वाणी ज्ञानेश्वरांची

तूं गुरू बंधु पिता । तूं आमुची इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥
आमचे गुरू, बंधु, बाप, कुलदैवत आणि नेहमी संकटसमयी रक्षण करणारे आपणच आहात.
जैसा शिष्यांतें गुरू । सर्वथा नेणें अव्हेरू । कीं सरितांते सागरू । त्यजी केवीं ॥
ज्याप्रमाणे गुरू शिष्याचा सर्वथा अव्हेर करीत नाही, किंवा सागर नद्यांचा अव्हेर कसा करील?
नातरी अपत्यांतें माये । सांडूनि जरी जाये । तरी तें कैसेंनि जिये । ऐकें कृष्णा ॥
अथवा देवा, आपणच विचार करा, की आई मुलाला सोडून गेली तर ते कसे वाचेल?
तैसा सर्वांपरी आम्हांसि । देवा तूंचि एक आहासि । आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥
त्याचप्रमाणे, सर्वतोपरी आम्हास आपणच आहात व इतक्या वेळपर्यंत जे मी आपल्याला बोललो ते जर तुम्हास पटत नसेल तर,
तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा । तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगैं आतां ॥
पुरुषोत्तमा, जी गोष्ट आम्हास उचित असून धर्माविरुद्ध नसेल, ती लवकर सांगा.
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपनलासे मनीं । तो तुझिया वाक्यावांचुनि । न जाय आणिकें ॥
हे सर्व गोत्रज पाहून माझ्या मनांत जो शोक उत्पन्न झाला आहे, तो आपल्या उपदेशावाचून दुसर्‍या कोणत्याही उपायाने नाहीसा होणार नाही.
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल । परी मोह हा न फिटेल । मानसींचा ॥
या ठिकाणी पृथ्वीचे राज्य मिळाले किंवा इंद्रपद प्राप्त झाले, तरीदेखील माझ्या अंत:करणात उत्पन्न झालेला हा मोह दूर होणार नाही.