घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रएकीकडे आदिवासी महिला राष्ट्रपती; दुसरीकडे आदिवासींचा जीवघेणा संघर्ष

एकीकडे आदिवासी महिला राष्ट्रपती; दुसरीकडे आदिवासींचा जीवघेणा संघर्ष

Subscribe

आदिवासी पाड्यांमधील संघर्षाच्या या पाच कहाण्या वेदनादायी

नाशिक : द्रौपदी मुर्मू.. भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. २५ जुलै रोजी त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याचे बोलले जात असतानाच दुसरीकडे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासींना जगण्यासाठी रोजच संघर्ष करावा लागत आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटूनही आदिवासींची अशी स्थिती सुन्न करणारी आहे.

पावसाळ्याच्या काळात झालेल्या काही घटनांकडे लक्ष दिले असता आदिवासी समाज किती हाल अपेष्ठा सहन करीत आहे हे दिसून येते. या संदर्भात कुठेतरी बातमी प्रसिद्ध होते. काही काळ हळहळ व्यक्त केली जाते आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! आदिवासींचा जगण्याचा संघर्ष पुन्हा सुरु होतो. गंभीर बाब म्हणजे आदिवासींच्या मतदानावर आमदार, खासदार होणार्‍यांनाही प्रश्न सोडवण्यात रस नसतो हे विशेष. ज्या नदीवरुन प्रत्येक पावसाळ्यात प्रवास करायचा आहे त्या नदीवर पूल बांधण्याची रास्त अपेक्षा दरवर्षी आदिवासी बांधव व्यक्त करतात. परंतु केवळ शहराकडेच लक्ष देणार्‍या लोकप्रतिनिधींना या प्रश्नाची कळकळच दिसत नाही. या उलट शहरात निर्जन स्थानी पुल बांधण्यात ‘रस’ दाखवण्यात येतो. द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडीनिमित्त आदिवासी बांधवांची व्यथा मांडण्याचा ‘आपलं महानगर’चा प्रयत्न

१. काही महिन्यांपूर्वी त्र्यंबक तालुक्यातील शेंद्री पाडा येथील लाकड्या बल्ल्यावरून महिलांचा हंडे घेऊन जातानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ थेट तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्यांनी या व्हिडिओची दखल घेत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन लोखंडी पूल उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येथे लोखंडी पूल देखील उभारण्यात आला होता. मात्र मागील १० दिवसात नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबक तालुका, इगतपुरी तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आणि याच पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या महिलांना लाकडी बल्ल्यांवरून प्रवास करावा लागत आहे. वास्तविक, ३० फुटाहून अधिक उंचीवर पूल बसविण्यात आला तेव्हाच हा पूल पावसाळ्यात पाण्याखाली जाईल, पुलाचा उपयोग होणार नाही असे गावकर्‍यांकडून बोलले गेले होते. मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
२. मोखाड्यातील बोटोशी गावठाणात रस्ता नसल्याने, गर्भवती महिलेला प्रसुती वेदना सहन कराव्या लागल्या. ही घटना ताजी असतांना बोटोशी मरकटवाडी येथील सुंदर जयराम किरकिरे (३५) या आदिवासी महिलेला जुलाबचा त्रास होऊ लागल्याने तिची तब्येत अधीक खालावली. गावात यायला रस्ता नाही, केवळ पायवाटच आहे. त्यामुळे अखेर येथील ग्रामस्थांनी मुसळधार पावसात सुंदरला डोली करून 4 किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. तेथून तिला खासगी वाहनाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.
३. बोराचीवाडी येथे पावसाने नदी दुथडी भरुन वाहत असताना दुसरीकडे मात्र पिण्याच्या पाण्याचे संकट संपलेले नाही. पाऊस पडत असतानाही त्यात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीपार करुन कोसो पायपीट करावी लागते. याच परिसरात खरशेत, देवडोंगरा, ओझरखेड, मूलवड या मुख्य गावांसह शंभरावर गावे, पाडे आहेत. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. पावसाळ्यात नद्यांना आलेला पूर मात्र येथील नागरिकांची पाण्याची गरज भागवू शकत नाही. हे पाणी अडविण्यासाठी या नद्यांवर अद्याप एकही छोटे धरण बांधण्यात आलेले नाही.
४. सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील केटी बंधार्‍यावरुन पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेचा प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी कळमणे, भेगू, सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी अशी गावे असून पूरस्थितीत यांचा इतर गावांशी संपर्क तुटतोे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ये-जा करण्यासाठी पूल होणे आवश्यक आहे. पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची परिस्थिती आहे.
५. मोखाडा तालुक्यापासून ३५ ते ४० किमी अंतरावर दरी-डोंगरात असलेल्या मुकुंद पाड्यातील दुर्गा मनोहर भोये (वय २० वर्षे) या पाच महिन्यांच्या गरोदर मातेच्या पोटात संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वेदना सुरू झाल्या. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी डोली करून ४ कि.मी.च्या अंतरावर असलेल्या आंब्याचा पाडा येथे पोहचले. यानंतर तिला आसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु पुन्हा पुढील उपचारासाठी तिला मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु हा प्रश्न एकटया दुर्गाचा नाही अशा घटना या पाडयावर वारंवार घडत आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या समस्येबाबत कधी गांभीर्याने विचार करणार, असा संतप्त प्रश्न येथील रहिवासी विचारत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -