भाजप पूर्ण ताकदीने लोकसभा आणि विधानसभा लढवणार, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

chandrakant patil

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जे.पी.नड्डा यांनी चंद्रपूर येथे जाहीर सभा घेतली आणि या सभेतून जे.पी. नड्डा यांनी भाजपच्या ‘मिशन-144’ ची घोषणा केली. ‘मिशन-144’ ची घोषणा केल्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भाजप पूर्ण ताकदीने लोकसभा आणि विधानसभा लढवणार, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

या घोषणेनंतर भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की, आम्ही देशात 303 लोकसभेच्या जागा जिंकल्या आहेत आणि 2024 च्या निवडणुकीत 400 च्या पुढे जायचं आहे. सगळ्याच जागा लढवायच्या आहेत, या अनुषंगाने काम करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले आहेत. त्यामुळे आता भाजप पूर्ण ताकदीने लोकसभा आणि विधानसभा लढवणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

जे पी नड्डा आज चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूरनंतर ते येत्या 10 जानेवारीला पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यातून नड्डा यांनी आगामी काळात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन-144’सुरु केलंय. तर लोकसभा निवडणुकीसाठी ‘मिशन-45’ सुरू केलं आहे.

महाराष्ट्रातील 16 मतदार संघावर लक्ष

मिशन-144 अंतर्गत भाजपने महाराष्ट्रातील 16 मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये चंद्रपूर, हिंगोली, बुलडाणा, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

2019 मधील महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला असता राज्यातील 48 जागांपैकी 23 जागांवर भाजपा, 18 जागांवर शिवसेना आणि 5 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. मात्र, आता मिशन-144 अंतर्गत भाजपने महाराष्ट्रातील 16 मतदार संघावर लक्ष केंद्रित केल्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढणार आहेत.


हेही वाचा : सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप