‘हर घर तिरंगा’ अभियानातून देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन, पंतप्रधानांकडून प्रशंसोद्गार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक केले. अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडले आहे. चैतन्याची अनुभूती आपण अनुभवली आहे. आपला एवढा मोठा देश, एवढी विविधता, पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आल्याचे दिसत होते. तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

स्वच्छता मोहिम आणि लसीकरण मोहिम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला आहे. आता स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवात देशभक्तीची तीच भावना अनुभवायला मिळते आहे. आपल्या सैनिकांनी उंच पर्वतांच्या शिखरांवर, देशाच्या सीमांवर आणि समुद्राच्या मध्यभागी तिरंगा फडकवला. तिरंगा मोहिमेसाठी लोकांनी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कल्पनाही राबवल्या, असे ते म्हणाले.

दूरदर्शनवरील ‘स्वराज’ मालिका
स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या पण दुर्लक्षित राहिलेल्या नायक-नायिकांच्या प्रयत्नांची ओळख दूरदर्शनवरील ‘स्वराज’ मालिकेद्वारे देशाच्या युवा पिढीला करून देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दर रविवारी रात्री 9 वाजता दूरदर्शनवर प्रसारित होतो. तो 75 आठवडे चालणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे. तुम्ही वेळात वेळ काढून हा कार्यक्रम स्वतः बघा आणि तुमच्या घरातल्या मुलांनाही दाखवा, अशी विनंती पंतप्रधानांनी केली.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पुढील वर्षापर्यंत म्हणजे ऑगस्ट 2023पर्यंत साजरा होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या ‘स्वराज’ मालिकेत दाखविण्यात येणाऱ्या महानायकांची कहाणी अवघ्या देशापर्यंत पोहोचवावी यासाठी रेकॉर्ड केलेल्या कार्यक्रमावरून एक विशेष कार्यक्रमही तयार करू शकतात. देशासाठी, स्वातंत्र्यसैनिकांसाठी, जे लेखन- आयोजन आपण करत आलो आहोत, ते काम आपल्याला यापुढेही करत राहायचे आहे, असे ते म्हणाले.

अमृत सरोवर उपक्रमात सहभागी व्हा
चार महिन्यांपूर्वी ‘मन की बात’मध्ये मी अमृत सरोवराचा उल्लेख केला होता. त्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने जमवाजमव केली, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोक एकत्र आले आणि बघता-बघता अमृत सरोवराची उभारणी ही लोकचळवळ झाली आहे. अमृत सरोवर मोहिम आपल्या आजच्याच अनेक समस्या सोडवते असे नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठीही ही मोहिम तितकीच आवश्यक आहे. या मोहिमेंतर्गत अनेक ठिकाणी जुन्या जलाशयांचाही कायापालट केला जातो आहे. अमृत सरोवर मोहिमेत सक्रिय सहभाग घ्या आणि जलसंधारण आणि जलसंरक्षणासाठीच्या प्रयत्नांना बळ द्या, ते यशस्वी करून दाखवा, असे आवाहन त्यांनी केले.

कुपोषणाविरुद्ध लढा
सप्टेंबर महिना हा सणांचा महिना असला तरी तो पोषणाशी संबंधित एका मोठ्या मोहीमेला समर्पित आहे. आपण दरवर्षी 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण महिना साजरा करतो. कुपोषणाविरुद्ध देशभरात अनेक सर्जनशील आणि वैविध्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. या लढ्यात इतर अनेक उपक्रमसुद्धा महत्वाची भूमिका बजावत आहे. भारत कुपोषणमुक्त करण्याच्या कामात जलजीवन मिशनचाही मोठा सहभाग दिसणार आहे. कुपोषणाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सामाजिक जागृतीच्या प्रयत्नांची भूमिका महत्वाची असते. येत्या पोषण महिन्यात कुपोषण दूर करण्याच्या प्रयत्नात तुम्ही सहभागी व्हा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

2023 आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष
संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताच्या या प्रस्तावाला 70पेक्षा जास्त देशांचा पाठिंबा मिळाला आहे. आज जगभरात बाजरी या भरड धान्याबद्दल आकर्षण वाढत आहे, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा कोणीही परदेशी पाहुणे भारतात येतात, राज्याचे प्रमुख भारतात येतात, तेव्हा भारतातील तृणधान्यापासून, भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ त्यांना देण्यात यावेत, असा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून मी करत आहे. या मान्यवरांना हे पदार्थ खूप आवडतात आणि ते आपल्या भरडधान्याबद्दल, तृणधान्याबद्दल बरीच माहिती गोळा करण्याचा देखील प्रयत्न करतात, असे मला दिसले आहे.