घरमहाराष्ट्रKolhapur Constituency : उमेदवारीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये शह-काटशहाचे राजकारण

Kolhapur Constituency : उमेदवारीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये शह-काटशहाचे राजकारण

Subscribe

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र त्याआधीच कोल्हापूर मतदारसंघ चर्चेत आला आहे. एकीकडे कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असे महाविकास आघाडीकडून निश्चित झाले आहे. मात्र दुसरीकडे याच मतदारसंघातून उमेदवारीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये शह -काटशहाचे राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. (Kolhapur Constituency Shiv Sena and BJP for the candidacy of Shah Katshah politics)

हेही वाचा – Maharashtra : राज्य सरकारची खैरात; भाजपा-अजित पवार गटाशी संबंधित साखर कारखान्यांना 1898 कोटींचे कर्ज

- Advertisement -

कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या विरोधात लढण्याचे गृहीत धरून शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे भाजपा त्यांना शह देण्याच्या तयारीत आहे. संजय मंडलिक यांनी मलाच उमेदवारी मिळणार असा दावा केला असला तरी भाजपाने हा मतदारसंघ आम्हाला मिळावा अशी मागणी कायम ठेवली आहे. याशिवाय भाजपाने संजय मंडलिक यांच्या उमेदवारीला जाहीरपणे विरोध केला आहे. त्यामुळे मंडलिक यांची उमेदवारी अडचणीची ठरणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांनाही लोकसभेचे वेध लागले आहेत. पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवू असे ते म्हणत आहेत.

कोल्हापूर मतदारसंघातून यापूर्वी झालेल्या दोन लढतीत संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांनी प्रत्येक एक-एक विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोघांनीही महायुतीकडून कोल्हापूर मतदारसंघात उतरण्याची तयारी केली आहे. याशिवाय अरुंधती धनंजय महाडिक, शौमिका अमल महाडिक ही नावेही भाजपाकडून पुढे आणली जात आहेत. उमेदवारीच्या स्पर्धेत भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचेही नाव आहे, मात्र त्यांना कागल विधानसभा मतदारसंघात हवा आहे. त्यामुळे कोल्हापूर मतदारसंघात भाजपा आडून आडून उमेदवारीसाठी दावा करताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मतांसाठी गुगलवर पक्षांची जाहिरातबाजी; खर्चाची रक्कम 100 कोटींहून अधिक

संजय मंडलिकांना भाजपा शह देण्याच्या तयारीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, विधानसभेचे अध्यक्ष बाबा कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांनी विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने आधी शिवसेना आणि वर्षभरापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनी काही दिवसांपूर्वीच गडहिंग्लज तालुक्यातील भाजपच्या मेळाव्यात संजय मंडलिक यांच्यावर निशाणा साधताना म्हटले होते की, संजय मंडलिक यांचा मतदारसंघात संपर्क नाही. त्यामुळे उद्या वेगळे चित्र दिसले तर त्याचे खापर भाजपच्या डोक्यावर फोडले जाईल. मागील वेळी संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा प्रचार केला नाही. त्यामुळे आता संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. त्यामुळे संजय मंडलिक यांनी मत देण्यासाठी लोकांना कितीही सांगितले तरी ते मत देणार नाही. अशावेळी भाजपच्या चिन्हावर लढणारा दुसरा कोणताही उमेदवार द्यावा, अशी स्पष्टच मागणी संग्रमासिंह कुपेकर यांनी केल्यामुळे महायुतीत खासकरून शिवसेना आणि भाजपामध्ये मोठा वाद उफाळला आहे. अशावेळी कोल्हापूर मतदारसंघाचा तिढा कसा सुटणार हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -