घरमहाराष्ट्रठाण्यात गटारी साजरी करण्यासाठी चिकन, मटण आणि दारूच्या दुकानांसमोर झुंबड

ठाण्यात गटारी साजरी करण्यासाठी चिकन, मटण आणि दारूच्या दुकानांसमोर झुंबड

Subscribe

गटारी साजरी करण्यासाठी ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे चिकन, मटण आणि दारूच्या दुकानासमोर लोकांची झुंबड

ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून देखील नागरिकांमध्ये रविवारी सकाळ पासून गटारीचा उत्साह दिसून येत होता. ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीकरांची रविवारी सकाळपासूनच मटण, चिकन विक्री दुकानांवर झुंबड उडाली होती. या गर्दीत देखील ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीकर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून खरेदी करीत असताना दिसून येत होते, तर तळीराम देखील मद्यविक्री दुकानाबाहेर रांग लावून आपला स्टॉक घेत होते.

कोरोना या साथीच्या आजाराने संपूर्ण देशात मागील ४ महिन्यांपासून थैमान घातलेलं आहे. चार महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला असताना महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असताना मात्र ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील काही महानगरपालिकांनी आपल्या हद्दीत पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या शहरांचा त्यात समावेश आहे. कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आलेले असून दूध आणि औषधे वगळता सर्व बंद करण्यात आलेलं आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात गटारी कशी साजरी होणार हा प्रश्न जिल्ह्यातील अनेकांना पडला होता. गटारीचा एक रविवारी लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करावं अशी मागणी अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती, आणि आश्चर्यची गोष्ट म्हणजे रविवारी ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरात काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आणि नागरिक सकाळीच घराबाहेर पडले ते थेट चिकन मटणाच्या रांगेत उभे राहिले.

आज सकाळी ६ वाजल्यापासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मटण घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र सर्वांनी शिस्तीने रांगेत उभे राहून मटण घेतलं. मागील चार महिन्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात मटणाची विक्री झाली असल्याचं डोंबिवलीतील मटण विक्रेते मुसा यांनी सांगितलं. नागरिकांचा चिकन, अख्खी कोंबडी घेण्यावर देखील तेवढीच भर होती. चिकन दुकानदार रफिक सांगितलं की, नेहमी अर्धाकिलो, पावकिलो चिकन घेणारे देखील किलो, दोन किलो चिकन खरेदी करीत होते, तर अनेकांनी अख्खी कोंबडी खरेदी केल्याचं रफिक यांचेनी सांगितलं.

- Advertisement -

दरम्यान मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर देखील तळीरामांची गर्दी दिसून येत होती. घरपोच मद्य विक्रीला परवानगी असताना वाईन्स शॉप मालक दुकानातच मद्याची विक्री करीत होते. आम्ही घरपोच सेवाच देतो मात्र आज गटारीचा दिवस असल्यामुळे घरपोच सेवा देण्यासाठी तेवढे नोकर नसल्यामुळे आज दुकानातच मद्य विक्री करीत आहे. मात्र ही विक्री करताना आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सर्वांना रांगेतच मद्य विक्री करीत असल्याचं डोंबिवलीतील एका मद्यविक्रेत्याने सांगितलं. गटारी असल्यामुळे आज दारूची मागणी जास्त आल्यामुळे आम्ही स्टॉक पण जास्तच मागवला आहे. लोकांनी सकाळपासून दुकानाबाहेर गर्दी केली होती. लोकांना सांगून देखील कोणी ऐकत नसल्यामुळे नाईलाजाने आम्हाला दुकानात मद्यविक्री करावी लागल्याचं कल्याणमधील एका मद्य विकेत्याने सांगितलं.


हेही वाचा – भाजपच्या खोटारडेपणाची किंमत देशाला मोजावी लागेल – राहुल गांधी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -