घरमहाराष्ट्रनाशिकLok Sabha 2024 : नाशिकमधून छगन भुजबळांची माघार, हेमंत गोडसेंचा मार्ग मोकळा?

Lok Sabha 2024 : नाशिकमधून छगन भुजबळांची माघार, हेमंत गोडसेंचा मार्ग मोकळा?

Subscribe

नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. तसेच महायुतीने उमेदवार लवकर जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे

नाशिक : लोकसभा निवडणूक 2024च्या पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. नाशिकमधून शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तिघांना दावा केला होता. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचेही नाव समोर आले होते. मात्र आज त्यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच महायुतीने उमेदवार लवकर जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Chhagan Bhujbals withdrawal from Nashik Lok Sabha Constituency)

पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, होळीच्या दिवशी आम्हाला अजित पवारांचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरीवर गेलो. तिथे अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे बसले होते. आम्हाला कशाला बोलावलं असं आम्ही विचारलं. त्यांनी सांगितलं मी दिल्लीवरून आलो आहे. दिल्लीत अमित शहा यांच्याशी बैठक झाली. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्यासोबत जागावाटपावर चर्चा झाली. नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले की, आमचे आमदार तयार आहेत आणि आम्हाला जागा द्यावी. माजी खासदार समीर भुजबळ आमचे उमेदवार असतील. मात्र अमित शहांनी नाही म्हणत छगन भुजबळ उभे राहतील असं सांगितलं. शिंदेंनी आमची जागा असल्याचं सांगितलं, पण भुजबळ तिथे उभे राहतील असं दिल्लीतून सागंण्यात आलं. अजित पवार यांनीही हट्ट धरला तुम्हाला लढावं लागेल. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर मी नाशिकला गेलो आणि चाचपणी केली. चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा समाजानेही पाठिंबा दिला. काम केलंय म्हणत दलित आदिवासांनी पाठिंबा दिला. चाचपणी करत असताना भुजबळ उभे राहतील अशी चर्चा झाली. आम्हीही त्यादृष्टीने कामाला लागलो. लोकांशी चर्चा केली. पण जागा जाहीर करताना वेळ लागायला लागला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मंत्री ते होते आणि हिशोब मला विचारतात, शहांच्या प्रश्नाला शरद पवारांचा टोला

- Advertisement -

दिल्लीत ठरलेलं खरं आहे का? हे विचारायला मी फडणवीसांना फोन केला. त्यांनीही केंद्रातून मलाच उभा रहायचं असल्याचं स्पष्ट केलं. बावनकुळेही म्हणाले मोदींचा निरोप आहे आणि अमित शहांनी सांगितलंय तुम्हीच उभा राहायचं. त्यामुळे पहिल्या आठवड्यात उमेदवारी जाहीर व्हायला हवी होती. पण तीन आठवडे गेले. महाविकास आघाडीचा  उमेदवार होळीवेळी जाहीर होऊन तीन आठवड्यांपासून प्रचार सुरू केला आहे. मात्र महायुतीकडून अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही, अशी खंत छगन भुजबळ यांनी सांगितलं.

भुजबळ म्हणाले की, नाशिकचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे जेवढा उशिर होईल, तेवढं नाशिकच्या जागेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे उमेदवारीबाबत ताबोडतोब निर्णय घेणं गरजेचं आहे. कोण जागा लढवणार, कोण उमेदवार असेल हे जाहीर करायला हवं, अन्यथा अडचण निर्माण होऊ शकते. प्रतिस्पर्धी कामाला लागले आहेत. त्यामुळे ही संदिग्धता आपण लवकर दूर करायला हवी. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की, मी नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेत आहे, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीचा सांगलीचा तिढा मिटणार; राऊत म्हणाले, विशाल पाटील आमचे…

दरम्यान, छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेतल्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत गोंडसे यांचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट आहे. कारण हेमंत गोंडसे यांनी नाशिकची जागा आपल्याला मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर शक्तीप्रदर्शन केलं होतं. भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हेमंत गोंडसे यांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. याशिवाय त्यांनी महायुतीकडून नाशिकमध्ये उमेदवार जाहीर झालेला नसतानाही प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे आता भुजबळांनी माघार घेतल्यामुळे हेमंत गोंडसे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पण भाजपा पदाधिकारी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -