घरमहाराष्ट्रनाशिकLok Sabha Election 2024 : निलेश लंकेंबाबत सुनील शेळकेंचा खळबळजनक दावा, म्हणाले...

Lok Sabha Election 2024 : निलेश लंकेंबाबत सुनील शेळकेंचा खळबळजनक दावा, म्हणाले…

Subscribe

आमदार रोहित पवार यांनी दक्षिण अहमदनगरची लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्याने मविआच्या नेत्यांकडून निलेश लंके यांचा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडून करण्यात आला आहे.

पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार निलेश लंके हे लवकरच पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार असल्याची चर्चा कालपासून (ता. 11 मार्च) रंगली आहे. कालच निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार होते. परंतु, काही कारणास्तव हा प्रवेश होऊ शकला नाही. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी लंके शरद पवार गटात जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी या राजकीय घडामोडीबाबत खळबळजनक दावा केला आहे. (Lok Sabha Election 2024: Sunil Shelke sensational claim about Nilesh Lanke)

हेही वाचा… Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला, आता…; वसंत मोरेंचा फेसबूक पोस्टमधून इशारा, पण रोख कोणावर?

- Advertisement -

आमदार रोहित पवार यांनी दक्षिण अहमदनगरची लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्याने मविआच्या नेत्यांकडून निलेश लंके यांचा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शेळके यांच्याकडून करण्यात आला आहे. ज्यामुळे शेळके यांच्या या नव्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

आमदार सुनील शेळके आणि शरद पवार यांच्यात दोन दिवसांआधी वाद रंगला होता. शरद पवारांनी आमदार शेळकेंना सज्जड दम भरल्यानंतर सुनील शेळकेंनी थेट पवारांनाच आव्हान दिले. ज्यामुळे आता त्यांनी केलेल्या दाव्याची सर्वत्र चर्चा केली जात आहे. निलेश लंके यांच्या प्रवेशाबाबत बोलताना मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले की, गेल्या आठ ते नऊ महिन्यांमध्ये ज्या घडामोडी घडल्या, त्यावेळी मी आणि निलेश लंकेंनी अजित पवारांसोबत राहायचे ही ठाम भूमिका घेतली. शेवटी सत्तेशिवाय पर्याय नाही किंवा सत्तेत असल्यानंतर मतदारसंघातील कामे होणे आणि कामांना प्राधान्य देणे, हेदेखील महत्त्वाचे आहे. पण ज्यावेळी आम्ही अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि जी भूमिका घेतली, त्यावेळी आम्ही पुढे जे काय होईल, त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवली होती. पण गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून निलेश लंकेच्या मागे अनेकजण लागले आहेत. तसेच, निलेश लंकेंना दक्षिण नगरच्या लोकसभेसाठी उभे राहण्याची गळ घातली जात आहे.

- Advertisement -

तर, महायुतीची दक्षिण नगरची जागा सध्या भाजपाच्या ताब्यात असल्यामुळे ती जागा त्यांनाच मिळेल हे जवळपास निश्चित आहे. जर ती जागा भाजपाकडेच जाणार असेल आणि तिथे महाविकास आघाडीसाठी पर्याय शिल्लक नव्हता. ज्यांना पर्याय म्हणून उभे केलेले त्या रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिला. त्यामुळेच निलेश लकेंना गळ घालून तिथून लोकसभा लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाग पाडले जात आहे. पण मला विश्वास आहे, निलेश लंके कुठेच जाणार नाहीत, ते अजित पवारांसोबतच राहतील, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

दक्षिण अहमदनगरची जागा महायुतीमध्ये भाजपाला मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रोहित पवारांना उभे राहण्यासाठी आग्रह केला होता. पण तेथील परिस्थिती डोळ्यांनी पाहिल्यानंतर रोहित पवारांनी माघार घेत, लोकसभा लढण्यास नकार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंना गळ घालून महाविकासाघाडीकडून लोकसभा लढवण्यासाठी बळी दिला जात आहे. महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंची समजूत घातली जात आहे. त्यांनी विधानसभा सोडून लोकसभेत जाण्याची तयारी नसताना, मग तुम्ही नाहीतर निदान कुटुंबातील कोणालातरी उभे करा, अशी गळ घातली जात असल्याचा दावाही सुनील शेळके यांनी केला आहे. त्यामुळे आता निलेश लंके या प्रकरणी नेमके काय बोलतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -