घरताज्या घडामोडीपाणी निर्जंतुकीकरणासाठी मुंबई महापालिका शुद्ध मिठाची खरेदी करणार

पाणी निर्जंतुकीकरणासाठी मुंबई महापालिका शुद्ध मिठाची खरेदी करणार

Subscribe

मुंबई: मुंबई महापालिका मुंबईतील विविध १८ जलाशयातील पाणी निर्जंतुकीकरणासाठी तब्बल १,९०० मेट्रीक टन शुद्ध
मिठाची खरेदी करणार आहे. एक मेट्रिक टन शुद्ध मिठाच्या खरेदीसाठी आठ हजार रुपये याप्रमाणे १,९०० मेट्रिक टन मिठाच्या खरेदीसाठी पालिकेला एकूण १ कोटी ५२ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. रविराज केमिकल्स या कंपनीमार्फत या मिठाचा पुरवठा करण्यात येणार आहे.

मुंबईतील दीड कोटी लोकसंख्येने सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. या सात तलावांमध्ये, मुंबईतील पवई – भांडूप परिसरातील विहार व तुळशी तलाव हे अगदीच छोटे तलाव आहेत ; मात्र अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा हे पाच प्रमुख तलाव मुंबई हद्दीबाहेर म्हणजे ठाणे जिल्हा परिसरात आजूबाजूला आहेत. तेथून म्हणजे अंदाजे दीडशे – दिनशे किमी अंतरावरून मुंबईकरांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अखंडित पुरवठा केला जातो. मुंबईला वर्षभरासाठी सात तलावांत तब्बल १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा पावसाळा संपल्यावर म्हणजे १ ऑक्टोबर रोजीपर्यंत जमा असणे आवश्यक असते.

- Advertisement -

मुंबईत दीडशे किमी दूर अंतरावरून तलावातील पाणी पिसे – पंजरापोळ येथील जलशुद्धीकरण केंद्र व भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्र यामार्फत मोठ्या जलवाहिनीमार्फत मोठ्या जलाशयात व तेथून शहर आणि उपनगरे येथील टेकडी परिसरातील जलवाहिन्यांमार्फत छोट्या – छोट्या जलाशयात साठवले जाते. या जलाशयांमधून या पाण्याचा पुरवठा विविध भागांमध्ये केला जातो. त्यामुळे जलाशयांच्या ठिकाणी विविध क्षमतेची इलेक्ट्रो-क्लोरीनेशनची यंत्रे बसवण्यात आली आहे. या इलेक्ट्रो-क्लोरीनेशच्या देखभालीमध्ये साधारण मिठाचा (कॉमन सॉल्ट) कच्चा माल म्हणून उपयोग केला जातो. या साधारण मिठाचे ब्राईन द्रावण तयार केले जाते.

पाणी खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रो-क्लोरीनेशन प्लांटची देखभाल इलेक्ट्रोलिसीस तत्वावर केली जाते. त्यामुळे या ब्राईन द्रावणाचे इलेक्ट्रो-क्लोरीनेशन यंत्राद्वारे विघटन होऊन क्लोरीनचे संयुक्त द्रावण तयार होते. या द्रावणाचा वापर पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी होतो.

- Advertisement -

मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या १८ जलाशयांच्या ठिकाणी पाणी निर्जंतुकीकरणासाठी इलेक्ट्रो-क्लोरीनेशन यंत्रांकरिता दोन वर्षांच्या कालावधीसाठी एकूण १,९०० मेट्रीक टन एवढ्या ९९.५ टक्के शुध्द आणि ग्रेड वन आय.एस.मानांकनानुसार मिठाची खरेदी करण्याचा निर्णय पालिकेच्या जलअभियंता विभागाने घेतला आहे.


हेही वाचा : कोणी काय करावं.., महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमारला पाहून डॉ. अमोल कोल्हेंचं मोठं विधान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -