विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा उद्या शपथविधी

विधान परिषद निवडणुकीत १० जागांसाठी १३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. विधान परिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान पार पडलेय

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या १० सदस्यांचा शपथविधी उद्या शुक्रवारी होत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देतील. उद्या दुपारी १२ वाजता विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी पार पडेल. २० जून रोजी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, प्रसाद लाड,  उमा खापरे, श्रीकांत भारतीय,   सचिन अहिर, आमश्या पाडवी आणि  भाई जगताप हे १० उमेदवार निवडून आले आहेत. या सर्वाना डॉ. गोऱ्हे शपथ देतील.

विधान परिषद निवडणुकीत १० जागांसाठी १३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. विधान परिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान पार पडलेय. भाजपने पाचवा उमेदवार दिल्यानं या निवडणुकीत रंगत आली होती, परंतु भाजपचा तो पाचवा उमेदवारही निवडून आलाय. संख्याबळानुसार भाजपाचे ४ उमेदवार निवडून येणार होते. तर शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचा १ उमेदवार निवडून येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. भाजपला आपला पाचवा उमेदवार आणि काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी लागलेल्या कसरतीत भाजपनं बाजी मारली आणि काँग्रेसचा एक उमेदवार पडला.

विजयासाठी २७ मते आवश्यक होती

विधान परिषद निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी  उमेदवाराला २७ मतांची गरज होती. आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचे १५२ भाजपचे १०६, अपक्ष तेरा आणि छोट्या पक्षाचे १६ असे २८७ आमदार विधानसभेत आहेत. तर मंत्री नबाव मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क न्यायालायने नाकारला आहे. त्यामुळे २७ मतांचा कोटा थोडा कमी झाला होता. त्याचाच फटका हा महाविकास आघाडीला बसला आहे. विशेष म्हणजे त्या निवडणुकीनंतर शिंदे गटानं बंड केलं, ते सुरतमार्गे गुवाहाटीला जाऊन बसले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच कोसळले, आता शिंदे आणि फडणवीसांनी युतीचं सरकार स्थापन केलं असून, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झालेत.


हेही वाचाः शिवसेनेत उठाव करणं गरजेचं होतं, आमदार सदा सरवणकरांची खंत