घरफिचर्सखंत एका संगीतकाराची आणि एका गीतकाराची!

खंत एका संगीतकाराची आणि एका गीतकाराची!

Subscribe

अशोक पत्कींसारखे संगीतकार हे मागच्या काळातल्या संगीताच्या सोनेरी युगाचे एक शिलेदार आहेत. साक्षीदार तर आहेतच. आजच्या संगीताबद्दल त्यांची एक तक्रार असते ती अशी की आजच्या संगीतातून मेलडी हद्दपार होत चालली आहे. कालपरवा तर ते असंही म्हणाले की, आजच्या गाण्यातून तो गोडवा जात चालला आहे. सोनेरी युगाच्या शिलेदाराची ही साक्ष आज ग्राह्य मानायलाच हवी ह्याचं कारण अशोक पत्की नावाच्या संगीतातल्या कलावंताचं आजवरच प्रचंड देणं हे तर आहेच, पण त्यापेक्षाही अशोक पत्कींचा मृदू स्वभाव. त्यांचा स्वभाव काही रोखठोक बोलण्याचा नव्हे, पण आजच्या संगीताबद्दलची खदखद ते आता व्यक्त करू लागले आहेत हे नक्की.

खरंतर चालू काळातल्या कोणत्याही चालू कलाकृतीबद्दल कुणी प्रतिकूल मतं व्यक्त केली की एक सर्वसाधारण शेरा मारला जातो की, झाला, हा म्हातारा झाला…किंवा आता हे बोलत नाहीत तर हे ह्याचं स्पर्धेतून बाहेर फेकलं जाण्याचं वैफल्य बोलतंय. पण अशोक पत्कींच्या बाबतीत सांगायचं तर आजच्या काळातल्या संगीताच्या प्रवाहाशी सामना करत ते आजही संगीत देत आहेत. आजच्या नौजवानांच्या संगीताशी दोन हात करत त्यांनी ‘राधा ही बावरी’ हे गाणं केलं, जे नौजवानांच्या टोळक्यात कमालीचं लोकप्रिय झालं. विशेष म्हणजे आजची मुलं चॅनेलवर चालणार्‍या मालिकांसाठी जी शीर्षकगीतं करतात त्यापेक्षाही हटके शीर्षकगीतं अशोक पत्की करतात, जी त्या मालिका संपल्यानंतरही पुढे कितीतरी काळ रसिकांच्या मनात तरळत राहतात, कित्येकांच्या मोबाइलवर रिंगटोन बनूून वाजत राहतात. ‘आभाळमाया’ ही मालिका संपून आता कित्येक काळ लोटला आहे, पण ‘तुला पाहते रे’ ह्या मालिकेचं शीर्षकगीत हे तर ह्याचं जितंजागतं उदाहरण म्हणून सांगता येईल!

…तर हे सगळं सांगायचा मुद्दा हा की आजच्या संगीतातून मेलडी हरवत चालली आहे किंवा तो गोडवा जात चालला आहे हे कोण सांगत आहे हे कळावं! श्रीनिवास खळे, सुधीर फडके, यशवंत देव ह्यांच्यासारख्या दिग्गजांनी गाजवलेल्या काळात आपलं संगीत पेश केलेला एक कलावंत असं म्हणतो आहे आणि म्हणून ते दखलपात्र आहे.

- Advertisement -

अशोक पत्की आज असं का म्हणताहेत?

आजचं संगीत करण्याबद्दलची विचारप्रक्रिया बदलली असेल, पण त्या प्रक्रियेत संगीत करणं हाच विचार, हाच उद्देश आणि हीच प्रेरणा आहे. पण मग असं काय झालं की अशोक पत्की म्हणतात त्याप्रमाणे एकाएकी संगीतातली मेलडी, संगीतातला गोडवा हरवत जात चालला आहे? आजचा सगळा काळ जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी टेक्नॉलॉजीने व्यापून टाकला आहे हे खरं आहे, पण संगीतातली खरी गंमत, खरं सौंदर्य हरवून जाईल इतकी ही टेक्नॉलॉजी आजच्या संगीतावर पूर्णपणे स्वार झाली आहे हे निर्विवाद सत्य आहे. कालच्या संगीताला सुरेल म्हटलं जात होतं. कारकिर्द ह्या शब्दाला जसं आपोआप देदीप्यमान हे विशेषण चिकटतं, तसं कालच्या संगीताला सुरेल म्हटलं जायचं, पण आजच्या संगीताला सुरेल म्हणता येईलच अशी परिस्थिती नाही. आजचं संगीत सुरेल असण्यापेक्षा टेक्नॉलॉजिकल झालं आहे. आजचं सबंध जग टेक्नॉलॉजिकल झालं आहे हे मान्य, पण संगीतासारख्या कलेने ती टेक्नॉलाजी आपल्या सर्वांगावर चढवून पेश व्हावं हे मान्य होण्यासारखं नाही.

- Advertisement -

आजच्या ह्या टेक्नॉलॉजीच्या काळात गाण्याबद्दलचे अभिप्रायही बदलू लागले आहेत. फार पूर्वी गाण्याबद्दल श्रवणीय, कर्णमधूर असं म्हटलं जायचं, आता ते शब्दही कालबाह्य झाले आहेत. आता आजच्या काळाला सुसंगत असे ऑसम, माइंडब्लोइंग, फॅब्युलस असे शब्द आले आहेत. म्हणजे गाणं मराठी भावभावनेचं, नाजूकसाजूक शब्दकळेचं असतं, त्यात मुग्धमधूर, कुसुमकोमल भावना व्यक्त करणारी अक्षरयात्रा असते, पण नव्या पिढीसाठी ते गाणं फक्त ‘अमेझिंग’ असतं. आजच्या गाण्याबद्दलची, आजच्या संगीताबद्दलची रसिकता तिथून सुरू होते. कालच्या सर्वांगाने समृध्द असलेल्या रसिकतेला तिथूनच खिळ बसायला सुरूवात होते. कोणे एके काळी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात दिलीपकुमारसारख्या अभिनेत्याने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या गाण्याबद्दल ‘लता की आवाज कुदरत का एक अद्भूत करिष्मा हैं’, असं म्हटलेलं असतं. आता तो कुदरत का करिष्माही राहत नाही, जादुई आवाज असंही कुणी म्हणत नाही, आता गाण्यातला आवाज एकतर माइंडब्लोइंग असतो, नाहीतर चाबूक!

गाण्याबद्दलची रसिकता, आवडनिवड तिथूनच बदलायला लागते. गाण्याबद्दलच्या लोकांच्या अभिरूचीला समर्थ वळण लावता येत नसेल तर नसू दे, पण किमान ती बिघडवू तरी नका असं खूप वाटत असतं. पण आज ती परिस्थिती पार पुढे निघून गेली आहे. त्यामुळे अशोक पत्कींसारख्या संगीतकाराला आपल्या मनातली खंत अशी वारंवार व्यक्त करावी लागत आहे.

अशोक पत्कींची ही खंत झाली, पण कवी-गीतकार गुरू ठाकूरचं वेगळंच म्हणणं आहे. त्याने अलिकडेच म्हटलं आहे की आजवर मी जी गाणी लिहिली आहेत ती संगीतकारांनी आधीच करून ठेवलेल्या चालीवर, पण कधीतरी आपण आधीच लिहून ठेवलेल्या कवितेला कुणी चाल द्यावी असं मला वाटतं. अलिकडेच गीतकार योगशजींचं निधन झालं. त्याचंही हेच म्हणणं होतं. आधी केलेल्या चालीशिवायचं तुमचं गाणं कोणतं, असा जर कुणी आपल्याला प्रश्न केला तर आपल्याला एकही गाणं सांगता येणार नाही, असं ते नेहमी म्हणायचे. सी.रामचंद्रंचं म्हणणं असायचं की, आधी चाल करून त्यावर गीतकाराकडून शब्द लिहून घेण्याचा प्रकार करून घेतला जातो हे खरं आहे, पण तो प्रकार, आधी झबलं-टोपरं तयार करून नंतर त्या मापाचं बाळ जन्माला घालण्यासारखं आहे. गुरू ठाकूर किंवा योगेशजींच्या म्हणण्यावरून एक लक्षात येतं की संगीतकारांच्या सुरांना कवी-गीतकार शब्द लिहून न्याय देतात, पण कधीतरी कवीच्या मनात दडलेल्या शब्दांवर संगीतकारानेही आपल्या सुरांचे अलंकार चढवावेत. अर्थात, आता तो पायंडा पडून गेला आहे. त्यामुळे गुरू ठाकूरसारख्या कवीला आता आपली खंत केवळ व्यक्तच करत राहावी लागणार आहे. आता त्यावर उपाय नोहे! फक्त संगीतातल्या दोन कलाकारांचे हे बोल ऐकले आणि त्यावर लिहावंसं वाटलं इतकंच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -