प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज? बैठकीबाबत कोणीही सांगितले नसल्याची माहिती

आज (ता. 03 मे) राष्ट्रवादी पक्षाच्या सुरू असलेल्या बैठकीबाबत काहीही माहिती नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहे.

State president Jayant Patil upset? Information that no one told about the meeting
संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मंगळवारी (ता. 5 मे) ‘माझे सांगाती… राजकीय आत्मकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. पण यावेळी शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी एकच गोंधळ घालत पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि उपस्थित असलेल्या अनेकांना अश्रू अनावर झाले. पण आता एकाच दिवसांत पक्षातील अंतर्गत कलह समोर येऊ लागला आहे. कारण आज (ता. 03 मे) राष्ट्रवादी पक्षाच्या सुरू असलेल्या बैठकीबाबत काहीही माहिती नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. जयंत पाटील यांनी पुण्यातील साखर कारखान्याच्या आवारातून प्रसार माध्यमांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली.

मी राष्ट्रीय नेता नाही, म्हणून बैठकीबद्दल माहित नव्हतं…
शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. पण यामुळे पक्षातील अनेक नेते नाराज असल्याचे देखील दिसून येऊ लागले आहे. पक्षाची महत्त्वाची बैठक सुरू असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्याबाबतची काहीहा माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची माहिती स्वतः जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. “मी राष्ट्रीय नेता नाहीये, त्यामुळे अशा बैठकांबाबत काही माहिती नव्हते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे मी साखर कारखान्याच्या बैठकीला आलो. ही बैठक झाल्यानंतर पुन्हा जाईल, पण शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्यावा,” अशी माहिती जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. परंतु ही माहिती देत असताना जयंत पाटील यांच्यावर चेहऱ्यावर यावेळी नाराजी स्पष्ट दिसून येत होती. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर जयंत पाटील हे नाराज असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.

अनेकांचे राजीनामे आले…
शरद पवार यांच्या निर्णयानंतर पक्षाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, बऱ्याच जिल्हाध्यक्षांनी आणि वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी व्हॉट्सअपला राजीनामे पाठवले आहेत. जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा पाहिलेला नाही. तर ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा राजीनामा आलेला आहे. त्यामुळे पक्षातील सर्व वरिष्ठ बसून लवकरच निर्णय घेऊ, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

बैठकीबाबत सांगण्याची आवश्यकता वाटली नसावी…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना या बैठकीबाबत माहित नसल्याचे सांगितले. पण याबाबत त्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखविली नसली तरी पवारसाहेबांच्या या निर्णयाने सर्वच कार्यकर्ते नाराज असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर आजची बैठक ही राष्ट्रीय स्तरावरील बैठक आहे. पण कदाचित त्यांना या बैठकीबाबत मला सांगण्याची आवश्यकता वाटवी नसावी, सगळीकडे आपण असावचं असा आग्रह आपण पण करू नये, असे म्हणत जयंत पाटील यांनी सावध पवित्रा घेतला.

दरम्यान, पक्षात सुरू असलेल्या बैठका.. या बैठकांना जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांना माहित नसणे. तसेच पक्षाकडून जाणूनबुजून बैठकीसाठी आमंत्रण न देणे, यामुळे जयंत पाटील यांची नाराजी पूर्णतः दिसून येत आहे. पण तरी देखील पक्ष माझ्यावर आणि मी पक्षावर नाराज नाही, असे हसत सांगणे यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहे.


हेही वाचा – शरद पवार ही महाराष्ट्राची गरज – जितेंद्र आव्हाड