आता महिला मुख्यमंत्री करण्याची आठवण, चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका

ncp mehboob shaikh filed a defamation suit against bjp leader chitra wagh

भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महिला मुख्यमंत्री होणार, यावर आपलं मत व्यक्त करताना चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री पदावर महिला बसली तर आम्हाला आनंदच आहे, असं वक्तव्य केलं. पण महिला मुख्यमंत्री झाल्यानंतर आमचे सर्व प्रश्न सुटतील, या मताशी मी सहमत नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या. मात्र, आता त्यांना महिला मुख्यमंत्री करण्याची आठवण झाली आहे, असं म्हणत वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

चित्रा वाघ आज धुळे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, महिला मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा ज्यांनी उपस्थित केला, त्यांनी मुख्यमंत्री पदाची हौस पूर्ण करून घेतली. आता त्यांना महिला मुख्यमंत्री करण्याची आठवण झाली आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

स्त्री आणि पुरूष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून आम्ही आहोत. त्यामुळे जी व्यक्ती ज्या मुख्यमंत्रीपदावरती बसेल, मंत्रीपद सांभाळल्यानंतर त्यांनी सगळ्या जबाबदारीने काम केलं पाहीजे. सगळ्या घटकांना न्याय दिला पाहीजे, आमचं हेच मत आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

कर्नाटकची महाराष्ट्रात देखील घुसखोरी या बॅनरवरून खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला होता. परंतु चित्रा वाघ यांनी त्यांच्याही वक्तव्याचा समाचार घेतला आहे. संजय राऊत हे अंतर्यामी आहेत, ते काहीही बोलू शकतात. आमच्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे स्टेटमेंट महत्त्वाचे आहे. त्यामुळे टाचणी भर देखील जागा कुणालाही देणार नाही, यासाठी शिंदे आणि फडणवीस सरकार सक्षम आहे. ज्यांना जे बोलायचं आहे ते त्यांना बोलू द्या, महाराष्ट्राची काळजी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार खंबीर आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.


हेही वाचा : विनाअनुदानित शिक्षकांवर सरकारच्या निर्णयामुळे पुन्हा अन्याय