Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर फिचर्स दिस नकळत जाई…

दिस नकळत जाई…

‘आपली माणसं’ या सिनेमासाठी लिहिताना तो सहज लिहून गेला, ‘नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दु:ख चाहूल घेते.’ रेकॉर्डिंगच्या वेळी ते गाणं गाता गाता आशा भोसलेंच्या डोळ्यात पाणी कधी आलं ते त्यांचं त्यांनाच कळलं नव्हतं. जखमेची खपली काढणारी अशी गाणी लिहू नका रे बाबांनो, असंही त्या म्हणता म्हणता म्हणून गेल्या होत्या. किशोर कदमच्या तरल शब्दांना असलेली धार अशा प्रकारची होती.

Mumbai

भावगीतांचे, भावकवितांचे ते दिवस! त्या दिवसांत नवनवीन कवींकडून नवनवीन कविता जन्माला येत. त्या चाली लावण्याजोग्या असल्या तर त्याला नवनवीन संगीतकारांकडून चाली लावल्या जात.

अशाच त्या दिवसांंतला असाच एक दिवस भावगीतं ज्यांच्या आवाजात फुलली, बहरली आणि दरवळली त्या अरूण दातेंच्या घरातला. त्या दिवशी त्यांचा मुलगा अतुल दाते त्याचा संगीतकार मित्र मिलिंद इंगळेसोबत बसला होता. सोबत कवी किशोर कदम उर्फ सौमित्र होता आणि त्यांचे इतरही काही संगीतप्रेमी मित्र होते.

झालं होतं असं की किशोर कदमने लिहिलेल्या एका नव्या कवितेला संगीतकार मिलिंद इंगळेने चाल लावली होती आणि ती चाल तो हार्मोनियम साथीला घेऊन ऐकवत होता. इतर सगळे त्या नवजात चालीचा रसिकतेने आस्वाद घेत होते. गाण्याचे शब्द होेते-

दिस नकळत जाई,
सांज रेंगाळून राही,
क्षण एकही न ज्याला
तुझी आठवण नाही!

अतिशय सहजसोपे, तरल शब्द…आणि त्याला तशीच सहजसोपी आणि तरल चाल…आज तू सोबत नाहीस, पण तुझ्या पश्चात तुझं अस्तित्व मन भरून राहिलं आहे. त्याने बेचैनी वाढते आहे. त्या बचैनीत दिवस कसा तरी निघून जातो; पण कातरवेळी मात्र मनाची तगमग होते. ती कातरवेळ मात्र तशीच तिथल्या तिथे रेंगाळत राहते. एका प्रेमिकाच्या मनातला हा दर्द शब्दांत अगदी अचूक पकडल्यामुळे त्या शब्दांना मिळणार्‍या सुरांतूनही तसाच साजेसा दर्द मिळणं आवश्यक होतं.
मिलिंद इंगळे हा तसा त्यावेळी ताज्या दमाचा संगीतकार म्हणून पुढे येण्याच्या प्रयत्नात होता आणि अरूण दातेंच्या घरातली ती त्यांची मैफल त्यांच्या त्या प्रयत्नाचाच एक हिस्सा होती. त्या दिवशीचं ते गाणं हा त्या प्रयत्नाचाच एक पैलू होता. किशोर कदमने गाण्याचा पुढचा अंतराही तसाच हळवा, पण व्याकूळ लिहिला होता –

भेट तुझी ती पहिली
लाख लाख आठवतो.
रूप तुझे ते धुक्याचे
कण कण साठवतो.
वेड सखीसाजणी हे
मज वेडावून जाई.
क्षण एकही न ज्याला
तुझी आठवण नाही!

किशोर कदमच्या कवितेचं हे वैशिष्ठ्य राहिलं आहे की त्याच्या कवितेचं गाणं बनताना त्यात कवितेचा निष्कारण घनगंभीर आव आणला गेला नाही. गाण्यात रूपांतर होणारी त्याची कविता कायम तरल शब्दांत हलका घाव घालणारी राहिली. म्हणूनच ‘आपली माणसं’ या सिनेमासाठी लिहिताना तो सहज लिहून गेला, ‘नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दु:ख चाहूल घेते.’ रेकॉर्डिंगच्या वेळी ते गाणं गाता गाता आशा भोसलेंच्या डोळ्यात पाणी कधी आलं ते त्यांचं त्यांनाच कळलं नव्हतं. जखमेची खपली काढणारी अशी गाणी लिहू नका रे बाबांनो, असंही त्या म्हणता म्हणता म्हणून गेल्या होत्या. किशोर कदमच्या तरल शब्दांना असलेली धार अशा प्रकारची होती. संगीतकाराने ती ओळखली की त्या शब्दांना तशी चाल लावायला वेळ लागत नसे.

‘दिस नकळत जाई’ या तरल शब्दांतली ती धार मिलिंद इंगळेने अगदी छान ओळखली म्हणूनच तिला अगदी अनुरूप चाल लागू शकली, जणू त्या शब्दांत जी चाल दडली होती ती त्याने शब्द उलगडताच त्याला सहज सापडली. गाण्याच्या तीन अंतर्‍यांना त्या त्या शब्दांतल्या भावभावना ओळखून त्याने तीन वेगवेगळ्या चाली लावल्या; पण अस्ताईवर येताना ठिगळ लावल्यासारख्या न वाटणार्‍या. त्यातल्या एका अंतर्‍यातले शब्द पहा-

असा भरून ये उर
जसा वळीव भरावा.
अशी हुरहूर जसा
गंध रानी पसरावा.
रान मनातले माझ्या
मग भिजुनिया जाई.
क्षण एकही न ज्याला
तुझी आठवण नाही!

यातल्या दुसर्‍या ओळीचा समारोप करताना ‘भरावा’ या शब्दानंतर घेतलेली तेवढ्यास तेवढी तान हा तर या सुंदर गाण्याचा तेवढ्यास तेवढा साजशृंगार.

असो…तर असं हे गाणं अरूण दातेंच्या घरी गायलं जात असताना अचानक अरूण दाते घरात आले. मिलिंद इंगळेंसह सगळी मैफल त्यांच्या अचानक येण्याने काहीशी ओशाळली. कारण अरूण दाते हे भावगीतातलं आघाडीचं नाव होतं. पण त्यांनी ती मैफल चालू ठेवायला सांगितली आणि आतल्या खोलीत जाऊन हे गाणं ऐकलं. त्यांना ते गाणं भावलं. गाणं संपताच ते बाहेर आले, म्हणाले, गाणं अतिशय छान आहे, हे गाणं गायची माझी तयारी आहे.

यथावकाश हे गाणं रेकॉर्ड झालं. लोकांपर्यंत पोहोचलं. इतकं पोहोचलं की अरूण दातेंच्या गाजलेल्या ‘शुक्रतारा’ या कार्यक्रमात या गाण्याच्या फर्माइशीही येऊ लागल्या!…समजा, त्या दिवशी त्यांच्या घरी मिलिंद इंगळेची ती मैफल झाली नसती तर…