घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनायलॉन मांजावर आळा कधी बसणार; मांजामुळे वयोवृद्ध जखमी

नायलॉन मांजावर आळा कधी बसणार; मांजामुळे वयोवृद्ध जखमी

Subscribe

नाशिक : घातक नायलॉन मांजा पायात अडकल्याने वयोवृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२७) सायंकाळी ४.१५ वाजता गौरी पंटागण, गणेशवाडी, पंचवटी येथे घडली. वयोवृद्धास सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दत्तात्रय जाधव यांनी तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णलायात दाखल केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मदनलाल चंपालाल भुतडा (वय ७०, रा. त्र्यंबकेश्वर) असे गंभीर जखमी झालेल्या वयोवृद्धाचे नाव आहे.

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर घातक नायलॉन मांजाची विक्री करणार्‍यांवर नाशिक शहर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असली तरी या मांजामुळे दुचाकीचालकांसह वयोवृद्धांचे जिवितास धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. मदनलाल भुतडा हे मंगळवारी (दि.२७) दुपारी त्र्यंबकेश्वरहून नेहमीप्रमाणे एकटेच नाशिक शहरात आले होते. ते रामकुंड परिसरातील गौरी पटांगणावरुन पायी जात होते. सायंकाळी 4.30 वाजेदरम्यान त्यांच्या पायात घातक नायलॉन मांजा अडकला. पायातून मांजा काढता न आल्याने ते गंभीर जखमी झाले. ही बाब सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दत्तात्रय जाधव यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ गाडी थांबवत त्यांना उपचारार्थ सुरुवातीला गणेशवाडी येथील आयुर्वेद रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार प्रवीण जाधव यांनी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. भुतडा यांना १०८ रुग्णवाहिकेमार्फत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पायातून रक्तस्त्राव झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. डॉक्टरांनी भुतडा यांच्यावर तात्काळ उपचार केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

घातक नायलॉन मांजा विक्रीस बंदी असतानाही मांजाचा साठा करुन विक्री करणार्‍या आठवड्याभरात भद्रकाली, अंबड, पंचवटी, इंदिरानगरमध्ये मांजाप्रकरणी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून छापासत्र सुरु आहे. :प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, गुन्हे

स्मार्ट सिटीच्या बैठकीसाठी इंदिरानगरहून पंचवटीत जात होतो. गौरी पटांगणावर चार यात्रेकरु महिला व भुतडा यांच्या पायात नायलॉन मांजा अडकलेला दिसला. महिलांनी मांजातून कशीबशी सुटका करुन घेतली. मात्र, भुतडा यांना पायात अडकलेला मांजा काढता आला नाही. त्यांच्या पायातून रक्तस्त्राव सुरु झाल्याने बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना रिक्षातून तात्काळ आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. : प्रवीण जाधव, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -