महाराष्ट्रातील इन्फ्राची कामे होणार ‘बुलेट’च्या गतीने! शिंदे-फडणवीस सरकारचा धडाका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प तर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेट्रो प्रकल्पांना गती देण्याचा भूमिका शिंदे आणि फडणवीस सरकारने घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंदावलेले हे प्रकल्प आता बुलेट ट्रेनच्या गती घेतील, अशी अपेक्षा आहे.

जापनच्या सहकार्याने मुंबई – अहदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उभा राहात आहे. 2026पर्यंत हा प्रकल्प सुरू करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान एकूण 508 किमी अंतर असून 320 किमी प्रतितास या वेगाने बुलेट ट्रेन धावेल. या प्रवासात 12 स्थानके असतील. या ट्रेनमुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होऊन तो तीन तासांवर येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण अंदाजे खर्च 1.1 लाख कोटी रुपये आहे. यापैकी 81 टक्के निधी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीद्वारे उपलब्ध होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ही पंतप्रधान मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो यशस्वी झाल्यानंतर देशाच्या विविध महत्त्वाच्या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.

हेही वाचा – आणीबाणी विरोधातील आंदोलकांना पेन्शन, राज्य मंत्रिमंडळाची घोषणा

ठाकरे सरकारच्या काळात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम मंदावले होते. वस्तुत: हा प्रकल्प 2023पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. पण जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू होती. त्यातच कोरोनाचे संकट आल्याने हे काम आणखी रखडले. तथापि, आज शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व मंजुरी दिली. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा गती घेईल.

मेट्रोला प्राधान्य
आरे कॉलनीत कारशेड उभारण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता. पण सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सरकार येताच पर्यावरणाच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय फिरवला आणि कारशेड प्रकल्प कांजुरमार्गला नेण्याचा घाट घातला. पण त्याला कोर्टाने स्थगिती दिली. कोरोना तसेच कारशेडच्या वादामुळे मेट्रो प्रकल्पाचे कामही मंदावले. पण आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येताच त्यांनी हा प्रकल्प पुन्हा एकदा आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला. तसेच कुलाबा-सीप्झ या महत्त्वाकांक्षी मेट्रो-3च्या कामाला गती देण्याच्या हेतूने सरकारने मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा मुंबई मेट्रोची धुरा सोपवली आहे.

समृद्धी महामार्गाचे काम सुरूच
देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम-प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम मात्र दोन्ही सरकारच्या काळात जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, फडणवीस सरकारच्या काळात बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखरेखीखाली या रस्त्याचे काम सुरू झाले आणि नंतर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शिंदे यांच्याकडे तीच जबाबदारी राहिली. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला कधी खीळ बसली नाही. आता खुद्द शिंदेच मुख्यमंत्री असल्याने मुंबई – नागपूर शहराला जोडणाऱ्या या 701 किमीचे काम गतीने सुरू आहे.

हेही वाचा – श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षेंची भागम भाग, मालदीवहून सिंगापूरकडे