घरमहाराष्ट्रSanjay Raut : राज ठाकरेही अचानक मोदी भजन मंडळात सामील झाले, संजय...

Sanjay Raut : राज ठाकरेही अचानक मोदी भजन मंडळात सामील झाले, संजय राऊतांचे शरसंधान

Subscribe

कोणी कोणत्या पक्षाबरोबर जावे हा त्यांचा प्रश्न. व्यासपीठावरून महाराष्ट्र स्वाभिमानाच्या व महाराष्ट्रावरील अन्यायाच्या गर्जना करायच्या आणि ज्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला आहे, त्यांच्याच पालख्या उचलायच्या, हे रहस्यमय आहे, अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आणि आता ते लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी फिरत आहेत. या मोदी-शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, असे कडाडणारे मनसेप्रमुख राज ठाकरेही शेवटी अचानक मोदी भजन मंडळात सामील झाले. अजित पवार, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, रवींद्र वायकर, यशवंत जाधव, तटकरे वगैरे मंडळी ज्या कारणांसाठी मोदी भजन मंडळात सामील झाली, त्याच कारणासाठी राज ठाकरेही गेले काय? हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. (PM Modi : Sanjay Raut target Raj Thackeray)

कोणी कोणत्या पक्षाबरोबर जावे हा त्यांचा प्रश्न. व्यासपीठावरून महाराष्ट्र स्वाभिमानाच्या व महाराष्ट्रावरील अन्यायाच्या गर्जना करायच्या आणि ज्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला आहे, त्यांच्याच पालख्या उचलायच्या, हे रहस्यमय आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोदी हे देवाचे अवतार वाटू लागले, इथपर्यंत या भजन मंडळाच्या बुद्धीचे अधःपतन झाले. त्या भजनात आता नमोनिर्माणाचे टाळ वाजले, असा टोला संजय राऊत यांनी सामना दैनिकातील रोखठोक सदरातून लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rokhthok : मोदींनी बाळासाहेबांनाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला, संजय राऊतांचे टीकास्त्र

लोकसभा निवडणुकीत कार्यवाहक पंतप्रधान मोदी देशाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. ते विरोधकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यातच दंग आहेत. बेरोजगारीचा प्रश्न, भाजपानेच निर्माण केलेला भ्रष्टाचार, देशातील सर्व भ्रष्ट लोकांना भाजपाने दिलेला प्रवेश, यावर मोदी बोलत नाहीत. ते विरोधकांवर अत्यंत खालच्या शब्दांत बोलतात. पंतप्रधानपदावरील व्यक्तीचे इतके अधःपतन देशाने कधीच बघितले नव्हते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

अनेक प्रांतांत जातीची मते मिळावीत म्हणून मोदी यांनी ‘भारतरत्न’ किताबाची खैरात वाटून या पदव्यांचे अवमूल्यन केले. मोदी यांनी रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबवले असा अपप्रचार त्यांचे भक्त करतात, पण इतक्या शक्तिमान मोदी यांना आपल्या देशातील तरुणांना नोकऱ्या देता आल्या नाहीत. कारण मोदी काळात देशात परकीय गुंतवणूक पूर्णपणे थांबली. महागाईत होरपळून निघालेल्या सामान्य लोकांशी मोदी यांचे नाते तुटले आहे. देशातील व्यापारी वर्ग कर आणि दहशतवादाने बेजार झाला. पुन्हा त्यांच्याकडून निवडणूक रोख्यांच्या निमित्ताने खंडणी उकळली ते वेगळेच, असे आरोप त्यांनी केला आहे.

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व लोकसभा उमेदवार जाहीर केले. भाजपा, मिंधे-अजित पवारांची आघाडी अद्यापि चाचपडत आहे. महाराष्ट्रातील निकाल देशाचे राजकीय चित्र बदलतील असे वातावरण आहे. महाराष्ट्रात भाजप 45 प्लस जागा जिंकेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस व्यक्त करतात. मोदी देशात चारशेवर जागा जिंकण्याची गर्जना करतात. ते अजिबात शक्य नाही. मोदी हे पुन्हा पंतप्रधान होत नाहीत, हे नक्की. हुकूमशाहीचा अंत जवळ आला आहे. कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकून मोदी यांना देशातील संसदीय लोकशाही नष्ट करायची आहे, राष्ट्राध्यक्ष पद्धत लादून राज्य करायचे आहे आणि हे एकदा झाले की देशाची लोकशाही कायमची इतिहासजमा होईल. हे घडू द्यायचे काय? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

हेही वाचा – PM Modi : योद्ध्यांना कोठडीत डांबून मोदींची मैदानात तलवारबाजी, संजय राऊतांची रोखठोक टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -