Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ठाकरे गट, संभाजी ब्रिगेडचे संयुक्त मेळावे; ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

ठाकरे गट, संभाजी ब्रिगेडचे संयुक्त मेळावे; ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Subscribe

मुंबई : भाजपाविरोधात (BJP) महाविकास आघाडीने वज्रमूठ सभा घेण्यास सुरुवात केली. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि संभाजी ब्रिगेडनेही (Sambhaji Brigade) तसाच निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरात संयुक्त मेळावे घेण्यात येणार आहेत. राज्यात सध्या वाढत चाललेल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हे मेळावे होणार आहेत.

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांचे संयुक्त मेळावा घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप जातीय तसेच धार्मिक दंगली घडवत आहे. त्या थांबविण्याचे काम संभाजी ब्रिगेडच करू शकते. यापूर्वीही अनेक वेळा ते काम संभाजी ब्रिगेडने चांगल्या प्रकारे केले असून तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे आताही तुम्ही त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आमची इच्छा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

मुंबईसह राज्यभरात संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे संयुक्त मेळावे पुढच्या महिन्यात होणार आहेत. त्यातील काही मेळाव्यांना उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत, असे सांगण्यात आले. राज्यात पुढील वर्षात होऊ घातलेल्या विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड संघटना ही शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर असेल. ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर आमची आघाडी असून ती निवडणुकीत कायम राहील, असे ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी सांगितले.

या बैठकीला शिवसेनेचे सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष एड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडल्यानंतर संभाजी ब्रिगेडने ठाकरे गटाशी हातमिळवणी केली होती. सर्वसामन्य जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी संभाजी ब्रिगेडने ठाकरे गटाशी युती करण्याचा निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी बिग्रेड आणि शिवसेना एकत्र येणे गरजेच असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवक्ते गंगाधन बनबरे यांनी त्यावेळी सांगितले होते.

- Advertisment -