घरमहाराष्ट्रमराठा समाजाच्या भावना तीव्र, आरक्षणाच्या आंदोलनाला...; राजीनामा देताना शिंदे गटाचे खासदार काय...

मराठा समाजाच्या भावना तीव्र, आरक्षणाच्या आंदोलनाला…; राजीनामा देताना शिंदे गटाचे खासदार काय म्हणाले?

Subscribe

हिंगोली : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बुधवारी (25 ऑक्टोबर) आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यानंतर मराठा समाजही आक्रमक झाला असून त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक असलेल्या काही मराठा समाज बांधवांनी आज (29 ऑक्टोबर) शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी घेराव घालून राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यावेळी आपणही आरक्षणाच्या बाजूचेच आहोत, असे म्हणत हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पाठविला आहे. (The feelings of the Maratha community are strong the agitation for reservation What did Shinde group MLA Hemant Patil say while resigning)

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. एवढेच नाही तर गावात येणाऱ्या नेत्यांच्या गाड्यांवर मराठा आंदोलकांनी हल्ला करत काचा फोडल्या आहेत. मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्यामुळे नेत्यांची अधिक कोंडी झाली आहे. याच दडपणातून हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. आरक्षणाचा प्रश्न खूप दिवसांपासून प्रलंबित आहे आणि मी समाजासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी आज खासदारकीचा राजीनामा देत असल्याचे हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्राशी चर्चा करून जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा, अन्यथा…; राऊतांचा इशारा

हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि या मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि महागाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने उमरखेड येथे गेल्या शनिवारपासून उपोषण सुरू आहे. गावागावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. गावांच्या वेशीवर त्याबाबतचे बॅनरही लावण्यात आले आहे. असे असताना हेमंत पाटील हे आज दुपारी पोफाळी (ता. उमरखेड) येथे काही कामानिमिताने आले होते. हेमंत पाटील पोफाळीत आल्याचे समजताच मराठा समाज बांधवांनी त्यांचा ताफा अडवत घेराव घातला आणि त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली.

- Advertisement -

मराठा समाज बांधवांच्या मागणीनंतर हेमंत पाटील यांनी त्यांच्यापुढेच आपल्या खासदारकीचा राजीनामा लिहिला आणि तातडीने लोकसभा अध्यक्षांकडे पाठवला. तसेच येत्या दोन दिवसात आपण स्वत: दिल्ली येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून राजीनामासत्र सुरू आहे. माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी दोन दिवसांपूर्वीच आपापल्या वरिष्ठांकडे राजीनामे दिले आहेत.

हेही वाचा – मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, तरीही उपोषण मागे न घेण्याचा ठाम निर्धार

राजीनाम्यानंतर हेमंत पाटील काय म्हणाले?

हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रात म्हटले की, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना तीव्र असून, मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि त्यामुळेच मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

हेमंत पाटील कोण?

हेमंत पाटील हे कडवे शिवसैनिक असून नांदेड हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. त्यांनी नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती, शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम केले आहे. सुरुवातीच्या काळात हेमंत पाटील हे राज ठाकरे यांच्या जवळचे होते, मात्र आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुढे संधी मिळेल, हे हेरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी संधी मिळाली आणि ते शिवसेनेकडून हिंगोलीचे खासदार झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -