विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाणांबरोबरच ‘भावी मंत्री’ भरत गोगावलेंनाही करायचीय ‘रायगड’वर स्वारी!

मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू होती. आता बंगल्यांवरून देखील काही जण आग्रही आहेत. विशेष म्हणजे, ज्यांचा अद्याप मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, अशांनीही शासकीय बंगल्यावर दावा केला आहे. एवढेच नव्हे तर, दुसऱ्या टप्प्यात आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा विश्वासही त्यांना असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील ‘देवगिरी’ बंगल्यासाठी आग्रही होते. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यावेळी काँग्रेसबरोबर आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. तत्कालीन जलसंधारणमंत्री (कृष्णाखोरे विकास) असताना अजित पवार यांना हा बंगला मिळाला होता. तेव्हापासून 2014पर्यंत देवगिरी बंगला हा अजितदादांकडेच होता. त्यामुळे अजितदादांचे त्या बंगल्याशी वेगळेच ऋणानुबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एका पत्राद्वारे देवगिरी पुन्हा मिळावा, अशी विनंतीही केली होती. फडणवीस यांनी देखील त्यांच्या या विनंतीला मान देत हा बंगला त्यांच्या सुपूर्द केला.

अजित पवार हे विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना शासकीय बंगला देण्यात आला. पण 9 ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांचा समावेश नाही आणि दुसऱ्या टप्प्याचा विस्तार कधी होईल, हे अधांतरी असतानाच शिंदे गटातील भरत गोगावले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण या दोघांनाही मंत्रालयासमोरील रायगड हा सरकारी बंगला हवा आहे, असे सूत्रांनी सांगितले. आधीच मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, म्हणून मनातील खदखद काहींनी प्रत्यक्षपणे तर काहींनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. तसाच प्रत्यय खातेवाटपाबद्दल पाहायला मिळाला. खातेवाटपात भाजपाला झुकते माप मिळाले आहे. शिवाय, काही महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार आपल्याकडे आला नाही, याबाबतही कमी-अधिक प्रमाणात नाराजी आहे. त्यावर अनेकांनी ‘जबाबदारी महत्त्वाची’ असे सांगत स्वत:हूनच त्यावर फुंकर घातली आहे.

पण आता ‘रायगड’ या बंगल्यावरून धुसफूस सुरूच झाल्याचे सांगण्यात येते. हा बंगला विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांना हवा आहे. त्यांच्या स्वीय सचिवांसह काही कर्मचारी बंगल्याची पाहाणी करत असतानाच शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले देखील त्या बंगल्यावर आले. रवींद्र चव्हाण यांनाही हाच बंगला हवा आहे आणि ते मंत्री असल्याने त्यांना हा बंगला मिळेल, असे त्यांना सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पण तरीही भरत गोगावले हे रायगडसाठी आग्रहीच आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळात आपला समावेश होणारच आहे, त्यामुळे हा बंगला आपल्याला मिळू शकतो, असे त्यांनी आपल्या विश्वासू कर्मचाऱ्यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाची कशी समजूत काढतात की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागेल, हे लवकरच स्पष्ट होईल. कदाचित, भाजपाचाच दुसरा एखादा मंत्री ‘रायगड’ सर करून जाईल.