घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे भला । तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥
मग हे काम, क्रोध अजिंक्यच झाले असे तुला वाटेल, तर तसे मात्र नाही. अर्जुना, अशाही संकटातून पार पडण्यास एक उत्तम उपाय आहे; तो तुला साधेल, तर सांगतो.
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें विये । आधीं निर्दळूनि घालीं तियें । सर्वथैव ॥
यांचे मूळ वास्तव्य इंद्रियाच्या ठिकाणी आहे आणि इंद्रियांपासून कर्माची प्रवृत्ती होते, म्हणून या इंद्रियांना अगोदर सर्वथैव जिंक.
मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेन थारा मोडेल । या पापियांचा ॥
असे झाले म्हणजे मनाची धाव कुंठित होऊन बुद्धिची सुटका होईल आणि मग तेथून या दुष्टांचे बिर्‍हाड मोडेल.
हे अंतरीहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले । जैसें रश्मीवीण उरलें । मृगजळ नाहीं ॥
याप्रमाणे यांची अंतःकरणातून वस्ती मोडली म्हणजे हे मेले, असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ दृष्टीस पडावयाचे नाही,
तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मींचें स्वराज्य आलें । मग तो भोगी सुख आपलें । आपणचि ॥
त्याप्रमाणे, राग आणि द्वेष जर नाश पावले, तर ब्रह्मरूपी स्वराज्यच हाती आले, असे समज. मग तो स्वत:च निजसुख भोगतो.
ते गुरुशिष्याची गोठी । पदपिंडाची गांठी । तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणे काळीं ॥
हीच गुरुशिष्याची गुह्य गोष्ट; हेच जीवब्रह्माचे ऐक्य. तू येथे स्थिर होऊन येथून कधीही हालू नको.
ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । राया ऐकें देवदेवो । बोलता जाहला ॥
संजय म्हणतो- राजा, ऐक, सकलसिद्धमुकुटमणी लक्ष्मीपती श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -