घरमुंबईएसएससीची वाटचाल यूपी बोर्डाच्या मार्गावर

एसएससीची वाटचाल यूपी बोर्डाच्या मार्गावर

Subscribe

दहावीचा निकालात झालेल्या घसरणीचे पडसाद मोठ्या प्रमाणात पालक व विद्यार्थ्यांमध्ये उमटत आहेत. शिक्षण विभागाने यावर्षी अंतर्गत गुण देण्याची पद्धत बंद करत संपूर्ण पेपर 100 गुणांच केल्याने निकाल घसरल्याचे बोलले जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे त्याचे दूरगामी परिणाम एसएससी बोर्डाला भोगावे लागणार आहेत. इतकेच नव्हेतर अशा पद्धतीने शिक्षण विभागाकडून निर्णय घेण्यात आल्यास भविष्यात एसएससी बोर्डाची वाटचाल उत्तर प्रदेश बोर्डाच्या दिशेने होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

दहावीचा निकालात घसरण होण्याची नेमकी कारणे कोणती आहेत.
रेडिज – परीक्षेचा बदलण्यात आलेल्या पॅटर्नचा मोठा फटका यावर्षी विद्यार्थ्यांना बसला. पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थ्यांच्या झालेल्या परीक्षेमध्ये त्यांचे पेपर लेखन कौशल्य व भाषिक कौशल्य अशा दोन भागामध्ये झाले. त्यांना फक्त 80 किंवा 60 गुणांचा पेपरच लिहावा लागत होता. तसेच दहावीलाही त्याचपद्धतीने पेपर होते. त्यामुळे त्यांना फारसा त्रास होत नव्हता. परंतु यावर्षी बोर्डाने दहावीचे पेपर 100 गुणांचे केले. विद्यार्थ्यांची सलग तीन तास पेपर लिहिण्याची सवय सुटली होती. त्यांना तीन तास पेपर लिहायला देण्यापूर्वी त्यांची तेवढी क्षमता आहे का हे तपासणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत पेपर 100 गुणांचा केल्याने त्याचा परिणाम परीक्षेवर झाला. 10 ते 20 गुणांसाठी बोर्ड विद्यार्थ्यांवर अनुतीर्णचा कसा शेरा मारू शकता. यातून त्यांनी काय साधले.

20 गुण कमी करण्याचा एसएससी बोर्डाचा निर्णय योग्य वाटतो का?
रेडिज – आयसीएसई, सीबीएसई व आयबी यासारख्या बोर्डाकडून अंतर्गत गुणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर गुणाची खैरात करत असताना एसएससी बोर्ड काटेकोरपणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहे. एसएससी बोर्डातून चांगले गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे का? तर नाही. चांगल्या कॉलेजमधील जागांवर आयसीएसई व सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अचानक 20 गुण कमी करण्याचा निर्णय हा अयोग्यच आहे.

- Advertisement -

अंतर्गत गुण कमी करण्याला शिक्षकांचा विरोध आहे का ?
रेडिज – निकाल फुगवण्याला आमचा पाठिंबा आहे असे नाही, पण ही पद्धत सरकारने चौथीपासून राबवली पाहिजे होती. चौथीपासून विद्यार्थ्यांना 100 गुणांचा पेपर लिहिण्याची सवय असती तर त्यांना त्रास झाला नसता. एकीकडे लेखी व तोंडी तर दुसरीकडे फक्त लेखी परीक्षा पद्धती राबवण्यात येत आहे. ही पद्धत चुकीची आहे. विद्यार्थ्यांचे लेखन व संभाषण कौशल्य तपासले पाहिजे. त्याचे गुण त्यांना मिळालेच पाहिजेत. त्याचप्रमाणे 100 ऐवजी 60 गुणांचा पेपर तपसाणे शिक्षकांनाही बरे पडते. 100 गुणांचा पेपर तपासताना शिक्षकांवर येणार्‍या ताणामुळे त्यामध्ये किती अचूकता असेल याची खात्री देता येऊ शकत नाही.

बोर्डाच्या निर्णयाचे दुरगामी परिणाम काय असतील
रेडिज – सरकारने काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेला होता. त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. त्या पद्धतीने या निर्णयाचे परिणामही दिसतील. मात्र त्यावेळी एसएससी बोर्डाकडे कोणीही पालक किंवा विद्यार्थी ढूंकूनही बघणार नाही. भारतामध्ये एकेकाळी आघाडीवर असलेल्या व सर्वाधिक विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या उत्तरप्रदेश, बिहार बोर्डाप्रमाणे एसएससी बोर्डाची अवस्था होईल. आम्ही यूपी व बिहारमध्ये जाऊन तेथील शाळांची पाहणी केली असता आपल्याकडील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांची अवस्था चांगली आहे. तरीही तेथील यूपी बोर्डाची मान्यता घेण्यासाठी कोणीही संस्था तयार होत नाही. सरकारच्या अशा निर्णयांमुळे भविष्यात एसएससी बोर्डाची अवस्थाही यूपी बोर्डासारखी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

यूपीतील वस्तूस्थिती तुम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली का?
रेडिज – शिक्षक किंवा मुख्याध्यापक प्रत्यक्ष तळागाळात काम करत असतात, त्यांना पालक व विद्यार्थ्यांचा सामना करावा लागतो, आजच्या घडीला बोर्डाविरोधात पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. यूपीच्या बोर्डाचा अभ्यास केला असता आपल्या जिल्हापातळीवरील शाळा चांगल्या असल्याचे दिसून आले. आयसीएसई, सीबीएसई बोर्डाचा सामना करण्यासाठी आपल्याला ठोस निर्णय घ्यावे लागतील, यासाठी आम्ही अनेकदा बोर्डाकडे पत्रव्यवहार केला. पण त्याकडे दुर्लक्ष केले. महाराष्ट्रातील दुर्गम भागातील विद्यार्थी एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये शिकून मोठे अधिकारी झालेत. या ठिकाणी आयसीएसई व सीबीएसई बोर्ड शाळा सुरू करणार नाही. अन्य बोर्डांकडून नवनवीन शाळांना मान्यता देण्यात येत आहे. या शाळांकडे एसएससी बोर्डाचेच विद्यार्थी वळणार आहेत. त्यामुळे अन्य बोर्डांना प्रोत्साहन देण्याबरोबरच एसएससी बोर्डाला संपवण्याचा कुटील डाव रचला जात असल्याचे वाटते.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -