घरअर्थजगतदसर्‍याच्या मुहूर्तावर तीनशे कोटींची उलाढाल

दसर्‍याच्या मुहूर्तावर तीनशे कोटींची उलाढाल

Subscribe

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बाजारपेठेत आलेली मंदी, सण-उत्सवांवर असलेले निर्बंध यामुळे बाजारपेठेत आलेली मरगळ दसर्‍याच्या मुहूर्तावर दूर झाली. त्यामुळे चैतन्यमयी वातावरणात खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. सोन्याचांदीच्या दागिन्यांसह वाहन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करत ग्राहकांनी आनंदाचे सिमोल्लंघन केले. आजच्या विक्रीने वर्षभरातील तूट एकाच दिवसात भरून काढली. बाजारपेठेत सुमारे ३०० कोटींची उलाढाल झाली.

साडेतीन मुहूर्तातील एक असलेल्या दसर्‍यानिमित्त सोने, घर, गाडी, घरगुती वस्तू आणि कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. कोरोनानंतर उद्योग व्यवसायाची चाके फिरू लागल्याने लोकांची क्रयशक्ती वाढली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी वर्गाने वेगवेगळ्या सवलतींच्या योजना जाहीर केल्याने ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्र, सोने खरेदी, बांधकाम क्षेत्राला यानिमित्ताने चांगलाच बूस्ट मिळाला. दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष प्राधान्य दिले जाते. गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याचे दर कमी असल्याने आणि पुढे दिवाळी, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता गृहीत धरून सराफ बाजारातही गर्दी होती. चोख सोन्यासह सोन्याची दागिन्यांना ग्राहकांनी पसंती दिली.

- Advertisement -

बुधवारी (दि.५) सकाळपासून पिवळ्या-केशरी रंगांची झेंडूची फुले लक्ष वेधून घेत होती. पहाटेपासूनच घराघरांसमोर साफसफाई, रांगोळी काढणे सुरू होते. ठिकठिकाणी सुंदर, सुबक, रांगोळ्या दिसत होत्या. अनेकजण दुचाकी, चारचाकी धुऊन त्यांना फुलांच्या माळा चढवत होते. नवे कपडे परिधान करून आबालवृद्ध, तर भरजरी साड्या नेसून महिला आप्तेष्टांच्या भेटीगाठी घेण्यात दंग होत्या. दसर्‍याच्या महूर्तावर अनेकांनी नवीन घराचे बुकिंग तसेच गृहप्रवेशाचा मुहूर्त साधला. नाशिक शहराच्या चहुबाजूने गृहप्रकल्प साकारले जात असलयाने, बांधकाम व्यावसायिकांनी सण-उत्सवानिमित्त बुकिंगवर विविध प्रकारच्या ऑफर्सही जाहीर केल्या आहेत. मुहूर्तावर बुकिंग करणार्‍यांना स्टॅम्प ड्युटी फ्री अशा प्रकारच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. अनेक प्रकल्प तयार असल्याने बुकिंग अन् गृहप्रवेशाची संधी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने गृहकर्ज महागले आहेत.

गृहविक्रीला उभारी 

- Advertisement -

कोरोनानंतर घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत मोठेमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहे. स्वतःचे हक्काचे घर असावे म्हणून नागरिकांकडूनही घरांची मागणी वाढू लागली आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर शहरातही विविध गृहप्रकल्पांमध्ये शेकडो घरांचे बुकिंग झाले. : निखिल रूंगटा, संचालक, रूंगटा ग्रुप

वाहनं विक्रीचे चक्र फिरले

सुलभ अर्थसहाय्य, सुलभ हप्ते, कमी डाऊनपेमेंट आणि विक्रीपश्चात मिळणार्‍या सेवेमुळे यंदा दसर्‍याला वाहन विक्रीची चक्रे गतीमान झाल्याचे दिसून आले. शहरात सुमारे १२०० चारचाकी वाहनांची विक्री करण्यात झाली. विशेष म्हणजे यात इलेक्ट्रीक कार्सलाही पसंती मिळाली. : संदीप काळे, ऑटो एक्स्पर्ट

सोने खरेदीचा उत्साह कायम

ग्राहकांकडून मुहूर्तावर सोनेखरेदी करण्यात आल्याने सराफ बाजारात दिवसभरात सुमारे ५० कोटींची उलाढाल झाली. गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रती १० ग्रॅमला ५३,५०० रूपये तर चांदी ६४ हजार ८०० प्रती किलोग्रॅम होते. काही प्रमाणात दरवाढ झाली असली तरी ग्राहकांचा सोने खरेदीकडे कायम आहे. : चेतन राजापूरकर, सराफ व्यावसायिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -