घरफिचर्सआदिवासींची वाघबारस !

आदिवासींची वाघबारस !

Subscribe

वाघाने आपल्यावर हल्ला करु नये म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाघाचे पूजन केले जाते. या सणाला वाघबारस म्हणतात. इतरत्र वसुबारस सण साजरा होत असताना आदिवासी पाड्यांवर वाघबारस साजरी होते. वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा मोठा दिवस. काही गावांमध्ये गाईगुरांचे रक्षण व्हावे म्हणून वाघाच्या मंदिरात कोंबड्याचा बळी दिला जातो. तसेच काही भागात डांगर, तांदळाच्या खिरीचा नैवद्यही दाखवला जातो.

निसर्ग आणि आदिवासी समाज हे दोन्ही परस्परपूरक घटक..निसर्गपूजक म्हणून ओळखल्या जाणार्‍या आदिवासींमध्ये प्रत्येक सणात निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. अर्थात त्यात निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला जातोच, शिवाय स्वसंरक्षणासाठीही निसर्गाला साकडं घातलं जातं. दिवाळीच्या काळात साजरी होणारी वाघबारसदेखील यातीलच एक. खरं तर, आदिवासींनी वाघाला देव मानलं आहे. म्हणूनच काही भागांत वाघोबाची मंदिरे पहावयास मिळतात. अनेक ग्रामदैवतांच्या मंदिराच्या बाहेरही वाघांच्या मूर्ती दिसतात. उत्तर महाराष्ट्रातील अनेक आदिवासी पाड्यांवर अशी वाघाची मंदिरे दिसतात. इगतपुरी तालुक्यात म्हैसवळण घाटात, आंबेगाव तालुक्यात पोखरीजवळ वैदवाडी येथे अशा मंदिरांची संख्या अधिक आहे. घाटरस्त्यांना आपल्याला असे मंदिरे दिसतात.

वाघाने आपल्यावर हल्ला करु नये म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाघाचे पूजन केले जाते. या सणाला वाघबारस म्हणतात. इतरत्र वसुबारस सण साजरा होत असताना आदिवासी पाड्यांवर वाघबारस साजरी होते. वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा मोठा दिवस. काही गावांमध्ये गाईगुरांचे रक्षण व्हावे म्हणून वाघाच्या मंदिरात कोंबड्याचा बळी दिला जातो. तसेच काही भागात डांगर, तांदळाच्या खिरीचा नैवद्यही दाखवला जातो. काही ठिकाणी लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करुन त्यावर शेंदूर लावलेला दिसतो. या चित्राचे पूजन करून वाघबारस सण साजरा होतो. वाघबारसच्या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीने वाघाच्या जंगलातून लाकूडफाटा आणला, तर त्याला वाघोबा काहीतरी शिक्षा म्हणून त्याच्या दारात येऊन गुरगुरतो किंवा त्याच्या पाळीव प्राण्यावर हल्ला करतो, अशा अख्यायिका जुन्याजाणत्या लोकांकडून सांगितल्या जातात. अशाच काही अख्यायिकांनुसार, सणाच्या एक महिना आधी आदिवासींचे सारे देव रानात पारध करण्यासाठी गेलेले असतात. ते वाघबारसेला घरी येतात. त्यामुळे या दिवसाला आदिवासी जीवनात एक वेगळे महत्व आहे. वाघबारसच्या निमित्ताने लोक शेतकाम बंद ठेवतात.

- Advertisement -

पूर्वी बहुसंख्य आदिवासी कुटुंबात पन्नासपेक्षा जास्त पाळीव जनावरे असत. त्यांच्या निगराणीसाठी गुराखी असत. नवीन कपडे परिधान करुन गुराखी आनंदोत्सव साजरा करत. आजही गुराखी वाघबारसला नवीन कपडे परिधान करतात. तसेच प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करुन संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणतात. या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळी, मुले आणि मुली एकत्र येतात. वाघोबाच्या मंदिराच्या संपूर्ण परिसरात गाईचे शेण व गोमूत्र शिंपले जाते. रात्री येथे कोणीही थांबत नाही. गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटवली जाते. सगळे लोक तेथे जमतात. गुराखी मुले हे वाघ, अस्वल, कोल्हा अशी रुपे घेऊन खेळ खेळतात. एखाद्याला वाघ बनवले जाते. या वाघाला पळायला लावून ‘आमच्या शिवारी येशील का’ असे विचारले जाते. वाघ झालेला गुराखी ‘नाही नाही’ म्हणातो. पण.. जंगलातून वाघ संपले तसे वाघाची भीतीही संपली. भीती गेल्यामुळे वाघबारस साजरी करण्याची प्रथा आता लोप पावत चालली आहे. आदिवासींकडील जनावरांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या उत्साहात हा सण आता साजरा होताना दिसत नाही. कालौघात वाघबारस ही प्रथा नैवेद्यापुरती मर्यादित राहण्याची परिस्थिती आहे.

खान्देशातील खोपडी बारस
खान्देशात दिवाळीचा समारोप खोपडी बारसने होतो. हा प्रामुख्याने खान्देशातील शेतकरी बांधवांचा सण आहे. यात प्रथमत: तुळशीचा विवाह होतो. श्रीकृष्ण व तुळशी यांचा हा विधिवत विवाह सोहळा असतो. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सुशोभित केले जाते. भोवती रांगळी काढतात. वृंदावनात पाच ऊस पुरुन आवळे व चिंचा टाकल्या जातात. तुळशीच्या चारही बाजूंनी उसाचा मंडप उभारतात. तिला सौभाग्यलेणं, साज, वस्त्र देऊन सजवतात. तुळस आणि विवाहसमयी एका बाजूस श्रीकृष्ण तर दुसर्‍या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्ये अंतरपाट धरला जातो. सर्वांना अक्षता वाटल्या जातात. मंगलाष्टके म्हटली जातात व श्रीकृष्ण तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो. ‘बोर भाजी आवळा- उठ उठ सावळा’, अशी आळवणी करुन आता विवाह सोहळे सुरु होऊ दे, अशी देवांना प्रार्थना केली जाते.

- Advertisement -

तुलसी विवाह झाल्यावर लहान मुलाला श्रीकृष्ण म्हणून खोपडीत बसवून त्याला शेतमालाचे भाव विचारण्याची प्रथा खान्देशातील शेतकर्‍यांनी पाळलेली दिसते. या दिवशी भावकी जमा होते. पाच उसांच्या खोपडीला नैवद्याचे ताट दाखविले जाते. त्यानंतर खोपडीत बसवलेल्या लहान मुलाला धान्याचा भाव विचारला जातो. त्याने अस्तित्वात असलेल्या भावापेक्षा अधिक सांगितला तर यंदा चांगली भाववाढ मिळेल असे गृहीत धरुन आनंद साजरा होतो. पण भाव कमी सांगितले तर मन काहीसे खट्टू होते. इतकेच नाही तर या मुलाला सोन्या-चांदीचे भावही विचारले जातात. अर्थात आज-काल केवळ ही प्रथा म्हणून पाळली जाते. लहान मुलांचे बोलणे कुणी फारसे मनावर घेत नाही. लहान मुलाचे पूजन झाल्यावर खोपडी मोडण्यासाठी झुंबड उडते. त्यातून उसाचे टिपरे प्रसाद म्हणून मिळवले जातात. हा प्रसाद घेऊन प्रत्येकजण आपापल्या घरी जातो. खोपडी बारसच्या दिवसापर्यंत खान्देशात फटाके वाजवले जातात. त्यानंतर फटाके वाजवणे बंद होते. घराघरांवरील आकाश कंदीलही काढून घेतले जातात. म्हणून दिवाळीचा समारोप खोपडी बारसने होतो असं म्हटलं जातं.

आदिवासींची वाघबारस !
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -