाक बंदीचा कायदा करण्यात आला. राजीव गांधी यांनी तलाकपीडित मुस्लीम महिलेला पोटगी देण्याचा कायदा रद्द केल्यानंतर हिंदू समाज आपल्यावर नाराज होईल, हे लक्षात आल्यानंतर त्यांंनी त्यांचे त्यावेळचे सल्लागार अरूण नेहरू आणि अन्य मंडळींच्या सल्ल्यावरून अयोध्येतील रामलल्लाचे जन्मस्थळ हिंदूंना दर्शनासाठी खुले केले. एका बाजूला बाबरी मशीद आणि रामजन्मभूमीचा विषय न्यायालयात सुरू होता. त्यावर वादप्रतिवाद सुरू होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांनी या विषयाबद्दल जनमानसात जागृती करायला सुरुवात केलेली होती. पुढे जेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हे लक्षात आले की, राम मंदिर हा हिंदूंच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तो अनेक शतके उपेक्षित आहे. वेळी त्यांनी हा विषय राजकीय पातळीवरून हाताळण्यास सुरुवात केली. त्यातूनच मग ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा घुमू लागला आणि त्या दिशेने जोरदार घोडदौड सुरू झाली.
लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिर उभारणीसाठी जनमानसात जागृती करण्यासाठी देशभर रथयात्रा काढली. त्यातून हिंदू लोकांनाही असे वाटू लागले की, हिंदूबहुल देशात श्रीरामाचे मंदिर का होऊ शकत नाही. परिणामी देशभर याविषयी वातावरण तापत गेले आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद कारसेवेच्या माध्यमातून पाडण्यात आली. त्यावरून भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांवर खटले चालले. मुस्लीम दहशतीपुढे काँग्रेसने वेळोवेळी नांगी टाकलेली  आहे. त्याचे पहिले उदाहरण म्हणजे भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची झालेली निर्मिती, त्यानंतर पाकिस्तानने काश्मीरवर अचानक हल्ला करून अर्धा काश्मीर बळकावल्यानंतर सैन्याच्या माध्यमातून पाकिस्तानला तिथून हुसकावून लावणे शक्य होते; पण तो प्रश्न तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संयुक्त राष्ट्रसंघात नेला. त्या प्रश्नाचे आजवर उत्तर निघालेले नाही. काश्मीरच्या मुद्यावर अनेकांचे बळी गेलेले आहेत. याच देशाचे नागरिक असलेल्या काश्मिरी पंडितांची अमानुष कत्तल होऊन त्यांना आपली घरेदारे सोडून पळ काढावा लागला. काँग्रेसचे नेते हिंदू असले तरी त्यांना राम मंदिर व्हावे, असे कधीच वाटले नाही. उलट, कपिल सिब्बल यांच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी न्यायालयात राम मंदिराच्या विरोधात वकीलपत्र घेतले. पण जेव्हा मंदिरांमधील देवीदेवतांच्या दर्शनामुळे हिंदूंची मते मिळतात, हे माहीत झाल्यावर राहुल गांधी यांनी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींंना नमवण्यासाठी तेथील अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेण्याचा सपाटा लावला.
राम मंदिरासाठी न्यायालयीन खटले आणि सामाजिक पातळीवर आंदोलने सुरू होती, तरी त्याला खरा जोर लालकृष्ण अडवाणी या आंदोलनात उतरले त्यावेळीच आला. या आंदोलनामुळे हिंदूंच्या मनातील अनेक शतकांपासून असलेली खंत दूर झाली आणि त्याचसोबत भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता केंद्रात आली. पण पुढे राम मंदिराचा मुद्दा पुन्हा न्यायालयात गेला. बाबरी मशीद पाडण्यावरून अनेकांवर खटले चालले. राम मंदिर होणार की नाही, याबद्दल काही निश्चित कळत नव्हते. पुढे नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला आणि ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आणि त्यांनी लोकसभेचे मैदान मारले. त्यावेळी पहिल्यांदाच भाजपचे बहुमतातील सरकार केंद्रात सत्तेत आले.
भाजपच्या अजेंड्यावर  काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे, राम मंदिर उभारणे, समान नागरी कायदा हे तीन विषय होते. त्यातील पहिले दोन विषय पूर्ण झालेले आहेत. तिहेरी तलाकवर बंदी आणून समान नागरी कायद्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आलेले आहे. पण हे सगळे करण्यासाठी अनेक वर्षे न्यायालयीन लढाई लढावी लागली. अन्य कुठल्याही देशात जिथे विशिष्ट धर्मियांची बहुसंख्या आहे, तिथे इतकी दीर्घ प्रक्रिया चालवावी लागली असती का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच काय हिंदूंची बहुसंख्या असली तरी सगळ्या गोष्टी त्यांनी कायद्याच्या प्रक्रियेतून मंजूर करून घेतल्या आहेत. बहुसंख्येच्या बळावर बर्‍याच गोष्टी करता येतात; पण तसे त्यांनी केले नाही. यातूनच त्यांची सहिष्णुता दिसून येते. अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची पायाभरणी झाली आहे. खरे तर हे हिंदूंच्या सहिष्णुतेचे मंदिर आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -