घरमहाराष्ट्रआरक्षणाला धक्का लावणार नाही! देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी नेत्यांना शब्द

आरक्षणाला धक्का लावणार नाही! देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी नेत्यांना शब्द

Subscribe

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाला दिला. बिहारमधील जातीनिहाय जनगणनेत त्रुटी आहेत. परंतु आपल्या राज्यात पारदर्शकपणे जातीनिहाय जनगणना केली जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.

हेही वाचा – तेव्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं असतं तर…; मराठा आरक्षणाबाबत बावनकुळेंचे सूचक विधान

- Advertisement -

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीने जोर धरल्यानंतर राज्य सरकारने मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या कार्यकक्षेचा विस्तार केला. आता ही समिती राज्यभर कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्र देणार आहे. यावर अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करत सरसकट मराठा आरक्षणाला विरोध केला आहे.

या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह ओबीसी समाजाच्या काही नेत्यांनी आज, मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षणाचा शब्द फडणवीस यांनी दिला होता. याबाबत ओबीसी समाजाच्या नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा शब्द मी पुन्हा देतो, अशा शब्दांत त्यांनी ओबीसी नेत्यांना आश्वस्त केले. यावेळी राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याबाबतही चर्चा झाली. ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – दोन समाजातील कोंबडे झुंजवायाचे आहेत; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

शिंदे समितीला आव्हान देणार

या शिष्टमंडळाने छगन भुजबळ यांचीही भेट घेतली. भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेला ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दर्शवत त्यांचे समर्थन केले. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीकडून सुरू असलेल्या मराठा कुणबी सर्वेक्षणाला विरोध करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. शिंदे समितीच्या कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्याचे या बैठकीत ठरले. तसेच दिवाळीनंतर रस्त्यावर उतरून ओबीसींची ताकद दाखवण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. त्यानुसार येत्या 17 तारखेला अंबड येथे ओबीसी मेळावा होणार असून त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी हिंगोलीत भव्य मेळावा आयोजित केला जाणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटणार?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी होत आहे. या बैठकीत अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने भुजबळ यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -