हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि.., आदित्य ठाकरेंचं आव्हान

Aditya Thackeray

युवासेना नेते आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रा करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आजही त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. फुटीर गटातही दोन गट आहेत. एक गट असा आहे की, ज्यांना जबरदस्तीने पळवून नेण्यात आलंय. मात्र, त्यांना परत यायचं आहे. काही जणांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहेत. थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना केलं आहे.

जे गेलेत त्यांना एकच निरोप द्यायचा आहे की, तुम्ही जिथे गेलात तिथे आनंदी रहा, सुखी रहा. तुमच्याबद्दल मनात राग, द्वेष नाही. पण दु:ख निश्चित आहे की, आम्ही तुम्हाला शिवसैनिक समजायचो. तुमच्यावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर पुन्हा आमदार होण्यासाठी राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पोटदुखी हीच की, ठाकरे परिवारातलं कुणीतरी विधीमंडळात आलं. आतापर्यंत आपण बाहेर जे करतोय ते आधी मातोश्रीवर कळत नव्हतं, आता कळतंय. दिवसभर क्लेषदायक चित्र बघून घरी आलो तेव्हा मला आपले काही शिवसैनिक भेटले. तेव्हा लक्षात आलं की आपल्याबद्दल अजूनही प्रेम आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई विद्यापिठातील वसतीगृहांना नावे देण्याबाबत वाद राजकारण होऊ नये. विद्यापीठाच्या बाहेर राजकारण ठेवावं. सावरकर आणि छत्रपती शाहू दोन्ही नावं फार थोर आहेत. एकत्र बसून तोडगा काढावा, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

मला आरोप-प्रत्यारोप करायचे नाही, जे गेले ते गेले त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांच्यात पण दोन गट आहेत. जे लवकरच कळतील. कारण एक गट असा आहे की, ज्याला खरोखर जायचे होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली उतरवले. त्यामुळे त्यांना यातच आनंद मिळतो, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्याला मिळाले, शरद पवारांची खोचक टीका