2029पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनू शकते, एसबीआयचा अहवाल

indian economy down in global gdb economy ranking

नवी दिल्ली : भारत 2029पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनू शकते, असा दावा भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) केला आहे. एसबीआयच्या इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेन्टने तयार केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. 2014मध्ये भारत आर्थिकदृष्ट्या 10व्या स्थानावर होता. पण 2029पर्यंत भारत आणखी सात स्थाने पुढे म्हणजेच, सातव्या स्थानावर पोहोचू शकेल, असे या अहवालात म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर आता भारताचा क्रमांक लागतो. ब्रिटन सहाव्या क्रमांकावर गेला आहे. त्यापाठोपाठ आता एसबीआयचा हा रिपोर्ट आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) भारताची अर्थव्यवस्था 13.5 टक्के दराने वाढली आहे. हीच गती कायम राहिली तर, या आर्थिक वर्षात सर्वात वेगाने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था ठरू शकते, असे एसबीआयच्या इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेन्टच्या अहवालात म्हटले आहे.

या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा वृद्धीदर 6.7 ते 7.7 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अनुमान आहे. जागतिक अनिश्चिततेचे वातावरण पाहता तो 6 ते 6.5 टक्के राहणे सुद्धा सामान्य म्हणता येईल. भारतीय अर्थव्यवस्थेत 2014नंतर मोठे बदल झाले आहेत, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. जागतिक जीडीपीमध्ये भारताचा हिस्सा सध्या 3.5 टक्के आहे. 2014मध्ये तो 2.6 टक्के होता. तर, 2027पर्यंत जर्मनीला मागे टाकत तो 4 टक्क्यांवर पोहोचेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आयएमएफचा अंदाज
आयएमएफने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था मार्च तिमाहीत 854 अब्ज डॉलर इतका होता. तर, युकेची अर्थव्यवस्था 816 अब्ज डॉलर आहे. ही गणना आयएमएफ डेटाबेस आणि ब्लूमबर्ग टर्मिनलचा विनिमय दर वापरून केली गेली. भारताची अर्थव्यवस्था या वर्षी ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये (आयएमआय) भारत तिमाहीत दुसऱ्या स्थानावर होता. पण चीनच्या मागे होता.