घरठाणेमुरबाडमध्ये भाजपची सरशी 

मुरबाडमध्ये भाजपची सरशी 

Subscribe

नगरपंचायत निवडणुक, भाजप १०, शिवसेना ५ तर अपक्ष २

मुरबाड नगरपंचायत निवडणूक केंद्रीय मंत्र्यांपासून ते जिल्हा पालकमंत्री, आमदार तसेच स्थानिक आणि राज्य पातळीवरील दिग्गज नेत्यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. आमदार किसन कथोरे आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कार्यपद्धतीला झुकते माप देऊन नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपला बहुमत दिले. एकुण सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला दहा जागा मिळाल्या तर शिवसेनेला पाच जागांवर समाधान मानावे लागले. यामध्ये दोन अपक्षांना सुद्धा यश आले आहे.

मुरबाड नगरपंचायत निवडणूक अनेक अनपेक्षित घटनांनी गाजली. यामध्ये मुरबाड शहरप्रमुख रामभाऊ दुधाळे यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणुकीने गेले. परंतु अचानक कार्यालयात भाजपचा एबी फॉर्म घेऊन भाजपची उमेदवारी जाहीर केली. त्याचप्रमाणे भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या तिकिटावर वाॅर्ड नंबर चौदामध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले. या वाॅर्डात भाजप आणि शिवसेनेने निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या वाॅर्डात भाजपचे जुने कार्यकर्ते जुगलकिशोर जाखोटिया यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष उभे होते. भाजपने शहर अध्यक्ष सुधीर तेलवणे यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु भाजपचे मत विभाजन होऊन नितीन तेलवणे भरघोस मतांनी विजयी झाले. तसेच त्यांनी आपली पत्नी नम्रता यांनासुध्दा  वाॅर्ड नंबर सहामध्ये प्रचंड मतांनी विजयी केले.

- Advertisement -

माजी नगराध्यक्ष आणि भाजपाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष शीतल तोंडलीकर यांनाही शिवसेनेचे माजी सरपंच नंदाभाऊ रोठे यांचा मुलगा अक्षय या शिवसेनेच्या नवख्या उमेदवाराने पराभूत केले. माजी नगराध्यक्ष मोहन सासे यांच्या पत्नी मधुरा सासे या शहरातील सर्व उमेदवारांत सर्वाधिक 485 मताधिक्य मिळवून विजयी झाल्या आहेत. तसेच वाॅर्ड पाचमध्ये माजी सरपंच आणि माजी नगराध्यक्षपदी राहिलेले किसन कथोरे यांना  शिवसेनेच्या मागील निवडणुकीत अल्प मतात पराभूत झालेल्या विनोद नार्वेकर यांनी पराभूत केले आहे. वाॅर्ड दोनमध्ये माजी नगरसेविका नंदा अर्जुन शेळके यांना भाजपच्या उमेदवार मानसी मनोज देसले यांनी प्रचंड मतांनी पराभूत केले आहे.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनविली होती.भाजपचे नगरसेवक विकास वारघडे यांच्या पत्नीला पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी करून विजय संपादन केला. वाॅर्ड नंबर चारमध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते वसंत जाधव यांची सून नम्रता नंदकुमार जाधव या शिवसेनेच्या सुवर्णा देसले यांना पराभूत करून विजयी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे उर्मिला सुजीत ठाकरे, मुकेश बबन विशे, स्नेहा राजन भोईर, रविना विनायक राव, संतोष दिलीप चौधरी आणि मोहन भालचंद्र गडगे तर शिवसेनेच्या मोनिका स्वप्निल शेळके आणि अपक्ष अनिता भगवान दुधाळे तसेच दिक्षिता भरत वारे हे निवडून आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -