घरमहाराष्ट्रखारघर दुर्घटना प्रकरणी अजित पवारांचं राज्यपालांना पत्र, काय लिहिलंय? वाचा सविस्तर...

खारघर दुर्घटना प्रकरणी अजित पवारांचं राज्यपालांना पत्र, काय लिहिलंय? वाचा सविस्तर…

Subscribe

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आलीय.

खारघर दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. खारघरमधील श्रीसदस्यांच्या मृत्यूप्रकरणी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आलीय. त्यामुळे खारघरमधील श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या श्री सदस्यांचा पोस्ट मॉर्टम अहवाल आल्यानं एकच खळबळ माजली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या १४ पैकी १२ जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाललं नव्हतं, असं पोस्ट मॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उर्वरित दोन जणांनी काही खाल्लं होतं की नाही ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या प्रकरणी सात रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. या दुर्घटनेवरून राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटताना दिसून येत आहेत. विरोधकांकडून राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधला जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणी थेट राज्यपालांना पत्र धाडलंय.

- Advertisement -

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १४ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळे निष्पाप अनुयायांचा बळी गेला आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

काय लिहिलंय पत्रात?
“सुरूवातीला उष्माघातामुळे १४ अनुयायांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. परंतू नंतरच्या काळात समाज माध्यम, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तसंच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांकडून वेगवेगळी माहिती उघडकीस येत आहे. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली व त्यात अनुयायांचा मृत्यू झाला. उपस्थित अनुयायींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. अनुयायी ७ तास पाण्याशिवाय, खाण्याशिवाय उन्हात होते व त्यामुळे अनेकांना त्रास झाला. गर्दीचे योग्य नियोजन न केल्यामुळे रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचण्यात अक्षम्य विलंब झाल्यामुळे वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट असताना उघड्यावर उन्हात कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी निवडलेल्या कंपनीला अशा भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा अनुभव नव्हता. जाहीर करण्यात आलेल्या मृतांच्या संख्येपेक्षा अधिक अनुयायांचा मृत्यू झाला, अशा अनेक बाबी टप्याटप्याने उघडकीस येत आहेत. या सर्व बाबींची शहनिशा करून त्यामधील सत्य जनतेसमोर येणे अत्यंत गरजेचं आहे.”, असं देखील या पत्रात लिहिण्यात आलंय.

- Advertisement -

“हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे तो शासनाने आयोजित केला होता. या कार्यक्रमसाठी तब्बल १४ कोटी रूपये खर्च करण्यात आलेले आहेत. राज्यातील मागील काही दिवसातील तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस आहे. उष्णतेची प्रचंड मोठी लाट राज्यात आलेली आहे. त्यामुळे एव्हढा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सर्व शक्यतांची पडताळणी शासनाकडून होण्याची आवश्यकता होती. पण ती न झाल्यामुळे १४ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना नैसर्गिक नसून शासननिर्मीत आहे. सदोष नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेला आणि मृत्यूला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. त्यामुळेच तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कार्यक्रम आयोजनाबाबत घेतलेला निर्णय, आयोजनातील त्रुटी आणि ही दुर्दैवी घटना याची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख रूपयांची मदत द्यावी, जखमी अनुयायांवर मोफत उपचार करून त्यांना प्रत्येकी ५ लाख रूपयांची मदत करावी, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशा मागण्या सरकारकडे केल्या होत्या. परंतू यातील एकही मागणीबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही.”, असं या पत्रात लिहीत अजित पवारांनी राज्यपालांकडे मागणी केलीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -