दहीहंडीच्या पंढरीकडे गोविंदा पथकांची पावलं, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उत्साह शिगेला

Dahihandi Pyramid

ठाणे: दरवर्षी दहीहंडीच्या पंढरीत उंच उंच मानवी मनोऱ्यांसह लाखोंच्या रक्कमांकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, यंदा याच पंढरीत ‘हिंदुत्व आणि निष्ठा’ या दोन राजकीय मुद्द्यांवर दहीहंडी महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे या महोत्सवाला एक आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. सकाळपासून गोविंदा पथके या पंढरीत दाखल होतील. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गटात या महोत्सवातील चढाओढाचा थरार पाहण्यास मिळणार आहे.

भाजप आणि मनसे यांच्यामुळे आणखी रंगत येणार आहे. त्यातच ठाणेकर असलेल्या मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांची मांदियाळी राहणार असल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक होणार आहे. तर वाहतुकीचे चांगलेच तीन तेरा वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 येथे आहेत महत्वाच्या हंड्या

* टेंभीनाका : दिघे साहेबांची मानाची हंडी मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी अडीच लाखांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह तर महिला गोविंदा पथकासाठी एक लाखांचे पारितोषिक ठेवले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी बारा हजार, सहा थरांसाठी आठ हजार, पाच थरांसाठी सहा हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी पाच हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

* वर्तकनगर: संस्कृति युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक फाउंडेशन या महोत्सवात विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकाला २१ लाखांचे बक्षिस दिले जाणार आहे. तसेच एकूण लाखो रूपयांच्या बक्षिसांचेही वाटप केले जाणार आहे.

* जांभळी नाका: आनंद चॅरिटेबल ट्रस्ट या महोत्सवात मुंबईतील पथकाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १ लाख ११ हजार १११ रुपये, ठाण्यातील गोविंदा पथकाला आनंद दिघे यांच्या नावाने १ लाख ११ हजार १११ रुपये आणि महिला पथकाला मिनाताई ठाकरे यांच्या नावाने ५१ हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.

* डॉ काशिनाथ घाणेकर चौक: स्वामी प्रतिष्ठान या महोत्सवात ५१ लाखांची दहीहंडी असणार आहे. तसेच स्वातंत्र्याचे ७५ वर्षपूर्ती निमित्ताने ७५ हजार महिलांची कॅन्सर निदान तपासणी केली जाणार आहे.

* बाळकूम: साई जलाराम प्रतिष्ठान या महोत्सवात ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास रोख दोन लाख व आकर्षक चषक व इतर अनेक आकर्षक रोख पारितोषिके असणार आहेत. तसेच बाळकूम गावाची मानाची हंडी फोडणाऱ्या गावकरी गोविंदा पथकास रोख २५ हजार व आकर्षक चषक, महिला गोविंदा पथकास रोख रूपये २१ हजार आकर्षक चषक, तसेच ६ थर ७ थर व ८ थर अशी सलामीसाठी रोख रक्कम दिले जाणार आहे.

*नौपाडा,भगवती मैदान : मनसे विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेची ‘स्पेन’ वारी तसेच एकुण ५५ लाखांची बक्षिसे लावली आहेत. नऊ थरांसाठी ११ लाखांचे सामुहिक पारितोषिक असणार आहे.


हेही वाचा : गोविंदा पथकांसाठी खुशखबर, राज्य सरकार भरवणार प्रो-गोविंदा स्पर्धा