मुंबई-गोवा महामार्ग बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे; सभागृहात चर्चा, पण ठोस निर्णय नाहीच

Mumbai-Goa Highway | मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग २००११ साली प्रस्तावित करण्यात आला. २०११ ते २०१६ पर्यंत जमीन भूसंपादनाचे काम सुरू होते. २०१६ नंतर महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असली तरीही अद्यापही हे काम पूर्ण झालेलं नाही, याकडे आमदार अदिती तटकरे यांनी लक्षवेधी मांडली.

ravindra chavan

Mumbai-Goa Highway | मुंबई – गेल्या दहा-बारा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अद्यापही कासवगतीने सुरू आहे. याप्रकरणी कोकणवासियांनी वेळोवेळी रोष व्यक्त केला आहे. अनेक संघटनांनी आंदोलने केली आहेत. मात्र, तरीही या महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हेच प्रकरण आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशातही मांडण्यात आले. या महामार्गाच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सविस्तर आणि विस्तृत उत्तर दिले. परंतु, या उत्तरात मुंबई गोवा महामार्ग नेमका केव्हा पूर्ण होणार याबाबत वाश्चता केलेली नाही. हा महामार्ग पूर्ण करण्याकरता शासन कटिबद्ध असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, इतकंच मोघम उत्तर मंत्र्यांकडून देण्यात आले आहे.

मुंबईहून कोकणात जाण्यासाठी सोयीचा ठरलेला मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण २०११ साली प्रस्तावित करण्यात आले. २०११ ते २०१६ पर्यंत जमीन भूसंपादनाचे काम सुरू होते. २०१६ नंतर महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असली तरीही अद्यापही हे काम पूर्ण झालेलं नाही, याकडे आमदार अदिती तटकरे यांनी लक्षवेधी मांडली. तसंच, रायगडमधून जाणाऱ्या कासू ते इंदापूर रस्त्याचंही काँक्रिटीकरण झालं नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. गेल्या दहा वर्षांपासून हे काम संथगतीने सुरू असल्याने वेळोवेळी अनेक लोकप्रतिनिधींनी सभागृहात चर्चा केली आहे. अनेक सरकारे बदलली तरीही महामार्गाचे काम पूर्ण होऊ न शकल्याने सभागृहातील अनेक आमदारांनी याकडे लक्ष वेधले.

हेही वाचा – मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनो सावधान, ही बातमी वाचा!

मुंबई गोवा महामार्ग प्रकल्प बीओटी तत्वावर करायचं असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठरवलं होतं. हा रस्ता ५८४ किमीचा असून वेगवेगळ्या टप्प्यांत वेगवेगळी पॅकेजेस देऊन पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामांमध्ये अनेक अडचणी येत आहेत. जमीन भूसंपादन, विविध खात्याची परवानगी मिळवणं, परवानग्या घेऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात करणं यासाठी बराच कालावधी उलटून गेला आहे. या कामासाठी वेगवेगळ्या भागात जाऊन तेथील अडचणी प्रत्यक्षात समजावून घेऊन जलद गतीने करण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या टप्प्यातील गोव्यापासून ते राजापूरपर्यंत काम पूर्ण झालं आहे. सिंधुदुर्गात जागा लगेच उपलब्ध त्यामुळे काम होऊ शकलं. परंतु, कणकवलीतील काम सुरू आहे. सिंधुदुर्गातील ब्लॅक स्पॉट् शोधले जात आहेत, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.

रत्नागिरीतील परशुराम घाटात भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. तिथे माती, दगड, डोंगर कटिंग केला जातो. डोंगर कटिंग करताना तो ढासळतो आणि परिणामी वस्तीत डोंगराची दरड कोसळते. त्यामुळे, तो रस्ता पूर्णपणे बंद करून काम करणं योग्य आहे का? यावर चर्चा झाली आहे. परशुराम घाटासाठी उपाययोजना करायला पाहिजे, त्यासंदर्भातही चर्चा झाली आहे. येथील बरचसं काम झालं असून ५० ते १०० मीटरचं काम राहिलं आहे. त्यामुळे हे काम करण्याकरता १५ दिवस रस्ता बंद करण्याचा विचार असल्याचंही रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाविषयी रवींद्र चव्हाण यांनी विस्तृत माहिती दिली. परंतु, काम नक्की केव्हा पूर्ण होणार याची माहिती दिली नाही. यावरून, आमदार अमित साटम, सुनील प्रभू आणि वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली. कामाच्या दर्जाबाबात माहिती सांगण्यापेक्षा हे काम केव्हा पूर्ण होणार याची माहिती कोकणवासियांना द्या, अशी भूमिका आमदार अमित साटम यांनी घेतली. त्यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, मे महिन्यांपर्यंत सिंगल लाईन पूर्ण होईल. नऊ महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मुंबई-गोवा महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग काम करतंय. सार्वजनिक बांधकाम खातं फक्त देखरेखीचं काम करतंय. त्यामुळे हे काम लवकरात लवकर होण्याकरता महाराष्ट्र शासन लक्ष घालत आहे, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

दरम्यान, यासंदर्भातील चर्चा करण्याकरता मंत्रालयात आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. संघर्ष समतिचे काका कदम यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यानुसार ही बैठक बोलावण्यात आली आहे.