२०२४ च्या निवडणुकीनंतर तुमच्यासोबत किंचित सेना असेल, बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आताच जर एकत्र आलो नाही तर २०२४ नंतर निवडणुका होणार नाहीत. हुकुमशाही सुरु होईल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ च्या निवडणुकीनंतर तुमच्यासोबत किंचित सेना असेल, असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धवजी घरात बसून देशातील लोकशाहीची चिंता तुम्ही करू नका. लोकशाहीचा पाया मजबूत आहे. त्यामुळेच ४० आमदार सोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव मिळालं. १५ आमदार असलेला तुमचा गट अस्तित्व शोधतोय, असं बावनकुळे म्हणाले.

तुम्ही हुकूमशाहीच्या गप्पा मारू नका. हे मात्र खरं आहे की, २०२४ च्या निवडणुकीनंतर तुमच्यासोबत फक्त किंचित सेना असेल, असंही बावनकुळे म्हणाले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज आमच्या पक्षावर ही वेळ आली. आमचे नाव आणि चिन्ह चोरले. देशभरात याचे पडसाद उमटले आहेत. शरद पवार तर सोबत आहेत. पण मला ममता बॅनर्जी यांचा फोन आला. देशातील अन्य बडे नेतेही माझ्याशी बोलत आहेत. माझ्याप्रमाणे उद्या कोणावरही अशी वेळ येऊ शकते. आताच जर एकत्र आलो नाही तर २०२४ नंतर निवडणुका होणार नाहीत. हुकुमशाही सुरु होईल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.


हेही वाचा : …तर २०२४ नंतर निवडणुका होणार नाहीत, हुकूमशाही सुरू होईल; उद्धव ठाकरेंचा दावा