घरमहाराष्ट्रअजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, पण स्मरण उद्धव ठाकरेंच्या संकल्पाचे!

अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, पण स्मरण उद्धव ठाकरेंच्या संकल्पाचे!

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींचा वेग पाहता वरचेवर वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटत आहे. सध्या चर्चा आहे ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी हा विषय छेडल्यावर ही चर्चा रंगली आहे. मात्र दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला संकल्प आणि राष्ट्रवादीच्याच अन्य एका ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेल्या इ्च्छेचेही अनेकांना स्मरण झाले आहे.

महाराष्ट्रात गेल्या सुमारे तीन वर्षांत तीन सरकारे स्थापन झाली. अशा वेगाने घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातूनच काँग्रेस आघाडी आणि महाविकास आघाडीच नव्हे तर, भाजपाशी देखील हातमिळवणी करत अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले होते. त्यामुळेच बहुधा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी ‘आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल; आपल्यालाला आता अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे कामाला लागा,’ असे आदेश वजा आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यावेळी दस्तुरखुद्द अजित पवार देखील उपस्थित होते.

- Advertisement -

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोणाला काहीही आवडेल; पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते,’ असे सूचक विधान त्यांनी केले आहे. याबाबत अजित पवारांनी देखील, ‘वरिष्ठ बोलल्यानंतर आम्ही बोलत नसतो,’ असे सांगत एक प्रकारे ‘मम्’ म्हटले आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनीही जवळपास दोन वर्षांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाबद्दल भाष्य केले होते. ‘दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यामुळे मलाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा असेल तर पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे,’ असे ते म्हणाले होते.

- Advertisement -

तर, आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे, असा संकल्प उद्धव ठाकरे यांनी गेल्या डिसेंबरमध्ये आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती कार्यक्रमात केला होता. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा त्यानिमित्ताने झाली होती. आता शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष झाल्यास मुख्यमंत्रिपदाचा मान अजित पवार यांना मिळेल की, उद्धव ठाकरे यांच्या संकल्पाचा मान ठेवत सुप्रिया सुळे हे पद भूषवतील, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, सगळा पक्ष घेऊन दर्शनाला येईन, असा नवस खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्यावर्षी महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीकडे केला होता. त्यामुळे आता त्या आपले मंत्रिमंडळ घेऊन देवीचे दर्शन घेणार की, राष्ट्रवादीच्याच अन्य मुख्यमंत्र्यासह देवीचे दर्शन घेतील, हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -