मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील नामांकन अर्ज भरण्याची उद्या, बुधवारी शेवटची तारीख आहे. असे असतानाही महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपाने सर्व सूत्रे स्वत:च्या हाती ठेवली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फारशा जागा दिल्या जात नसल्याचे सांगण्यात येते. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले आहे.
हेही वाचा – Onion Export Ban : क्षुल्लक राजकीय स्वार्थापायी भाजपाने घेतलेला निर्णय, सुप्रिया सुळेंची टीका
भाजपाने जानेवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीतील आपल्या संभाव्य यशाची चाचपणी करण्यासाठी राज्यात सर्वेक्षण केले होते. शिवाय, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या टीमने देखील महाराष्ट्रात भाजपाला किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज पक्षश्रेष्ठींना दिला होता. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मतदारनिहाय पाहाणी केली होती. त्यानुसार, भाजपाच्या ‘कमळ’ चिन्हाला जनतेचा कौल मिळू शकतो, इतर दोन मित्रपक्षांच्या उमेदवारांबाबत विजयाची शक्यता कमीच असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे.
एरवी रुबाबदारपणे तिकिटं वाटणाऱ्या हातांना आज तिकिटांसाठी हात पुढं करावे लागत असतील आणि तेही हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटं पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱ्यांचाही हा अवमान आहे. एकेकाळचा त्यांचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख या गोष्टीचं वाटतं की, एक मोठा नेता…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 26, 2024
सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांपैकी भाजपाने 25 तर शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपाने 23 तर, शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला यावेळी सुद्धा 23 जागा हव्या आहेत. तर, शिंदे गटाएवढ्या जागा आम्हालाही मिळायला पाहिजेत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने मांडली आहे. पण प्रत्यक्षात मात्र, भाजपा या दोन्ही पक्षांना मिळून 10 ते 12 जागांपेक्षा जास्त जागा द्यायला तयार नसल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा – Chitra Wagh : महिलांच्या आत्मसन्मानावर काँग्रेसनेच सपासप वार केलेत, चित्रा वाघांची टीका
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. एरवी रुबाबदारपणे तिकिटे वाटणाऱ्या हातांना आज तिकिटांसाठी हात पुढे करावे लागत असतील आणि तेही हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटे पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱ्यांचाही हा अवमान आहे, असे रोहित पवार यांनी अजित पवार यांचे प्रत्यक्ष नाव न घेता म्हटले आहे. एकेकाळचा त्यांचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख या गोष्टीचे वाटते की, एक मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जात आहे. आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला पूर्णपणे डॅमेज करतील, असे सांगत रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा – Politics: सुधीर मुनगंटीवार ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होणार; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास