घरफिचर्ससारांशअवकाळीचा आघात!

अवकाळीचा आघात!

Subscribe

भारतीय शेती हा मोसमी पावसाबरोबर खेळलेला जुगार आहे. म्हणजेच मोसमी पाऊस ज्या वेळेस हवा त्या वेळेस आणि हव्या त्या प्रमाणावर पडत नाही, तर ज्या वेळेस नको त्या वेळेस मोठ्या प्रमाणावर धो धो पाऊस पडतो आणि हातातोंडाशी आलेली पिके वाहून जातात. गेल्या आठवड्यामध्ये नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस आला. त्याने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. त्यात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. गटारी तुंबल्या, विद्युत तारा लोंबल्या, पिकांचे अतोनात नुकसान झाले, शेतात पाणी साचले, रस्ते जलमय झाले, वाहतूक ठप्प झाली, विद्युत पुरवठा खंडित झाला, यांसह इतर अनेक प्रकारे या अवकाळी पावसाने आपला रुद्रावतार दाखवला. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर बसला.

-प्रा. डॉ. कृष्णा शहाणे

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारपीट यासह अवकाळी पावसाने उभ्या महाराष्ट्राला चांगलेच झोडपले. साधारणपणे वातावरणाच्या दाबात अचानकपणे बदल झाल्यास अवकाळी पावसाची समस्या निर्माण होते. अंदमान सागरात ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणार्‍या चक्राकार वार्‍यांमुळे निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे यामुळे अवकाळी पावसाची समस्या निर्माण झाली.

- Advertisement -

महाराष्ट्रातील साधारणपणे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि संभाजीनगर आदी परिसरासह इतर ठिकाणीही या बेमोसमी पावसाने आपले रौद्र रूप दाखवले. यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळींब, पेरू, कांदा, भात, मका, सोयाबीन यांसह इतर पिकांचे आतोनात नुकसान झाले. नाशिकची ओळख असणार्‍या द्राक्ष पिकाचे बागच्या बाग यामुळे उद्ध्वस्त झाले. मोठ्या आकाराच्या गारांसह वेगवान पावसामुळे त्यात वादळाची भर पडल्यामुळे द्राक्ष मण्यांना तडे पडले, द्राक्ष मणी गळून पडले, द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाले. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकर्‍यांचे जनजीवन विस्कळीत झाले. कारण या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याचे दूरगामी आणि विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतील.

असे म्हटले जाते की, भारतीय शेती हा मोसमी पावसाबरोबर खेळलेला जुगार आहे. म्हणजेच मोसमी पाऊस ज्या वेळेस हवा त्या वेळेस आणि हव्या त्या प्रमाणावर पडत नाही, तर ज्या वेळेस नको त्या वेळेस मोठ्या प्रमाणावर धो धो पाऊस पडतो आणि हातातोंडाशी आलेली पिके वाहून जातात. गेल्या आठवड्यामध्ये नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस आला. त्याने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. त्यात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला, गटारी तुंबल्या, विद्युत तारा लोंबल्या, पिकांचे अतोनात नुकसान झाले, शेतात पाणी साचले, रस्ते जलमय झाले, वाहतूक ठप्प झाली, विद्युत पुरवठा खंडित झाला, यांसह इतर अनेक प्रकारे या अवकाळी पावसाने आपला रुद्रावतार दाखवला. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर बसला.

- Advertisement -

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. आज भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६० टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने चरितार्थासाठी शेतीवर अवलंबून आहे. म्हणजेच त्यांचा उदरनिर्वाह हा शेती आणि शेतीपूरक क्षेत्रे यांच्यावर अवलंबून आहे. पावसाचा अनियमितपणा ही तर भारतीय शेतीसमोरील मोठी समस्याच आहे. भारतीय शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. बरेचदा मान्सून हा वेळेवर आणि पुरेसा येईलच असे सांगता येत नाही. शेतकर्‍यांना अक्षरशः मान्सूनची चातकासारखी वाट पाहावी लागते.

अशा परिस्थितीत मान्सूनने शेतीकडे पाठ फिरवली तर सिंचनाची सोय असणारे थोडेफार शेतकरी वगळता इतर शेतकर्‍यांची पाण्याअभावी दयनीय अवस्था होते. शेतकर्‍यांच्या पेरण्या लांबतात, पिकांच्या ज्या टप्प्यात पाण्याची आवश्यकता असते त्या टप्प्यात पाणी मिळाले नाही तर पिके जळून जातात. अनेकदा शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहते. म्हणजेच पहिल्या पेरणीच्या वेळी खर्च झालेला वेळ, पैसा, शेतकर्‍यांचे कष्ट या सर्व गोष्टी वाया जातात. त्यातूनच सर्वसामान्य शेतकर्‍यांची मानसिकता बदलते ती वेगळीच. यातून शेतकर्‍यांचे मनोधैर्य कमी होते. ही परिस्थिती असली की कोरडा दुष्काळ पडतो. त्यातून शेतकरी विस्थापित होतात असा अनुभव अनेकदा शेतकर्‍यांना आणि नागरिकांना येतो.

मागील आठवड्यात यापेक्षा बरोबर विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रामुख्याने प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला तर हाताशी येणारी किंवा येऊ पाहणारी पिके वाया जातात. जास्त पावसामुळे पिके वाहून जातात आणि त्या पिकाच्या तसेच त्या कालावधीत खर्च केलेले जमिनीच्या मशागतीवरील पैसे आणि श्रम हेदेखील वाया जातात. मान्सून जर अतिरिक्त पद्धतीने आला किंवा जास्त पाऊस झाला आणि हे पाणी जमिनीत साचून राहिल्यास त्याचा त्या पिकावर विपरीत परिणाम होतो. मुळात पडणार्‍या पावसाचा वेगच एवढा प्रचंड होता आणि त्यात भर म्हणून मोठमोठ्या गारांमुळे पिकाला मोठ्या प्रमाणावर गारांचे तडाखे बसले.

त्यामुळे शेतीमध्ये उभी असणारी पिके अक्षरशः आडवी झाली. पावसाचा वेग जास्त, पावसाचे प्रमाण जास्त त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. या पाण्यामध्ये उभी पिके आडवी झाली. पावसाच्या पाण्याने सर्व पिके भिजून गेली, खराब झाली हे आपण सर्वांनी पाहिले. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष पिकाला मोठ्या प्रमाणावर तडे गेले. द्राक्षाचे बागदेखील उद्ध्वस्त झाले. कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान झाले. सोयाबीन वाया गेले. कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले, यांसह इतर अनेक पिके असणार्‍या शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले हे आपण सर्वांनी पाहिले आहे.

मोठ्या प्रमाणावर गारांचा वर्षाव, पावसाचे जास्त प्रमाण, पावसाचा आणि गारांचा प्रचंड वेग यामुळे पिके तर जमीनदोस्त झालीच, पण शेतीतील मृदेचा सुपीक थरदेखील पाण्याबरोबर वाहून गेला. शेतीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहिल्यामुळे अनेकदा रोगट वातावरण तयार होते. सर्वांची सर्व पिके पावसामुळे आणि गारपिटीमुळे वाया गेल्यानंतर शेतकर्‍यांची दयनीय अवस्था होते. शेतकरी हवालदिल होतो. अशा वेळी शेतीवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके अन्नधान्यदेखील मिळवणे दुरापास्त होते. अवकाळी पडलेल्या पावसामुळे पूर्णपणे विस्थापित झालेला शेतकरी हताश होतो.

केवळ पिकेच वाया जातात असे नव्हे तर या घटकाचा अत्यंत दूरगामी परिणाम शेतकर्‍यांच्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होतो. आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. शेतकर्‍यांनी काही महिने तन, मन आणि धनाने योगदान देऊन पिकांचे संरक्षण करून जी पिके घेण्याचा प्रयत्न केला होता ती पिके हातात न आल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्या पिकाच्या यशस्वीतेवर आणि त्या पिकाच्या विक्रीपासून मिळालेल्या उत्पन्नावर शेतकर्‍याची अर्थव्यवस्था अवलंबून असते. ती अर्थव्यवस्था पूर्णपणे अस्थिर बनते. शेतकर्‍याच्या हातात पैसे शिल्लक न राहिल्यामुळे त्यांना कर्ज उभारणी करावी लागते.

कृषी कर्जाची परतफेड वेळेवर होत नाही. शेतकर्‍यांना उत्पादन अथवा पिके न मिळाल्यामुळे त्या पिकांची विक्री करता येऊ शकत नाही तसेच पिकासाठी लावलेला पैसादेखील वाया जातो. अनेकदा अनेक शेतकरी कर्जाऊ पैसे घेऊन पिके घेतात. अशा वेळी उत्पन्न न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांच्या कृषी कर्जाचे हप्ते थकीत राहतात. कृषी कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जात नाहीत. कृषी कर्ज फेडले जात नाही. त्यामुळे बँकांकडून शेतकर्‍यांना वेगळ्या पद्धतीची वागणूक मिळू शकते. शेतकर्‍यांचे मनोधैर्य खचते. अवकाळीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. आर्थिक उत्पन्न कोणत्याही प्रकारे प्राप्त होत नाही. कृषी कर्जाचे हप्ते मात्र थकलेले असतात. बँका मोठ्या प्रमाणावर पैशांसाठी तगादा लावतात. अशा परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांचे मनोधैर्य खचते आणि एकदा का मनोधैर्य खचले की त्यातून अनेक अडचणी निर्माण होतात. याचा परिणाम प्रत्येक घटकावर होतो.

साठवणुकीसाठी माल उपलब्ध होत नाही. एखाद्या हंगामात घेतलेले पीक हे हाताशी आल्यानंतर त्यातील काही पिकाची विक्री केली जाते, तर काही पिकाची साठवणूक केली जाते, जेणेकरून वर्षभरामध्ये त्या पिकाचा वापर शेतकर्‍याला त्याच्या कुटुंबासाठी तसेच विक्रीसाठी करता येईल हा त्यामागचा उद्देश असतो, परंतु अशा प्रकारे अवकाळी पावसाने किंवा इतर आस्मानी संकटांमुळे हातातोंडाशी आलेला घास किंवा हाताशी आलेले उभे पीक हे जमीनदोस्त झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारे पीक येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे साठवणुकीसाठी आणि वर्षभराच्या वापरासाठी शेतकर्‍याला कोणत्याही प्रकारे पीक बाजूला काढता येत नाही किंवा ते पीक राखून ठेवता येत नाही.

बाजारात शेतमालाचा तुटवडा निर्माण होतो. अवकाळीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यातून फारच थोड्या प्रमाणावर पिके वाचतात. त्या हंगामात जेवढा शेतमाल बाजारामध्ये येणे आवश्यक आणि शक्य होता त्यापेक्षा तो खूपच कमी प्रमाणावर बाजारामध्ये येतो. त्यामुळे शेतमालाची बाजारपेठेत टंचाई निर्माण होते. शेतमालाच्या किमती वाढतात. बाजारात शेतमालाची टंचाई निर्माण झाल्यानंतर वस्तूच्या मागणीत तर घट होत नाही. वस्तूची जी सर्वसाधारण मागणी असते ती कायम असते. त्यामुळे वस्तूच्या पुरवठ्यात घट झाली आणि मागणी मात्र कायम राहिली किंवा मागणीत वाढ झाली अशा परिस्थितीत वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्यामुळे जो काही थोडाफार शेतमाल बाजारामध्ये येतो त्याच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतात. या वाढलेल्या किमतीचा फायदा शेतकर्‍यांना न मिळता मध्यस्थांना किंवा व्यापार्‍यांना मिळतो ही मोठी शोकांतिका आहे.

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हा शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक अशा विविध घटकांच्या एकत्रित विकासावर अवलंबून असतो. यामध्ये अशा अवकाळीमुळे शेतीची अधोगती झाल्यानंतर शेती क्षेत्राचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतमालाच्या किमती वाढतात. त्याचे ग्रामीण भागात इतर अनेक क्षेत्राच्या विकासावरदेखील विपरीत परिणाम होतात. त्यामुळे ग्रामीण भागाचा एकात्मिक विकास मोठ्या प्रमाणावर खुंटतो. कृषी प्रक्रिया उद्योगासाठी माल उपलब्ध होत नाही. शेतीच्या अनेक पिकांवर फार मोठ्या प्रमाणावर कृषी प्रक्रिया उद्योग अवलंबून आहेत. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाल्यामुळे कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी पुरेसा किंवा कुठल्याही प्रकारे शेतमाल शिल्लक राहत नाही. त्यामुळे या शेती प्रक्रिया उद्योगातून निर्माण झालेल्या उत्पादनांचेदेखील भाव वाढतात. गारपिटीने काही जिल्ह्यांसह एखादे राज्य अथवा काही राज्यांसह राष्ट्र व्यापले असेल तर ही सार्वत्रिक समस्या निर्माण होते. अशा कोणत्याही सार्वत्रिक समस्येचा राष्ट्रीय विकासावर विपरीत परिणाम होतो.

यातून उभे राहण्यासाठी शेतकरी वर्गाला सहानुभूतीची नव्हे तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये तसेच इतर परिसरामध्ये शेतीच्या झालेल्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानीमुळे फळे, भाजीपाला पिके या खालील एकूण एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे असा अंदाज आहे. तीन हेक्टरपर्यंत क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांना नुकसान झालेल्या शेतमालाची भरपाई देण्यात येईल, असे राज्य शासनाने नुकतेच जाहीर केले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल, कृषी, मदत आणि पुनर्वसन या विभागांनी तातडीने ही कामे पूर्ण करावीत, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे झालेले नुकसान थोड्याफार अंशी भरून येण्यास मदत होईल असे वाटते.

-(लेखक अर्थतज्ज्ञ आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -