घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही

Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही

Subscribe

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित आणि मृत्यूच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. त्यामुळे आज राज्य सरकारने ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे आणि लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे, अशा १४ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. तसेच दुसऱ्याबाजूला दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेले नाही. गेल्या २४ तासांत राज्यात ५४४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख ६६ हजार ९२४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४३ हजार ७०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यात ५ हजार ६४३ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘महाराष्ट्रासाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. १ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच आज राज्यात एकही कोव्हीड मृत्यू झालेला नाही. राज्यातील ११ कोटी जनतेच्या साथ आणि सहकार्याने आपण कोरोनाविरुद्धच्या या लढाईत संपूर्ण विजय मिळवू, असा मला विश्वास आहे.’

- Advertisement -

आज राज्यात दिवसभरात १ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ७७ लाख १३ हजार ५७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के एवढे झाले आहे आणि सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ८० लाख ०३ हजार ८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ६६ हजार ९२४ (१०.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४५ हजार ४२२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

राज्यात आज ३८ ओमिक्रॉनबाधित नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे मनपातील ३७ रुग्ण आणि औरंगाबादमधील १ रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत राज्यात एकूण ४ हजार ७७१ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले असून यापैकी ४ हजार ६२९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९ हजार ३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ८ हजार ४८० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९०२ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.


हेही वाचा – India Corona Update : देशात आज कोरोनाचे 7,554 नवे रुग्ण, तर मृतांची संख्या पुन्हा 200 च्या पार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -