राज ठाकरेंच्या भूमिकेला राणेंचे समर्थन; बेकायदेशीर भोंग्यांना विरोध

राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेबद्दल मी ट्वीट केले असून त्यांचे समर्थन केले आहे. भोंग्याला विरोध नाही, पण बेकायदेशीर भोंग्यांबद्दल ते बोलले आहेत. मग ते अनधिकृत भोंगे का ठेवावेत अशी विचारणा राणे यांनी केली. मनसे आणि भाजपची ताकद एकत्र आल्यास निश्चितच वाढेल.

RAJ THACKERAY & NARAYAN RANE
राज ठाकरे,माजी मुख्यमंत्री नारायण राणे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यासंबंधी घेतलेल्या भूमिकेला माझे समर्थन आहे. राज ठाकरे कायदेशीर बोलले असून राज्य सरकारला यासंदर्भात पावले उचलावी लागतील, अशी भूमिका केंद्रीय  मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मांडली. त्याचवेळी  राज ठाकरे यांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुलना आपण करु इच्छित नाही असेही त्यांनी आज एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेबद्दल मी ट्वीट केले असून त्यांचे समर्थन केले आहे. भोंग्याला विरोध नाही, पण बेकायदेशीर भोंग्यांबद्दल ते बोलले आहेत. मग ते अनधिकृत भोंगे का ठेवावेत अशी विचारणा राणे यांनी केली. मनसे आणि भाजपची ताकद एकत्र आल्यास निश्चितच वाढेल. मात्र भाजप एकटा तिन्ही पक्षांना सामोरे  जाण्यासाठी समर्थ आहे,  असेही ते म्हणाले. राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर शंका येईल असे  काही नाही.  राज ठाकरे कायदेशीर बोलले आहेत. त्यामुळे  कायद्याचे राज्य आहे हे दाखवण्यासाठी अधिकारी दोन तीन ठिकाणी कारवाई करतील, पण भोंगे काढल्यानंतर जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ती परिस्थिती हाताळण्याची क्षमता महाराष्ट्र पोलिसांमध्ये नाही,  असेही राणे म्हणाले.

मी बाळासाहेबांची तुलना कोणाशीही करु इच्छित नाही. साहेब म्हणजे हिंदुत्वाचा पेटता निखारा होता. त्यांनी कधीच तडजोडी केल्या नाहीत, सौदेबाजी केली नाही. सत्तेसाठी किंवा पैशासाठी हिंदुत्वाशी गद्दारीचा विचारही त्यांच्या डोक्यात आला नाही. मात्र आता एक मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्ववादी पक्षाला सोडले, बाळासाहेबांनी कधीही विचार केला नव्हता असेही राणे म्हणाले. विरोधी पक्षात असताना हेच मुख्यमंत्री शेतकऱ्यांना ५० हजार देण्याची मागणी करतात, मग आता ते का देत नाहीत? असा सवालही त्यांनी केला.

दंगलींमुळे देशात उद्भवलेल्या स्थितीवर बोलताना ते म्हणाले की, देशात आम्ही समर्थ आहोत. आमचे पंतप्रधान, गृहमंत्री सक्षम आहेत. ते डोळे बंद करुन फिरत नाहीत आणि यांना वर्षा ते मंत्रालय जायला जमत नाही.  मला या सरकारची चिंता वाटते. महाराष्ट्रात उद्या दंगली भडकल्या तर आवरण्याची ताकद यांच्यात नाही. सगळे भ्रष्टाचाराने माखले आहेत,अशी टीका नारायण राणे यांनी केली.


हेही वाचा : हे सरकार जून महिन्याच्या अगोदर जाणार, नारायण राणेंची नवी भविष्यवाणी