घरफिचर्ससारांशबुद्धकालिन थेरी

बुद्धकालिन थेरी

Subscribe

भिक्षुणीसंघातील थेरींच्या जीवनानुभवाचा प्रवास म्हणजेच थेरीगाथा. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात भारतातील स्त्रियांची सामाजिक स्थिती कशी होती, स्त्रियांचे समाजात काय स्थान होते, त्यावेळची त्यांची स्वकथने अर्थात आत्मचरित्रे लिहिलेली आहेत. त्यांचं संपूर्ण जीवन चरित्र म्हणजेच थेरीगाथा. या थेरीगाथांची नव्याने मांडणी करून त्यांचे स्वरूप, व्याप्ती अधिक स्पष्ट करून बौद्ध धम्माचे अभ्यासक, विचारवंत देवेंद्र उबाळे यांनी ‘थेरीगाथा नवे आकलन’ या ग्रंथाचं संपादन करून आजच्या आधुनिक युगात आणि भविष्यात सर्व मानव जातीसाठी थेरीगाथा प्रेरणदायी आहेत हे स्पष्ट केले आहे.

स्वातंत्र्य ,समता, बंधुत्व, न्याय आणि प्रेम, या प्राचीन मूल्यांवर भारतीय समाज उभा आहे. याच मूल्यांवर भारतीय लोकशाही मजबूत टिकून आहे. भारतात विविध जाती, धर्म, पंथ, भाषा अशी विविधता असतानाही भारत एकसंध आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘समताधिष्ठित भारत’ ही संविधानकारांची संकल्पना. भारत ही त्यागी राष्ट्रपुरुषांनी संस्कारित केलेली समताभूमी आहे. तथागत गौतम बुद्धांनी मानवी कल्याणासाठी दुःख मुक्तीचा सन्मार्ग शोधण्यासाठी राजवैभवाचा त्याग केला. तथागतांचा धम्म म्हणजे मानवी दुःखांच्या समूळ उच्चाटनासाठी खात्रीशीर मार्ग आहे. धम्म म्हणजे आचरण, जगण्याची आचारसंहिता. धम्म समतेवर आधारित आहे, बुद्ध हे समतेचे उद्गाते आहेत. बुद्ध हे निरामय जीवनाचा सम्यक सन्मार्ग दाखवणारे मार्गदाता आहेत. माणूस हा धम्माचा केंद्रबिंदू आहे. या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिक्षु आणि भिक्षुणी बुद्धकालापासून आजपर्यंत कार्यरत आहेत.

श्रमण परंपरेनुसार गृहत्याग केलेल्या पुरुषास पाली भाषेत भिक्षु म्हणतात, तर गृहत्याग करणारी स्त्री म्हणजे भिक्षुणी होय. गृहत्याग केल्यानंतर धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी स्थिर झालेली भिक्षुणी म्हणजे थेरी होय. भिक्षुणी झाल्यापासून सलग दहा वर्षे उलटल्यानंतर भिक्षुणीला थेरी असे म्हटले जाते. ‘थेरी’ही संघातील वरिष्ठ आदरणीय व्यक्ती असते. भिक्षुणीसंघातील थेरींच्या जीवनानुभवाचा प्रवास म्हणजेच थेरीगाथा. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात भारतातील स्त्रियांची सामाजिक स्थिती कशी होती, स्त्रियांचे समाजात काय स्थान होते, त्यावेळची त्यांची स्वकथने अर्थात आत्मचरित्रे लिहिलेली आहेत. त्यांचं संपूर्ण जीवन चरित्र म्हणजेच थेरीगाथा. या थेरीगाथांची नव्याने मांडणी करून त्यांचे स्वरूप, व्याप्ती अधिक स्पष्ट करून बौद्ध धम्माचे अभ्यासक, विचारवंत देवेंद्र उबाळे यांनी ‘थेरीगाथा नवे आकलन’ या ग्रंथाचं संपादन करून आजच्या आधुनिक युगात आणि भविष्यात सर्व मानव जातीसाठी थेरीगाथा प्रेरणदायी आहेत हे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

गृहस्थ जीवन आणि भिक्षुनी होण्यामागच्या कारणमीमांसेपासून दुःखमुक्तीपर्यंतच्या प्रवासाचा अनुभव या थेरीगाथांमध्ये मांडलेले आहेत. या गाथांचे स्वरूप काहीसे आत्मकथनात्मक वाटत असलं, तरी ते व्यक्तिगत न राहता प्रतिकात्मक स्वरूपाचे आहे, हे त्यांचं खास वैशिष्ठ्य आहे. भारतीय परिप्रेक्षाचा विचार करता महापंडित राहुल सांकृत्यायन, भदंत आनंद कौसल्यायन आणि भदंत जगदीश कश्यप यांनी थेरीगाथा देवनगरी लिपीत संपादित केली. भदंत उत्तम यांनी १९३७ साली प्रकाशित केली. याच वर्षी प्रोफेसर भागवत यांनीही थेरीगाथाचे देवनगरीत संपादन केले आणि मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केले. थेरीगाथेवर मराठी भाषेत फारसे काम झाले नाही. डॉ.भाऊ लोखंडे आणि रत्नमाला लोखंडे या उभयतांनी केलेला मराठी अनुवाद १९८४ साली प्रकाशित झाला. प्रा.शेषराव मेश्राम यांनी केलेला मराठी भाषेतील अनुवाद महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने १९९३ साली प्रकाशित केला. थेरीगाथेच्या काही भागाचा अनुवाद डॉ. रूपा कुलकर्णी बोधी यांनी ‘बुद्धकन्यांच्या मुक्ती गाथा’ या नावाने केला आहे. थेरीगाथेची १६ भागात विभागणी केली आहे. अशी एकूण ७३ प्रकरणे आहेत, तर प्रकरणात ५२२ गाथा अथवा कवने आहेत.

थेरीगाथा हा केवळ आत्मचरित्रात्मक ग्रंथ नसून बुद्धकालीन भारतीय इतिहासाचे व तत्कालीन समाज जीवनाचे दर्शन घडणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. प्रत्येकीच्या गृहत्यागामागील कारण आणि परिस्थिती वेगळी असली तरी त्याचे वर्गीकरण करता येते. बुद्धकालीन स्त्रीजीवन समजून घेण्यास थेरीगाथेतील संदर्भ महत्त्वाचे ठरतात. भिक्षुणीसंघात गरीब कुटुंबातून आलेल्या स्त्रियांप्रमाणेच राजघराण्यातील स्त्रियाही आहेत. त्यांच्या स्वकथनातून त्या विविध सामाजिक स्तरातून आलेल्या दिसतात. विविध प्रकारच्या आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया दिसतात, त्यांच्या गाथामधून बुद्धकालीन सामाजिक स्थितीचे, आर्थिक परिस्थितीचे, चालीरीतींचे दर्शन घडते. थेरीगाथेत जरी विविध प्रांत, वर्ण, आर्थिक स्थिती अथवा सामाजिक स्तरावरील स्त्रिया दिसत असल्या, तरी त्यांच्या गाथांमधून दुःखमुक्तीचा समान धागा दिसतो आणि केंद्रस्थानी बुद्धांप्रती असलेली असीम श्रद्धा आहे, कृतज्ञता आहे. निब्बाणाची सहानुभूती आहे, करुणेचा झरा आहे, स्वत्वाची जाणीव आहे, आत्मसन्मानाची मांडणी करणारा स्त्रीवाद आहे. गृहत्यागांतर भिक्षु किंवा भिक्षुणीला संघासमोर उमेदवाराला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात त्याला उपसंपदा असे म्हटले जाते.

- Advertisement -

स्त्रियांना स्वतःची स्वतंत्र ओळख असणे ही देखील भारतीय परिप्रेक्षात क्रांतिकारक बाब मानली पाहिजे. तिची ओळखच कोणाची तरी पत्नी, कोणाची तरी मुलगी, कुणाची आई अशी पुरुषप्रधान व्यवस्थेने जोडलेली असते. थेरीगाथेतील सर्व भिक्षुनी मात्र या पुरुषी व्यवस्थेला पूर्णतः नाकारुण स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळख स्थापित करताना दिसतात. स्त्रीमुक्ती चळवळीचा आणि स्त्रियांच्या आत्मभानाचा प्रारंभ हा अलीकडच्या काळातील असून त्याचे श्रेय पाश्चिमात्य विचारांना जाते, अशी मांडणी केली जाते. ही मांडणी करताना अडीच हजार वर्षापूर्वी स्त्रियांच्या आत्मभानाची मोठी चळवळ भारतात होऊन गेली. ही चळवळ यशस्वी ठरली याकडे भारतीय विचारवंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. स्त्रीमुक्तीची पाळेमुळे बुद्धकालिन भिक्षुणीसंघात आणि पर्यायाने थेरीगाथेत सापडतात. थेरीगाथा हा नैतिकता आणि शीलाचरणाचा उत्तम दस्तऐवज आहे. भिक्षुणी शील आचरणास सर्वश्रेष्ठ स्थान देतात.

देवेंद्र उबाळे यांनी संपादित केलेल्या ‘थेरीगाथा नवे आकलन’ या ग्रंथात एकूण नऊ साहित्यिक विचारवंतांनी आपले वैचारिक लेख लिहिले असून नवी मांडणी केली आहे. या ग्रंथात डॉ. ज्ञानेश्वर पवार यांचा ‘थेरीगाथेतील स्त्रियांचे भावविश्व आणि आधुनिक मानसशास्त्र’ असा अभ्यासपूर्ण लेख आहे. डॉ.श्यामल गरुड यांनी ‘थेरीगाथेच्या सदोहरी आंबेडकरी स्त्री आत्मकथा’ या लेखात महत्वपूर्ण मांडणी केली आहे. प्रा.आशालता कांबळे यांचा ‘थेरीगाथांचा आंबेडकरी स्त्रीयांच्या लेखनावरही प्रभाव’ हा वेगळ्या शैलीतील लेख आहे. सुनील हेतकर यांनी ‘थेरीगाथा आणि महाराष्ट्रातील स्त्रीयांची आत्मचरित्रे’ असे तुलनात्मक महत्व विशद केले आहे. प्रा. सचिन गरुड यांनी ‘भारतीय इतिहासातील पहिल्या स्त्री-मुक्तीचे उदान’ असा वैशिष्ठ्यपूर्ण लेख लिहिला आहे.

अरविंद सुरवाडे यांनी ‘थेरीगाथा आणि आंबेडकरवादी साहित्यावरील त्यांचा प्रभाव’ असा उत्तम लेख लिहिला आहे. मोतीराम कटारे यांनी ‘थेरीगाथेतील सौंदर्य विचार’ हा लेख लिहिला असून उर्मिला पवार यांचा ‘थेरींची कालातीत थोरवी’ हा लेख चिंतन करायला लावणारा आहे. ‘थेरीगाथा नवे आकलन’ या ग्रंथाचे संपादक देवेंद्र उबाळे यांनी या नऊ साहित्यिकांच्या लेखांव्यतिरिक्त जे अपेक्षित होतं त्याची भर टाकून मौल्यवान ग्रंथ साकार केला आहे. देवेंद्र उबाळे यांनी पंचवीस पानांच्या दीर्घ संपादकीय मनोगतात सर्व पाली भाषेतील थेरीगाथांचा आढावा थोडक्यात घेतला असला, तरी संदर्भासहित अभ्यासपूर्ण आणि वैचारिक दृष्टीने केलेली मांडणी अत्यंत मोलाची आहे. हा ग्रंथ पी.एच.डी.संशोधनासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल. उत्कृष्ट छपाई, साजेसं आणि बोलकं मुखपृष्ठ, ग्रंथाची अप्रतिम मांडणी त्यामुळे ग्रंथाची उंची अधिकच वाढली आहे. या ग्रंथाचं स्वागतच होईल.

— प्रदीप जाधव
टेंभवली ता. भिवंडी जि ठाणे
मो.९८६९१०२२२६
इमेल िीरवशशि.क्षरवहर्रीं२०१२.क्षिसारळश्र.लेा

थेरीगाथा नवे आकलन-संपादक देवेंद्र उबाळे (मोबाईल ९४२२९४५९४३)
प्रकाशक -डॉ.आंबेडकर वाङ्मयीन अभ्यास मंडळ इगतपुरी
पृष्ठे -१६० किंमत रुपये ३००/

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -