घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक जिल्ह्यातील 9 जागांवर सेनेचा दावा

नाशिक जिल्ह्यातील 9 जागांवर सेनेचा दावा

Subscribe

विद्यमान आमदारांचे लक्ष नाशिक पश्चिम किंवा पूर्व मतदारसंघांवर

विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर आता युतीच्या जागा वाटपाकडे इच्छुक उमेदवारांसह विरोधकांचेही लक्ष लागून आहे. जिल्ह्यातील एकूण 15 विधानसभा मतदारसंघापैकी सद्यस्थितीला शिवसेनेकडे 8, तर भाजपकडे 7 मतदारसंघ आहेत. यात ‘शहरातील नाशिक पश्चिम किंवा पूर्व मतदारसंघ आम्हाला द्या!’ असा प्रस्ताव सेना पदाधिकार्‍यांनी भाजपसमोर ठेवला आहे.

या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या बाजूने स्पष्ट केले असले, तरी भाजपतर्फे कोणताही सांगावा येत नसल्याने जागा वाटपाचे घोंगडे अद्याप भिजत आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी (दि.22) मुंबईत हजेरी लावल्यानंतर हा तिढा सुटेल, असा कयास बांधला जात होता. मात्र, त्यांनीही चर्चेविना काढता पाय घेतल्यामुळे राज्यातील नेत्यांनाच युतीचा प्रश्न मार्गी लावावा लागणार, अशी चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत विधानसभेचा फॉर्म्युला ठरल्याचे शिवसेनेच्या वरच्या फळीतील नेते जाहीरपणे सांगतात. मात्र, भाजपमध्ये याउलट परिस्थिती दिसून येते. असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसल्याचे सांगत सेनेला तोंडघशी पाडण्याचे काम भाजप नेते करत आहेत. अशा परिस्थितीत निवडणुका जाहीर झाल्या असून, उमेदवारांना तयारीसाठी अवघा एक महिना मिळणार असल्याने त्यांचे जागा वाटपाकडे लक्ष केंद्रीत होणे स्वाभाविक मानले जाते.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत एकदाही पराभव न पाहिलेल्या देवळाली मतदारसंघासह निफाड, सिन्नर व मालेगाव बाह्य येथे पक्षाचे आमदार आहेत. त्याव्यतिरीक्त नांदगाव, दिंडोरी, त्र्यंबक-इगतपुरी आणि येवला या चार जागा शिवसेनेकडे आहे. शहरात पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार असताना जागेअभावी त्यांना संधी मिळत नाही. परिणामी, बंडखोरीशिवाय नेत्यांसमोर दुसरा पर्याय नसतो. पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी अकरा इच्छुक उमेदवार असलेला नाशिक पश्चिम मतदारसंघ किंवा नाशिकरोड, पंचवटीला जोडणार्‍या नाशिक पूर्व मतदारसंघावर सेनेने दावा ठोकला आहे. वेळ पडली तर विद्यमान आमदारांना घेऊन आम्ही निवडणूक लढवतो; पण कोणत्याही परिस्थितीत जागा सोडा, असा होराच सेना नेत्यांनी लावून धरला आहे. त्यामुळे या एका जागेवरून संपूर्ण जिल्ह्याचे समीकरण अडून बसले आहे.

हे देखील वाचा – युतीचं तळ्यात-मळ्यात, मग पिंपरीत उमेदवारी कुणाच्या गळ्यात?

- Advertisement -

सेनेच्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत झपाट्याने विस्तारलेल्या भाजपमध्ये ‘हात लावेल त्याचे सोने’ अशीच स्थिती आहे. त्यामुळे पक्षातील नेत्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असून प्रत्येक मतदारसंघात त्यांचे इच्छुक एकवटले आहेत. सद्यस्थितीत नाशिक शहरातील तीन आणि चांदवड-देवळा हा एकमेव ग्रामीण मतदारसंघ त्यांच्याकडे आहे. याशिवाय मालेगाव मध्य, बागलाण, कळवण-सुरगाणा अशा एकूण सात ठिकाणी त्यांना उमेदवार द्यायचे आहेत. लोकसभेचा आधार घेऊन नांदगाव मतदारसंघ सेनेकडून हवा आहे. साधारणत: दोन्ही पक्षांना एक जागा वाढीव हवी असल्याचे चित्र सध्या दिसून येते. प्रतिपक्षाने ज्या मतदारसंघांवर दावा केला आहे, तेथील इच्छुकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघाची मागणी केली आहे

महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असलेला नाशिक पश्चिम मतदारसंघ आमच्याकडे देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. तसेच नाशिक पूर्वमध्येही सेनेचे प्राबल्य आहे. त्यामुळे या दोन्हींपैकी कोणताही एक जागा सेनेला दिल्यास शहरात पक्षवाढीस मदत होईल. – भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख, नाशिक.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -