घरफिचर्ससारांशलेबनॉन-शापित यक्षभूमी!

लेबनॉन-शापित यक्षभूमी!

Subscribe

गेल्या दोन सदरांमध्ये माझ्या लेबनॉनमधील दिवसांचा उल्लेख आला होता. त्यानंतर काहींनी लेबनॉनबद्दल सविस्तर का लिहीत नाहीस, अशी पृच्छा केली होती. खरं तर तो एका लेखात मांडण्याचा विषय नाही. त्यामुळे दोन लेखांमध्ये लेबनॉनची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न...

पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेल्या किंवा नसलेल्याही प्रत्येकासाठी BBC हे काही नवीन नाव नाही. त्या संस्थेत काम करायला मिळणं, हे अनेकांचं स्वप्नं असतं. ते पूर्ण झालं आणि अनेक संधींची कवाडं खुली झाली. त्यापैकीच एक होती त्यांचा एशिया डेव्हलपमेंट प्रोग्रॅम! या उपक्रमाअंतर्गत तुम्ही BBC च्या इतर कोणत्याही देशातील ऑफिसमधून एक महिना काम करू शकता. फक्त तुम्हाला त्या ऑफिसमध्ये का जायचंय आणि तिथून तुम्ही काय शिकून परत येणार, हे मांडावं लागतं. ते प्रभावीपणे मांडलं, तरच तुमची निवड होते.

या उपक्रमासाठी लेबनॉनची निवड करताना खरं तर ‘आहे कुठे बुवा हा देश!’ या प्रश्नापासून झाली होती. नकाशावर शोधल्यानंतर या देशाला लाभलेला शेजार पाहून धडधडलं होतं. एका बाजूला भूमध्य समुद्र आणि इतर सर्व बाजूंनी सीरिया, जॉर्डन, पॅलेस्टाईन आणि इस्राएल अशी संगत लाभलेल्या या देशात खरंच जाता येईल का, हा पहिला प्रश्न होता. पण उत्तर होकारार्थी मिळालं. सुदैवाने निवड झाली आणि माझं विमान लेबनॉनची राजधानी बैरूतच्या दिशेने उडालं.

- Advertisement -

अरब जगताबद्दल अरब वगळता बाहेरच्या जगात अनेक गैरसमज आहेत. एक तर पाश्चात्य चित्रपटांमध्ये त्यांची प्रतिमा अजूनही टोळीवाले किंवा दहशतवादी, अशीच रंगवलेली आपण बघितली आहे. हिंदी चित्रपटांमध्येही तस्कर किंवा भारताच्या मुळावर उठलेले उच्च वर्तुळातले दहशतवादी अरब दाखवले जातात. अरब देशांबद्दलही एक चमत्कारिक प्रतिमा डोळ्यांसमोर असते.

या प्रतिमेला तडा जायला सुरुवात झाली ती अबू-धाबी विमानतळावर उतरल्यापासून! अत्यंत स्वच्छ विमानतळ, सुंदर ललना आणि तेवढेच देखणे पुरूष! तेलाच्या पैशांमधून आलेली समृद्धी विमानतळावरील दुकानांमधून ओसंडून वाहत होती. बैरूतला जाणार्‍या विमानाची वाट बघत असताना आसपास असलेल्या त्या लेबनीज लोकांच्या घोळक्यात मी एकटाच बिगर-अरब होतो. अबू-धाबी विमानतळावर मला घडलेलं लेबनीज लोकांचं पहिलं दर्शन हे कुटुंबवत्सल अशी प्रतिमा निर्माण करणारं होतं.

- Advertisement -

एक देखणा, किमान सहा फुट उंचीचा गोरापान बाप्या, त्याच्या तेवढ्याच देखण्या आणि साधारण तेवढ्याच उंचीच्या एक ते दोन बायका, त्यांची गुटगुटीत मुलं… अशी अनेक कुटुंबं थांबली होती. मजामस्करी सुरू होती. भाषा कळण्याचा संबंधच नव्हता. तरीही खरखर ऐकू येणार्‍या रेडियोमधून मध्येच एखाद दोन शब्द प्रसवावेत, तसं ओळखीचे वाटावेत असे काही शब्द कानांवर यायचे. आपल्या रोजच्या बोलण्यात अनेक शब्द अरबी भाषेतून आले आहेत, त्याचंच हे फलित होतं.

अबू-धाबी ते बैरूत हा साधारण चार-पाच तासांचा विमानप्रवास करून बैरूतच्या जवळ आलो आणि खाली असलेल्या हिरव्यागार भूमध्य समुद्राने डोळ्यांचं पारणं फेडलं. एका बाजूला भूमध्य समुद्र, दुसर्‍या बाजूला त्या समुद्राच्या हिरव्या रंगाशी स्पर्धा करणारा माऊंट लेबनॉन आणि या दोहोंच्या मध्ये उतरणीवर वसलेलं हे मध्य-पूर्वेचं पॅरिस म्हणजेच बैरूत! बैरूत विमानतळाची धावपट्टी पाहून पुन्हा एकदा ठोका चुकला होता. समुद्रालगत असलेल्या त्या धावपट्टीवर विमान सुखरूप उतरलं आणि हायसं वाटलं.

विमानतळाबाहेर टॅक्सीतून निघाल्यानंतर बैरूतचं पहिलं दर्शन अगदी प्रेमात पाडणारं नसलं, तरी घृणा निर्माण करणारंही नक्कीच नव्हतं. सर्वात महत्वाचं म्हणजे रस्त्यांवर खड्डे नव्हते. मला मुंबई विमानतळाबाहेरचा साकीनाक्यापर्यंत येणारा रस्ता आठवला. चुकवावे म्हटले, तरी चुकवता येणार नाही अशा खड्ड्यांनीच प्रवाशांचं स्वागत होतं.

विमानतळाकडून मुख्य शहराकडे येणारा रस्ता काहीसा पेडर रोडची आठवण करून देणारा आहे. म्हणजे पेडर रोडच्या तुलनेत बर्‍यापैकी रूंद आहे. पण तसाच चढणीचा रस्ता आणि दुतर्फा टुमदार इमारती! हे बैरूत शहर पूर्णपणे उतारावर वसलेलं शहर आहे. त्यामुळे कुठूनही कुठेही जाताना माणूस एक तर चढत तरी असतो, नाहीतर उतरत तरी असतो. अगदी सरळ रस्ता असला, तरी तो थोडासा कललेलाच दिसतो. त्यामुळे शहरात पायपीट करायची म्हटली की, दम निघायचा. बरं, हे चढ-उतारही चांगलेच तीव्र!

बैरूत शहर हे खूप प्राचीन शहर आहे. इथे अनेक संस्कृती उदयाला आल्या, फोफावल्या आणि काळाच्या उदरात गडपही झाल्या. लेबनॉन ही फ्रेंचाची वसाहत होती. फ्रेंच लोकांनी इथे केलेल्या उत्खननात अनेक जुने अवशेष सापडले. बैरूत शहराचा गाभा असलेल्या डाऊनटाऊन भागात तर जमिनीखाली गाडल्या गेलेल्या शहराचे अवशेष जसेच्या तसे बघायला मिळतात. बाजूला तो अवशेष कोणत्या वर्षी सापडला, ते शहर कोणत्या शतकातलं आहे, वगैरे माहिती देणारा फलकही असतो.

बैरूतला ही जशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, तशीच नागरी युद्धाचीही आहे. जवळपास 25 वर्षं बैरूतमध्ये नागरी युद्ध सुरू होतं. बैरूतमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लीम असे दोन धर्माचे लोक राहतात. त्यातही अनेक गटतट आहेत. त्यात लेबनॉनला लाभलेला शेजार लक्षात घेता कोणत्याही छोट्या संघर्षालाही मोठं रूप आरामात मिळतं. 1975 मध्ये तेच झालं आणि उफाळलेला संघर्ष 1990 पर्यंत सुरू होता. या नागरी युद्धामुळे बैरूत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांमध्ये विभागलं होतं. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर रॉकेट्स डागण्यापर्यंत मजल गेली होती. एका भागातल्या लोकांना दुसर्‍या भागात जाणं मुश्कील झालं होतं. आजही शहरातल्या अनेक इमारतींवर या संघर्षाच्या खुणा दिसतात.

या नागरी युद्धामुळे बैरूतमध्ये आजही अदृश्यं भिंती उभ्या असलेल्या दिसतात. अनेक भागांमध्ये सुंदर आखीव वस्त्या आहेत. कोणतीही वस्तू पुरवणारी सुपरमार्केट्स आहेत. छोटी छोटी उद्यानं आहेत. खाण्यापिण्याची चंगळ आहे. पण असं असलं, तरी प्रत्येक गल्लीच्या तोंडाशी लष्करी वेषातले बंदुकधारी जवान तैनात असतात. काही चौकांमध्ये तर लष्कराच्या दणकट गाड्या आणि एखादा रणगाडाही उभा असलेला दिसतो. त्यामुळे एक प्रकारच्या भीतीची छाया संपूर्ण शहरावर पडल्यासारखं वाटतं. दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या देशातले तरुण इथल्या भ्रष्ट सरकारविरोधात एकवटले होते. त्यांनी एकत्र येत मोठं आंदोलन उभं केलं होतं. हा असा भडका या शहरात अधूनमधून उडतच असतो.

या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनही बैरूत तुम्हाला आवडतं. भूमध्य समुद्रावरून येणारा खारा वारा तुम्हाला वेड लावतो. एखाद्या सकाळी उगाचच मनमुराद चालत हे शहर पालथं घालावंसं वाटतं. पण या सगळ्याची कारणं, पुढल्या लेखात…

(क्रमश:)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -