घरफिचर्ससारांशसंविधानाचा स्वीकार, हाच भोंदूगिरीवर उपचार!

संविधानाचा स्वीकार, हाच भोंदूगिरीवर उपचार!

Subscribe

वर्ल्डकप असो अथवा चांद्रयानाचे प्रक्षेपण असो भारतीय समाजमन हे कर्मकांडाने किती वेढलेले आहे हे आपल्याला दिसून येते. क्रिकेट वर्ल्डकप आपण जिंकणार असे आकडेमोड करून ठामपणे सांगणार्‍या फलज्योतिषांची फटफजिती झालेली आपल्याला दिसली आहे. आजच्या २६ नोव्हेंबर या संविधान स्वीकृती दिनानिमित्त जाणीवपूर्वक संविधानाचा आपण सर्वजण स्वीकार करूया. देवाधर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाने जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात ढोंग पांघरलेल्या भोंदू बाबाबुवांच्या नादी न लागण्यातच व्यक्तीचे आणि समाजाचे हित आहे, ही बाब आपण आपल्या मनाशी पक्की करून संत-समाजसुधारकांचा विचार वारसा आणि संविधानातील मूल्ये सतत लक्षात ठेवून त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करूया. हाच ह्या भोंदूगिरीवर अंतिम उपाय आणि उपचार ठरणार आहे.

-डॉ. ठकसेन गोराणे

भारतीय क्रिकेट संघाने विश्वकप जिंकावा ही प्रत्येक भारतीय नागरिकाची उत्कट इच्छा होती आणि ते सहाजिकही होतं, पण जेव्हा कोणत्याही खेळाकडे केवळ खिलाडूवृत्तीने न पाहता त्याला जात, धर्म, राजकारण, आर्थिक कमाईचे साधन, त्या पाठीमागे केले जाणारे, घडणारे सर्व गैरप्रकार अशा असंबंधित आणि अनावश्यक गोष्टींचे वलय निर्माण होते किंवा जाणीवपूर्वक केले जाते आणि त्याच दृष्टीने त्या खेळाकडे आणि खेळाडूंकडे पाहिले जाते, तेव्हा तो खेळ हा खेळ राहतच नाही. ते द्वंद ठरते. मग त्यामध्ये क्रूरता आणि हिंसा निर्माण होते. परिणामी खेळाडूंची आणि समाजाची खिलाडूवृती लोप पावत जाते. उरतो तो फक्त द्वेष, अस्वस्थता, ताणतणाव आणि असंच बरंच काही विध्वंसक…

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेटच्या विश्वकप स्पर्धेत या विकृतीत भर घालणारा आणि त्यातून आपली व्यावसायिक घडी पक्की करू पाहणारा एक गट नेहमीप्रमाणे अगोदरच काही दिवसांपासून कामाला लागला होता. भारतीय क्रिकेट संघाने अंतिम फेरी गाठली ही फार मोठी आनंदाची गोष्ट घडली, परंतु फारसे कोणी न विचारताही अनेक फलज्योतिषी आपले ज्ञान पाजळू लागले आणि भंपक दावे करू लागले की, हा विश्वकप भारतच जिंकणार. लोकेच्छा, वेळ प्रसंगाचे भान राखून आणि लोकांची शिगेची उत्कंठता आणि भावना यांना स्वतःच्या स्वार्थासाठी हात घालण्याचे व्यावसायिक कसब त्यांना पिढ्यान्पिढ्या प्राप्त झाले आहे.

अनेक समाजांत आता फलज्योतिषी तयार झाले आहेत. कारण तो बिनभांडवली आणि विनामेहनतीने मोठी बरकत देणारा धंदा आहे हे अनेक धूर्तांनी ओळखले आहे. अशा मंडळींनी भारत आणि प्रतिस्पर्धी संघाची कुंडली मांडणे, त्यातून भारतच कसा विजयी होणार हे ठासून सांगणे, कागदावर केलेली आकडेमोड दाखवून आणि त्यावर आपले स्वतःचे नाव व मोबाईल नंबर न लिहिता तो कागद मीडियातून जाहीर करून लोकांची दिशाभूल करणे आणि त्यातून स्वतःचा स्वार्थ, प्रतिष्ठा व आनंद मिळवण्याचा हिडीस प्रकार नेहमीप्रमाणे आताही केला गेला.अनेक फलज्योतिषांनी तर स्वतःचा व्हिडीओ बनवून छातीठोकपणे सांगितले की, हा विश्वकप भारतच जिंकणार!!

- Advertisement -

खरंतर असे भंपक दावे करणे ही सरळ सरळ लोकांची फसवणूकच होती. फलज्योतिषांच्या दाव्यांच्या मागे लागून आपण फसत आहोत हे लोकांना लवकर कळत नाही आणि कळाले तरी लोक काही दिवसांत ते विसरून जातात. स्वत:च्या नशिबाला दोष देतात. भविष्य सांगून ज्यांनी आपली फसवणूक केली त्यांना जाब विचारायला ही मंडळी कधीच जात नाहीत. याचाच गैरफायदा या फलज्योतिषासारख्या थोतांड विषयावर उदरनिर्वाह करणार्‍या मंडळींना होतो आणि समजा कोणी हट्टालाच पेटला तर त्याला लबाड, खोटं उत्तर देतात ते असे की, ऐन सामन्याच्या कालावधीतच अचानक अवकाशातील ग्रहमान बदलले, त्याला आम्ही-तुम्ही काय करू शकतो? असं असहाय्य व बुचकळ्यात टाकणारं उत्तर ऐकून प्रश्नकर्ता बिचारा केविलवाणा चेहरा करून निघून जातो.

जर भारताने विश्वकप जिंकलाच असता तर फलज्योतिषांचा धंदा शतपटीने वाढला असता हेही तेवढेच खरे, मात्र हेही तेवढेच खरे आहे की अशी फसवणूक झाली तरीही लोक पुन्हा पुढील काही दिवसांत विविध दैवी आणि धार्मिक कर्मकांडे कधी, कोणत्या मुहूर्तावर करावीत हे जाणून घेण्यासाठी पुन्हा फलज्योतिषाची पायरी चढायला जातील. फलज्योतिष हे शास्त्र नसून ते निव्वळ थोतांड आहे हे अगदी चळवळीच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र अंनिस ठामपणे सांगत आली आहे.

जेव्हा अंतिम सामना चालू होता तेव्हा त्या सामन्यातील चौकार, षटकार, अष्टपैलू खेळाडू, त्यांची हारजीत यावर मोठ्या प्रमाणात जुगार, सट्टा, बेटिंग असे आर्थिक क्षेत्रातील गैरप्रकार घडले. त्यात अनेक जण कंगाल झाले. अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले. समाजाच्या आर्थिक चलनवलनावर त्याचा निश्चितच मोठा वाईट परिणाम होणार आहे. दुपारी दोन ते रात्री साधारण दहापर्यंत भारतातील किमान ७० टक्के जनता हा खेळ पाहण्यात दंग असावी. यात मनुष्यबळाचे किती तास वाया गेले, राष्ट्रीय संपत्तीची किती हानी झाली याची गणती कोण करणार? जर भारताने अंतिम सामना जिंकलाच असता तर (आणि भारत विजयी व्हावा ही आमचीही मनापासून इच्छा होती.) दिवाळीत देशभर फटाक्यांच्या आतषबाजीने जेवढे पर्यावरणाचे प्रदूषण झाले होते, त्यापेक्षा काही पट अधिक ध्वनी व हवेचे प्रदूषण झाले असते. किमान एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे फटाके देशभर फोडले गेले असते. आनंद व्यक्त करण्याची ही विवेकी पद्धत नक्कीच नाही.

सातत्याने मॅच पाहणारे सर्वजण खरोखर मनापासून आनंद घेत असते तर पोटात दुखण्याचे कारण नव्हते, पण आम्हीच जिंकलो पाहिजे, या एका विचित्र व अविवेकी विचाराने आणि भावनेने सर्वांना पछाडलेले होते. त्यामुळे चांगल्या, उत्कृष्ट खेळाडूंचे कौतुक करायला पाहिजे ही सद्भावना मात्र हरवून गेली होती असे दिसून आले. खरंतर कोणत्याही प्रसंगात विवेकी पद्धतीने भावनांचे संतुलन ठेवणे, राखणे हे व्यक्ती व समाजाच्या निकोप मानसिकतेसाठी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे माणसं तणावमुक्त राहतात, प्रसन्न राहतात. नवनिर्मिती करू शकतात. त्यासाठीच प्रत्येकाने त्याच्या त्याच्या आवडीचा कोणताही खेळ खेळायला हवा. खेळाचे प्रयोजनच ते असते किंवा असायला हवे.

निदान खिलाडूवृत्तीने प्रत्येक खेळाकडे आणि खेळाडूंकडे पाहायला हवे. असे घडले तर वास्तव व इहलोकीचे जीवन जगत असताना व्यक्ती, तिच्यातील तसेच आजूबाजूच्या प्रत्येक घटनेकडे खिलाडूवृत्तीने पाहण्याची सवय विकसित करू शकते, मात्र अलीकडे क्रिकेटसारखा खेळ व्यक्तीची आणि समाजाची मानसिकता असंतुलित करीत आहे. ज्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना होता त्या दिवशी तर पहाटेपासूनच दैवी आणि धार्मिक कर्मकांड लोकांनी करावेत यासाठी बेमालूमपणे लोकांना अगोदरच प्रवृत्त केले गेले होते. बरं आताच्या क्रिकेट खेळातील विश्वकप जिंकण्यासाठीच असे सर्व होमहवन, पूजापाठ किंवा विविध धर्मियांची धार्मिक कर्मकांडं घडली असे नाही, तर चांद्रयान-३ जेव्हा चंद्रावर उतरत होते त्यावेळीसुद्धा असे झाले.

भारत विश्वकप हरल्यावर महाराष्ट्रातील अमरावती येथे एका कुटुंबात एक धाकटा भाऊ मांसाहार करून आला म्हणून भारत विश्वकप हरला, असा अजब तर्क करून मोठ्या भावाने त्याच्याशी भांडण सुरू केले. भांडण टोकाला गेले आणि त्यात मोठ्या भावाने धाकट्या भावाचा जीव घेतला. दोघा भावांचे भांडण सोडवण्यासाठी वडील मध्ये पडले तर वडिलांनाही गंभीर जखमी केले. खरंतर मांसाहार करणे आणि विश्वकप जिंकणे किंवा हरणे याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही हे अगदी सामान्य बुद्धीच्या माणसालाही कळू शकते. मग आपण सख्ख्या भावाचा खून करीत आहोत हे मोठ्या भावाला का कळले नाही, हा जीवघेणा प्रश्न निर्माण होतो. याचे उत्तर येथील शैक्षणिक, कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थेतून झालेल्या चुकीच्या संस्कारात दडलेले आहे. मांसाहार अपवित्र आहे आणि तो केल्यानेच विश्वकप जिंकण्यासारखी मोठी गोष्ट घडली नाही किंवा मांसाहार करणे हे वाईटच आहे.

त्यामुळे चांगल्या गोष्टी घडत नाहीत, असा परंपरागत विचार मोठ्या भावाच्या मनात उफाळून आला. त्यामुळे त्याच्या मनामध्ये टोकाची हिंसा दाटली आणि त्याची परिणती म्हणून एका भावाने दुसर्‍या भावाचा जीव घेतला. म्हणजे घटना कोणतीही असो, त्या घटनेमागील विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणजे कार्यकारणभाव लक्षात न घेता जेव्हा असं मानलं जातं की ठराविक वेळी, काही ठराविक लोकांनी दैवी आणि धार्मिक कर्मकांडे केली तर ती घटना, प्रसंग किंवा ते कार्य सफल होते, त्यामध्ये सुयश मिळते, हेतू साध्य होतो, ही परंपरेने लादलेली समाजमनावरील धारणा आजही पक्की आहे. मानसिक गुलामगिरीचाच हा प्रकार व परिणाम आहे. धर्माच्या नावाने अशा प्रकारे दैवी आणि धार्मिक कर्मकांड करून घेणार्‍या भोंदूगिरीला कोणताच धर्म अपवाद नाही.

खरंतर प्रत्येक व्यक्तीला, तिच्या कुटुंबाला आयुष्यात अनेक वेळा जीवघेण्या संकटांचा, समस्यांचा निकराने सामना करावा लागतो. सहाजिकच त्यात दमछाक होऊ शकते. अशा वेळी अनेक जण भीतीने पछाडतात. अनेक वेळा व्यक्ती मोडून पडण्याची आणि कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. अशा वेळी आपल्याला कोणीतरी आधार द्यावा, वाचवावे, संकटातून बाहेर काढावे अशी तीव्र भावना व्यक्तीच्या मनात निर्माण होणे सहाजिकच आहे. त्यासाठी ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय हे त्यांच्या आदर्शाकडे, आधाराकडे धाव घेतात. आधार-आसरा शोधतात. हे अगदी नैसर्गिक आहे.

याउलट दुसर्‍या बाजूला विनासायास इच्छित लाभ मिळावा असा मोह, लोभ अनेकांना अनावर होतो. त्यावेळी अशी माणसं देवाधर्माच्या, अध्यात्माच्या नावाखाली चालणार्‍या अंधश्रद्धांचा वारंवार आधार घेतात आणि आहारी जातात. शेवटी नुकसान ठरलेलेच असते. सारासार विवेक वापरून ते टाळण्यासाठी भारतीय राज्यघटनेत प्रत्येक भारतीय नागरिकाला उपासना, श्रद्धा, विश्वास, अभिव्यक्ती जपण्याचे स्वातंत्र्य जरूर बहाल केले आहे, मात्र सार्वजनिक ठिकाणी त्याचे प्रदर्शन करताना त्यावर काही बंधनं, मर्यादाही राज्यघटनेने घातल्या आहेत. त्यांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ते व्यक्तीला, तिच्या कुटुंबाला आणि समाजालाही मारक ठरते.

त्यातून सार्वजनिक नीतिमत्तेचे, कायदा-सुव्यवस्थेचे, आरोग्याचे बिकट प्रश्न तयार होतात. म्हणून त्याला कायदेशीर मर्यादाही घालण्यात आल्या आहेत. त्यासाठी व्यक्तीने त्याचे धर्मपालन करताना सामूहिक आचरण शिस्तबद्ध करावे अशी अपेक्षा असते, तथापि एखादी कृती मी किंवा आम्ही का करीत आहोत, ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वत: अंगीकारावा. त्याचा प्रचार-प्रसार करावा, असेही राज्यघटनेत नमूद आहे. म्हणजे प्रत्येक घटनेमागे कार्यकारणभाव असतो. तो माणसालाच समजू शकतो. सर्वच घटनांमागील कार्यकारणभाव लगेच स्पष्ट होत नाहीत किंवा कळत नाहीत, पण तो शोधण्याचा मार्ग मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनानेच आपल्याला कळतो. हे सूत्र प्रत्येक घटनेला लागू आहे.

क्रिकेटची विश्वकप स्पर्धा असो किंवा चांद्रयान-३ चंद्रावर उतरणे असो किंवा यांसारख्या अनेक सामान्य माणसाच्या मर्यादा आणि क्षमतांपलीकडील घटना असो, त्या घटनांमागील कारणांचा शोध घेणे, वस्तुस्थिती तपासणे, माहितीचे विश्लेषण करणे, निष्कर्षाप्रत पोहचणे, त्यातून निर्भय कृतिशील होणे या सर्वांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याला पर्याय नाही. त्यातून जगण्याचा आत्मविश्वास वाढतो, आनंदीवृत्तीत वाढ होते. स्वतंत्रपणे विचार करता येतो, दुसर्‍यांप्रति आदरभावाची निर्मिती होते. स्वतःबरोबरच इतरांचे स्वातंत्र्यही जपता येते. एकूणच जीवनात खिलाडूवृत्ती सातत्याने विकसित होत जाते. एवढं साधंसोपं सूत्र असतानाही विज्ञानसृष्टीत जगणारे लोक ऐनवेळी असं का वागतात किंवा अशा अवैज्ञानिक, दैवी कर्मकांडांचा आधार का घेतात, हा प्रश्न शिल्लक राहतोच. खरंतर हा संपूर्ण दोष या लोकांचा नाहीच. येथील समाज वास्तवच असं आहे की व्यक्तीच्या लहानपणापासून देव, धर्म, अध्यात्म्याच्या नावाने बहुतांशी असे अशास्त्रीय, दैवी कर्मकांडयुक्त संस्कार व्यक्तीच्या मनात कळत नकळत ठसत जातात किंवा ठसवले जातात.

अगदीच अलीकडचे उदाहरण सांगायचे झाले तर आजघडीला महाराष्ट्रात शेजारील राज्यातून अनेक तथाकथित आध्यात्मिक बुवा हे पुराणकथा वाचन, प्रवचन, सत्संगांच्या निमित्ताने सातत्याने येत आहेत. येथील राजकीय नेत्यांच्या धार्मिक उमाळ्याने लाखो लोकांचा समूह अशा कार्यक्रमांना येतो किंवा आणला जातो. कदाचित पुढील काही महिन्यांमध्ये अशा कार्यक्रमांना उधाण आलेले असेल. खरोखर लोककल्याणकारी कामं केली तर लोक आपल्या नेत्याला पुन्हा पुन्हा निवडून देतात. अशा घटना आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात, मात्र आता अशा तथाकथित धार्मिक बुवाबाबांचा कार्यक्रम ठेवून लाखो लोकांना जमा करून खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अशा लाखो लोकांसाठी तीन-चार दिवसांसाठी होणारा सर्व खर्च कोण आणि कसा भागवत असेल हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. हे तथाकथित आध्यात्मिक बुवा त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमात विज्ञानाच्या साधनांचाच वापर करतात, मात्र छद्मविज्ञानाच्या गोष्टी सांगतात. अनेक अवैज्ञानिक, दैवी, अवैद्यकीय उपाय-उपचारांचे तोडगे लाखोंच्या लोकसमूहाला अध्यात्माच्या नावाने सांगत राहतात. ते सांगत असलेल्या अवैज्ञानिक घटना आणि गोष्टींबद्दल जे लोक त्यांना थेट प्रश्न विचारतात, त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेतात. ते सांगत असलेल्या गोष्टी आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यावर सिद्ध करण्यासाठी त्यांना आव्हान देतात तेव्हा हे तथाकथित आध्यात्मिक बुवा अशा लोकांना देशद्रोही किंवा धर्मविरोधी ठरवतात, बदनाम करतात. सार्वजनिक ठिकाणी त्यांना धमकी देतात किंवा मोठ्या जनसमुदायापुढे त्यांची टिंगलटवाळी करतात.

दिवसेंदिवस समाजात वाढत चाललेला आणि बिकट होत चाललेला बेरोजगारांचा प्रश्न, पर्यावरण प्रदूषण, व्यसन, गुंडगिरी, अत्याचार, विषमता, दुष्काळ, महागाई अशा दैनंदिन जीवनात भेडसावणार्‍या आणि सामान्य माणसाला प्रचंड छळणार्‍या समस्या अशा अनेक संवेदनशील प्रश्नांवर हे बुवा एका शब्दानेही बोलत नाहीत. यांच्या तथाकथित धार्मिक कार्यक्रमांमध्ये कधी कधी प्रचंड चेंगराचेंगरी होते. दागदागिने चोरीला जातात. अनेक गैरप्रकार घडतात. काही वेळा तर यांच्यातीलच काही मंडळी यांच्याच नावावर समांतर धार्मिक कार्यक्रम करून यांना मिळणार्‍या आर्थिक मलिद्यावर डल्ला मारतात. विशेष म्हणजे हा प्रकारही हे यांच्याच तोंडाने कार्यक्रमात सांगतात. मग अशा वेळी यांच्या अंगात असलेली दैवी शक्ती, चमत्कार किंवा यांना प्राप्त झालेला कुणाचा तरी दैवी कृपाशीर्वाद यांना का कामी येत नाही, असा प्रश्न पडतो.

देवाधर्माच्या, आध्यात्म्याच्या नावाने लोकांना सतत लोणकड्या थापा मारल्यामुळे स्वत:चाच मानसिक, बौद्धिक, नैतिक तोल गेलेल्या, आधार गमावलेल्या अशा तथाकथित आध्यात्मिक बुवांकडे लोकांनी आधार शोधायला जाणे म्हणजेच स्वत:ची बुद्धी पांगळी करून घेणे होय. हीच पंगू झालेली बुद्धी, हाच दुबळा, अवैज्ञानिक, दैवी विचार घेऊन ही माणसं जेव्हा त्यांच्या कुटुंबात, गावात, समूहात जातात तेव्हा त्यांच्या पुढील पिढ्यांवरही अशाच प्रकारचा संस्कार कळत नकळत रुजवला जातो. मग भारतीय राज्यघटनेत प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा काय लोकांमध्ये विकसित होऊ शकेल, हा गंभीर प्रश्न सुज्ञ व्यक्तीच्या मनचक्षूंपुढे उभा राहतो, मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही.

महाराष्ट्रातील अनेक संतांनी आणि समाज सुधारकांनी ईश्वरकेंद्री धर्म हा मानवताकेंद्री करण्याचे आटोकाट प्रयत्न केले आहेत. समाजाला सातत्याने विवेकाचा मार्ग दाखवून त्यावर चालण्याचा, मार्गक्रमण करण्याचा आग्रह धरला आहे. त्या मार्गावर निर्भयपणे चालण्यासाठी भारतीय संविधान आपल्यासोबत आहेच. आजच्या २६ नोव्हेंबर, संविधान स्वीकृती दिनानिमित्त जाणीवपूर्वक संविधानाचा आपण सर्वजण स्वीकार करूया. देवाधर्माच्या आणि आध्यात्माच्या नावाने जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात ढोंग पांघरलेल्या अशा भोंदूबुवांच्या नादी न लागण्यातच व्यक्तीचे आणि समाजाचे हित आहे, ही बाब आपण आपल्या मनाशी पक्की करून संत-समाज सुधारकांचा विचार वारसा आणि संविधानातील मूल्ये सतत लक्षात ठेवून त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करूया. हाच ह्या भोंदूगिरीवर अंतिम उपाय आणि उपचार ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -