Lockdown In Maharashtra: लॉकडाउन नाही, निर्बंध कडक करणार – राजेश टोपे

schools will remain closed for another 15 to 20 days maharashtra said rajesh tope

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी तूर्त पूर्ण लॉकडाऊन होणार नाही. मात्र निर्बंध आणखी कडक केले जातील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. कोरोना विषाणू रोखण्यासाठी गर्दी थांबविणे आवश्यक आहे. आजच निर्बंध आणावेत असेही नाही. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून नंतरच निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार असून त्यासाठी रॅपिड अँटीजेन चाचणी देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक झाली होती. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. लॉकडाऊनमुळे पुन्हा अर्थचक्रावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे तूर्तास तरी लॉकडाऊन नको, अशा निष्कर्षाप्रत राज्य सरकार आल्याचे सांगण्यात येते. आजच्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात येणार आहे.

कोरोना चाचण्यांची संख्या आता वाढणार आहे. त्यामुळे केवळ आरटीपीसीआर केली तर भार जास्त येईल म्हणून अँटीजेन टेस्ट देखील करण्यात येणार आहे. अँटिजेनवर पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीसीआर होणार नाही. किऑस्कद्वारे देखील अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. गृह विलगीकरणाचा कालावधी सात दिवसांचा असणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

आता लॉकडाऊन हा शब्द प्रयोग करायचा नाही. किंवा १०० टक्के बंद करण्याची निश्चितपणे गरज नाही. पण ज्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळून इतर म्हणजे बिगर अत्यावश्यक सेवा आहेत त्या थांबवण्याचा विचार सुरू आहे. विषाणूवर नियंत्रण मिळवायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत गर्दी थांबवणे गरजेचे आहे, असे मत प्रशासन आणि कृती दलाने व्यक्त केल्याचे टोपे यांनी सांगितले.

रुग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढवा. सौम्य लक्षणे असणारे कोरोना बाधित रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवताना आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. कोरोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात प्राधान्याने बेड उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.


हेही वाचा – मुंबईत कोरोनाचा Peak period कधीपासून ? TIFR वैज्ञानिकांचा महत्वाचा खुलासा