घरमहाराष्ट्रजाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते; भुजबळ यांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते; भुजबळ यांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

Subscribe

हिंगोली : मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधावरून आज (26 नोव्हेंबर) हिंगोली येथे ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडत आहे. या सभेत बोलताना सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बीडमधील हिंसक घटनेचा संदर्भ देताना जाळायला अक्कल लागत नाही, जुलवायला अक्कल लागते, असा टोला भुजबळ यांनी लगावला आहे. (It doesnt take common sense to burn it takes common sense to match Bhujbal attack on Manoj Jarang Patil OBC Mahaelgar Sabha Hingoli)

छगन भुजबळ म्हणाले की, मी काही बोललो तर महाराष्ट्राच्या अनेक लोकांना असं वाटतं की, मी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतो आहे, महाराष्ट्र पेटवतो आहे, परंतु त्यांच्या (मनोज जरांगे) 15 ते 20 सभा झाल्या की आमची एक सभा होत आहे. ते काहीही बोलतात आम्ही ऐकून घेतो. पहिल्यांदा ते म्हणाले अरे ये भुजबळ तुला खुटात उपटेल, तुला अमूकच करेल. परंतु माझं खुट उपटायला मी काय केलं आहे. मी काही बोललो नाही, चुपचाप बसलो. मला ऐवढ्या फोनवरून शिव्या आणि मॅसेज आले. त्यानंतर माध्यमांनी माझी मुलाखत घेतली. मी त्यांना म्हटलं, मला आलेल्या ज्या गलिच्छ शिव्या आहेत, तुमच्यात हिंमत असेल तर वाचा आणि सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या. मी आलेल्या मॅसेजची 25 पान दिली आणि त्यांना वाचायला सांगितली. त्यांनी म्हटलं आम्हाला वाचवतं नाही. मी म्हटलं, तुम्हाला एक शिवी वाचता येत नाही, मी आणि माझं कुटुंब गेले दोन महिने या सर्व शिव्या वाचतो आणि ऐकतो आहे, आम्ही कसं जगायचं? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यातील नेत्यांना गावबंदी; छगन भुजबळ यांनी सांगितली संविधानातील 19 कलमांनुसार शिक्षा

मनोज जरांगेंवर निशाणा साधताना छगन भुजबळ म्हणाले की, मी कधी एक दगड मारला नाही, आंदोलन करताना कधी एक टायर जाळला नाही. तेच जाळत आहेत, तेच दगड मारत आहेत, त्यांनीच घरदारं जाळली, अख्खा बीड पेटवला, जे पेटवत आहेत त्यांना बोला, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते, मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते, असा जोरदार हल्लाबोल छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला.

- Advertisement -

याठिकाणी ओबीसी नेते आलेले आहेत, काही येऊ शकले नाहीत. याचा अर्थ ते आपल्या विरोधात आहेत, असा नाही. पण माझी वेगवेगळ्या पक्षाच्या, जातीच्या, धर्माच्या सर्व नेत्यांना विनंती आहे की, एक लक्षात ठेवा, अधिकार की लढाई में निमंत्रण भेजे नही जाते. जिसका जमीर जिंदा है, वो खुद समर्थन में आ जाते है और याद रखो, हमारे हक पर जहा याच आये ठकराना जरूरी है और तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है, असे टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – माझ्या नादी लागू नका, प्रकाश आंबेडकरांच्या इशाऱ्यानंतर भुजबळांची विनंती; म्हणाले…

यावेळी ओबीसी जनमोर्चाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री आ. महादेव जानकर खासदार रामदास तडस, ओबीसी महासंघाचे डॉ. बबनराव तायवाडे, भटक्या विमुक्तांचे नेते प्रा. लक्ष्मण गायकवाड, आमदार राजेश राठोड, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, मुस्लिम ओबीसी संघाचे शब्बीर अन्सारी, प्रा. टी. पी. मुंडे, माजी खासदार समीर भुजबळ, डॉ. बी. डी. चव्हाण, माजी आमदार रामराव वडकुते, प्रकाश राठोड, ॲड. सचिन नाईक, यांच्यासह सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्याक समाज व हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी व ओबीसी बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -