कानामागून आले आणि तिखट झाले!

editorial

महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी अकल्पितपणे अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीत नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांची सुरुवातीपासूनची असलेली अस्वस्थता नेमकी हेरून भाजपने जी मेहनत घेतली, त्यात त्यांना अडीच वर्षांनंतर यश आले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून आपल्या समर्थक आमदारांना घेऊन जेव्हा गुजरातमधील सुरत गाठली तेव्हाच यामागे भाजपचा हात असावा, अशी लोकांना शंका आली, पण भाजपचे नेते हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे सांगूत हात झटकत राहिले, पण पुढे याच शिंदे समर्थक आमदारांनी सुरतहून भाजपशासित आसाममधील गुवाहाटी गाठले आणि तेथील अलीशान अशा हॉटेल रॅडिसनमध्ये तळ ठोकला तेव्हा मात्र शिंदेंच्या बंडामागे भाजपची प्रेरणा आणि सहाय्य असल्याचे दिसून आले. शेवटी शिंदे समर्थक आमदारांना भाजपशासित गोव्यात आणून त्यानंतर महाराष्ट्राच्या विधान भवनात आणण्यात आले, यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जणू काही पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे सगळ्याच प्रक्रियांंना गतिमान करून सत्तास्थापनेचा दावा करणार्‍या भाजपला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देऊन ३ आणि ४ जुलैला अधिवेशन घेण्यात आले आहे. या अधिवेशानात भाजपने विधानसभेचा अध्यक्ष आपला उमेदवार निवडून आणून विरोधात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर बाजी मारली. सोमवारी भाजप आणि शिंदे गटाला बहुमत सिद्ध करायचे आहे, आजची परिस्थिती पाहता बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान भाजपसाठी अवघड नाही, असेच दिसत आहे. या एकूणच परिस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर ज्यांनी अनेक अकल्पित प्रयोग घडवून आणले, महाविकास आघाडी अस्तित्वात आणली ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि धुरंधर राजकीय नेते शरद पवार काही तरी चमत्कार करतील आणि जसे अजित पवारांचे बंड मोडून काढले तसे करतील,असे वाटत होते, पण त्यांना ते शक्य झालेले नाही. त्यामुळे सध्या तरी भाजपचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीसांनी बाजी मारलेली आहे, पण फार वेळ शांत बसणे आणि विरोधात बसणे हा शरद पवारांचा स्वभाव नाही.
भाजपने सध्या जरी बाजी मारली असली तरी ज्यांनी गेली अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार पडावे यासाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या आणि त्याचबरोबर ते पडण्यासाठी अनेकांना कामाला लावले, ते देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पार हिरमोड करून टाकला. २०१९ साली महाराष्ट्रात झालेली निवडणूक ही एक औपचारिकता असून मी पुन्हा येईन, असा आत्मविश्वास वाटणारे देवेंद्र फडणवीस यांच्या हातातोंडाशी आलेली सत्ता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे गेली. त्यानंतर त्यांनी गेली अडीच वर्षे ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. ठाकरे सरकार पडावे, यासाठी गेली अडीच वर्षे भाजपच्या केंद्रीय सत्तेचाही पुरेपूर वापर करण्यात आला, हे सगळ्या लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे, पण तरीही त्याचा काही उपयोग होत नव्हता. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्षांचे होते. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलेे होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांचे सहकारी पक्ष होते. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने ठाकरे यांना त्या दोन पक्षांना समान न्याय त्यांना द्यावा लागत होता, हे करताना शिवसेनेच्या आमदार आणि मंत्री यांच्याकडे त्यांना फारसे लक्ष देता येत नव्हते, असे आता जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, यावरून दिसून येत आहे. कारण शिवसेनेतून बंड करून बाहेर पडणार्‍या एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विरोध केलेला नाही. त्यांचा विरोध हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच्या महाविकास आघाडीत राहण्याला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत फुटून बाहेर पडलेल्या आमदारांची संख्या लक्षणीय आहे, याचाही विचार करावा लागेल. एकनाथ शिंदे हे काही महाराष्ट्रभर प्रभाव असलेले नेते नाहीत, यांचा प्रभाव हा प्रामुख्याने ठाणे परिसरात आहे. अशा नेत्यासोबत इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा आमदार फुटून बाहेर पडतात, याचा अर्थ शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, हेच स्पष्ट होते. शरद पवार यांनी आपल्या पक्षाला सत्ता मिळविण्यासाठी महाविकास आघाडीची मोट बांधली. उद्धव ठाकरे यांना काहीही करून मुख्यमंत्रीपद मिळवायचे होते, यामुळे त्यांनीही शरद पवारांशी हातमिळवणी केली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भाजप छोट्या भावाच्या भूमिकेतून मोठ्या भावाच्या भूमिकेत जात आहे, हे शिवसेनेच्या लक्षात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला. त्या अगोदर पाच वर्षे शिवसेनेला दुय्यम पदे स्वीकारून भाजप सोबत सत्तेत रहावे लागले होते. भाजप जर आपले ऐकत नसेल तर आपण काहीही करू शकतो, हे शिवसेनेला दाखवून द्यायचे होते तेच त्यांनी करून दाखवले.

सत्तेच्या खेळात पारंगत असलेल्या शरद पवार यांनी हा डाव साधला. तसा तो त्यांनी १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर साधला होता. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून घोडे अडले होते. भाजपला मुख्यमंत्रीपद हवे होते, पण शिवसेना ते द्यायला तयार नव्हती. २०१९ साली भाजपने पूर्ण काळ मुख्यमंत्रीपद आमच्याकडेच राहील, अशी भूमिका घेतल्यामुळे शिवसेना नेतृत्वाने राजकीय धोका पत्करला. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद खेचून आणता आले, पण त्याच वेळी पक्ष संघटना म्हणून शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. कारण जेव्हा विचारसरणीत फरक असतो, तेव्हा ती माणसे फार काळ एकत्र राहणे अवघड असते. आताही भाजपने ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिंदे गटाला आपल्यासोबत घेतले आहे, त्यात त्यांना यश आले आहे, पण पुन्हा प्रश्न तोच आहे. शिंदे गटाला आपल्यामध्ये पचवून घेण्याला भाजपला किती यश मिळते. उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हायला भाग पाडणारे देवेंद्र फडणवीस यांना शिंदे यांच्या हाताखाली काम करणे किती पचनी पडते हेही शंकास्पद आहे. कारण शिंदे कानामागून आले आणि तिखट झाले आणि ज्यांनी पुन्हा येईन, यासाठी शेंडी तुटो की पारंबी तुटो, असा जोर लावला, त्यांना दुय्यम स्थान देण्यात आले. त्यामुळे फडणवीसांच्या चर्येवरील भाव, हेचि फळ काय मम तपाला, अशाच प्रकारचे दिसत आहेत.